Tuesday 24 October 2017

ज्युनियर ब्रह्मे - भाग पाचवा

प्रवास पालकत्वाचा: मी घराचा कर्ता पुरुष आहे अशी माझी एक प्रामाणिक समजूत आहे. ही समजूत व्हायचं कारण इतकंच की कर्त्या माणसाला कायम कामाच्या ओझ्याखाली ठेवलं जातं. कर्त्या पुरुषाचं दुसरं लक्षण म्हणजे त्याची कधी कदर होत नाही, त्याला कुणी किंमत देत नाही. पण असो. ते माझ्या पाचवीलाच पुजलं गेलंय. खुद्द आमच्या लग्नात माझी नवरामुलगा म्हणून कुणी किंमत केली नव्हती, आता बोला! मेव्हण्यांनं लग्नाची बातमी पेपरला देताना "मोठी जाहिरात कशाला हो? इथं काय लगीन आहे का कुणाचं?"असं म्हणून छोटीशी बातमी दिली होती. फक्त ती बातमी दशक्रिया विधी आणि देहावसानच्या पानावर नको असा मी हट्ट केल्यानं मग छोट्या जाहिरातीच्या "हरवले/ सापडले" कॉलममध्ये आमच्या लग्नाची बातमी कोंबून बसवली होती. (त्यातही नवऱ्यामुलाचं गुणवर्णन करताना हसतमुख हा शब्द न आठवल्यानं हास्यास्पद असा शब्द वापरला होता.)

असो, पोरं हाच वारसा पुढं चालवत आहेत. आधीच मोठा माओ मला स्वतःचा लहान भाऊ समजतो. आणि धाकट्या मुलाचा, मिष्काचा (वय वर्ष साडेतीन) तर माझ्यावर तीळमात्रही विश्वास नाही. मी अंघोळ घालू का? असं विचारलं तर नाक उडवून 'नाई! तुला नाई येत्त.' असं उत्तर मिळतं. चित्रं काढताना मुलात मुल होऊन 'ही कार आहे का?' असं विचारलं तर 'हात्त! तो हात्ती हाये. त्याची शेपूत नाई दिशली का? वेला कुथला!' असं प्रत्युत्तर येतं. मी ऑफिसला जाताना 'डबा' घेऊन जातो तर माओ स्कूलला 'टिफिन' नेतो. म्हणजेच बाबा कुठल्या तरी डब्बा शाळेत जातो आणि दादा मात्र 'मोट्या श्कुलमदी' जातो असा निष्कर्ष या पोरानं काढलाय. जेवताना पाय हलवू नये असं माओला सांगताना ऐकल्यावर मिष्कानं यापुढं जाऊन पुढचे नियम तयार केले, जसे- ज्येवताना हात हालवायचे नाईत, ज्येवताना डोकं हालवायच्य नाई, ज्येवताना तोंड हालवायच्य नाई. त्याच्या नियमाप्रमाणं वागायचं तर जेवण करणंच बंद करावं लागेल. 'बाबा माज्या नियम पालत नाई तर मीपन बाबाच्या नियम पालनार नाई.' असं आर्ग्युमेंट या पोरानं केलं. पुढंमागं वकील होऊन नाव काढणार.
मी कोणतीही गोष्ट नीट करू शकत नाही यावर दोन्ही पोरट्यांचा ठाम विश्वास आहे. माळ्यावरून गेल्या वर्षीचं मखर काढायचं असलं, गाडी धुवायची असली, गव्हाचं पोतं रिकामं करायचं असलं किंवा डब्यातून तेल काढायचं असलं तर दोघं टीव्ही सोडून मला बघायला धावतात. एखादी गंमत बघायला मिळणार असे उत्सुकतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतात. परवा दोघांच्या टक लावून बघण्याचा त्रास इतका झाला की माळ्यावरून परात खाली आणताना ठाणकन खाली पडली. दोघं पोरं पैसे वसूल झाल्यासारखे चेहरे करून पुन्हा खेळायला निघून गेली. परात खाली पडली तेव्हा मी संतापानं जे वाक्य उच्चारलं त्यावरून बायकोनं नंतर झाडपट्टी केली ती वेगळीच. 'कुठून शिकता हो असले शब्द?' असं ती म्हणाली तेव्हा ती मला आपला मुलगाच समजते याची खात्री पटली.
एकूणात, आमचा प्रवास पाल्य ते पाल्य असाच होत राहिलाय.
(मेधाताईंच्या सांगण्यावरून मी हे पालकत्वाची कहाणी लिहिली. तेव्हा हा सगळा पाल्य ते पालक प्रवास डोळ्यांसमोर आला. जरी हा कुणी आदर्श म्हणून घ्यावा असा नसला, तरी अगदीच घेऊ नये, असाही नाही.)
(चित्र:गजू तायडे)

No comments:

Post a Comment