Monday 2 October 2017

चोरांच्या मनसुब्यावर केली मात


"रंग रंगुल्या, सान सानुल्या
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला
सांग तुझा रे तुझा लळा"



बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या पुस्तकातील इंदिरा संतांची कविता विद्यार्थी तन्मयतेने गात होती. गाताना त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचा स्टुडिओ पुन्हा सुरू झाला याचा आंनद ओसंडून वाहत होता.
स्टुडिओ अन तोही शाळेत, होय बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या दक्षिणेला असलेले पारगाव जोगेश्वरी. या गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील हा रेकॉर्डिंग स्टुडिओ. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत इतर शाळेप्रमाणे डिजिटल रूम तर आहेच. शिवाय हा एक ध्वनिमुद्रण स्टुडिओसुद्धा आहे. या डिजिटल रूम कम रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोर्ड ऑक्टोपॅड, कोंगो बोंगो, ढोलकी, ड्रम, ढोल झांज, खंजीर, ट्रॅंगल, डफ, बासरी, बिगुल अशी वेगवेगळ्या प्रकारची वाद्य ठेवलेली आहेत. मराठी, इंग्रजीतील कविता विद्यार्थी तेथे आपल्या आवाजात गाण्याच्या तालासुरात रेकॉर्ड करतात. ही एम पी थ्री स्वरूपातील गाणी पालकांच्या मोबाइलवर सुद्धा पाठवली जातात.



विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो. शिवाय गायन, वादन आणि तंत्रज्ञानाचा वापर आदी कौशल्याचा विकास होतो. दोन वर्षापासून सुरू असलेला हा उपक्रम या शाळेतील स्टुडिओच्या काही साहित्याची जुलै महिन्यात चोरी झाल्याने बंद पडला होता. ज्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू झाला ते शाळेतील शिक्षक सोमनाथ वाळके यांनी या चोरीची खंत सोशल मीडियावर व्यक्त केली. ग्रामीण भागातील एक आगळा वेगळा उपक्रम बंद पडल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले होते. त्यावर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण आणि शिक्षण विकास मंच या संस्थांनी स्वतःहून या स्टुडिओची पुन्हा उभारणी करण्याचं आश्वासन दिलं. विशेष म्हणजे वाळके यांनी किंवा शाळेने मागणी न करताच ही आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे नवीन साहित्य पुन्हा आलं आणि स्टुडिओ सुरू झाला. एवढेच काय
तर डिजिटल शिक्षणासाठी गावकऱ्यांनी सुध्दा शाळेला काही टॅब भेट दिले. लोकसहभागाच्या या चळवळीने चोरांच्या मनसुब्यावर मात केली.
- राजेश राऊत .





No comments:

Post a Comment