Wednesday 25 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग तीन



हल्ली पालकच मुलांना बक्षीस म्हणून सहजपणे मोबाईल हातात देतात किंवा इंटरनेटवापराला परवानगी देतात. त्यापेक्षा मुक्त खेळाला प्राधान्य द्यावं, हे पालकांना आणि मुलांना कसं समजावून सांगावं ?
- गॅझेट हे बक्षीस होऊच शकत नाही. पालकांनी मुलांसोबत घालवलेला वेळ, क्वालिटी टाईम, हे मुलांचं खरं रिवॉर्ड असायला हवं. मुलांना काही गोष्टींची आवड लावता येईल. बोर्ड गेम, पत्ते असे खेळ. एखाद्या दिवशी रात्री जेवणानंतर किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांबरोबरीने हे खेळ खेळावेत. मैदानी खेळांची सवय असणारी मुलं इंटरनेटच्या आहारी फार कमी प्रमाणात जातात, अशीही निरिक्षणं आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करावी. अशी मुलं मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम बनतात. मुलांना घरकोंबडं बनू द्यायचं नाही. रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र गप्पा मारत करायचं. त्यावेळी टीव्हीही नको आणि कोणाच्याच हातात मोबाईलही नको. असे छोटे छोटे नियम घरात बनवता येतील. अशा वेळेला मुलांना काय करा आणि काय करु नका, हे दोन्हीही सांगायचं नाही. तर पर्याय उपलब्ध करुन द्यायचे. मुलांना हळूहळू या पर्यायांची गोडी लागेल.
पालकांचं म्हणणं असं आहे की, टीनएजर्स मुलांना रागावताही येत नाही. आणि त्यांचा घरातल्यांशी संवाद तुटत चालला आहे, हेही जाणवतं. मग करायचं तरी काय?
- पालकांच्या बाजूने मुलांशी संवादाचे सर्वतोपरी प्रयत्न व्हायला हवेत. मुलांकडून पालकांना सूचना मिळत असतात. उदा - मुलं आयांना म्हणतात की, तू सारखी एकच गोष्ट मला सांगत असतेस. जेव्हा बघावं तेव्हा प्रत्येक गोष्टीवरुन लेक्चर देतेस. खरोखरच चाळीशी-पंचेचाळीशीतल्या आया एकच गोष्ट पुन्हापुन्हा सांगत राहतात. किंवा बोलायला लागल्या की थांबतच नाहीत. मुलांच्या प्रतिक्रिया म्हणजे पालकांसाठी वेक अप कॉल्स असतात. ते ऐकून जागं व्हायचं. जाणीवपूर्वक आपल्या वागण्यात बदल घडवून आणायचे. एक गोष्ट खरी की सगळ्या वेळेला मुलांचं मत आईवडिलांबाबत चांगलं असू शकत नाही. पण आईवडिलांनी घरातल्या नियमांबाबत ठाम रहायला हवं. एक गोष्ट आईवडील नक्की करु शकतात. मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हटकणं सोडून द्यायचं. प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये जनरेशन गॅप असतेच.
मुलांचे कपडे, हेअरस्टाइल तुम्हाला पसंत नाही, असं होऊ शकतं. याबाबत तुमचं वेगळं मत असू शकतं. पण ह्या क्षुल्लक गोष्टींच्या मागे लागून पालक खूप त्रागा करतात. मुलांच्या मागे लागतात. यामुळे नातं खराब होतं आणि मोठ्या गो्ष्टींबाबत मुलांशी संवाद साधता येत नाही. नात्यामध्ये कोणताही संवादच उरत नाही. चर्चाही होत नाहीत.
हे करु नका.. ते करु नका असं मुलांना प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा त्यांना विविध पर्याय द्यावेत. उदाहरणार्थ आज आपण टेकडीवर फिरायला जाउया का.. तुझ्या आवडीचा खेळ आपण दोघांनी खेळूया.. एखादा चांगला सिनेमा बघूया वगैरे. तुम्हीच इंटरनेटच्या चांगल्या वापरात मुलांना सहभागी करून घ्या. त्यांच्या जिव्हाळ्याची माहिती शोधणं, नेटवरचे लेख वाचणं असं काही. मुलांशी संवाद साधायला, तो वाढवायला सुरवात करा. यासाठी दिवसातला अर्धा तास किंवा एक तासही पुरेसा आहेे.
हल्लीच्या टीनएजर्सना आजुबाजुच्या लोकांशी बोलण्यात जराही स्वारस्य नसतं. अशा मुलांना इंटरनेटच्या व्हर्चुअल जगातून बाहेर कसं काढायचं? कारण ही मुलं नातेवाईकांकडे यायला तयार होत नाहीत आणि आली तरी मोबाईलमध्ये तोंड खुपसुन बसतात.
- हो. माझी मुलं जेव्हा टीनएज मध्ये होती तेव्हा मी गंमतीने म्हणायचे की या मुलांचं पालक होण्यापेक्षा काउन्सेलर होणं सोपं आहे. मुलं आणि नातेवाईक किंवा पालकांचं मित्रवर्तुळ यात असं शोधून काढायचं की आपले कोणते नातेवाईक त्यांना आवडतात. कोण कम्फर्टेबल वाटतात. त्यांच्याबरोबर मुलांना राहू द्यायचं. किंवा नातेवाईक आल्यावर त्यांच्याशी अर्धा तास बोल आणि नंतर तू तुझ्या कामाला जा असं मुलांना सांगता येतं. मीही हे सर्व केलं आहे. थोडं मुलांचं ऐकायचं आणि थोडं तुमचं त्यांना ऐकायला लावायचं.
इंटरनेटमुळे असं होत चाललंय की लोकांना समोरासमोर येऊन बोलायची सवय राहिली नाहीये. माझ्याकडे काउन्सेलिंगला येणारी मुलं नजरेला नजर देऊन बोलू शकत नाहीत. त्यांची कोणाशी प्रत्यक्ष बोलायची सवयच गेलेली असते. टीन एजमध्ये जातात तेव्हा मुलांमध्ये अनेक बदल होतात. न्यूनगंडाची भावना निर्माण होते. आत्मविश्वास जातो. मग बोलायची, लोकांना थेट भेटायची सवय कमी होते. याच वेळी इंटरनेट हातात आलं की संपलंच. त्यामुळे प्रत्यक्ष समोर न येता संवाद साधंण सोप जातं आणि मग त्यांना तेच बरं वाटू लागतं. आणि यात बदल करावा असं वाटत नाही.
अल्बर्ट आईनस्टाइन यांनी म्हटलंय, भविष्यात तंत्रज्ञान नात्यांहून महत्वाचं होईल तेव्हा इडियटसची जनरेशन तयार होईल. आणि ते आता खरं झालयं, असं दिसतंय. लोकांना खरीखुरी माणसं, नाती याहून व्हर्च्युअल जग जास्त खरं आणि जवळचं वाटतंय. आपण मोबाइलला स्क्रॅच येऊ नये म्हणून त्याला स्क्रीन गार्ड लावतो, त्याची काळजी घेतो. त्यापेक्षा आपल्या जवळचं माणूस दुखवू नये, नात्याला तडा जाऊ नये, नातेसंबंध सुरळीत, सुरक्षित राहावेत, याची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. हे मुलांना पट्वून देणं आपली पालक म्हणून जबाबदारी आहे. मोबाईल ही निर्जीव गोष्ट आहे, हे त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल.
- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र 

शब्दांकन: रूपाली गोवंडे

No comments:

Post a Comment