Friday 27 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग चार



हॉस्टेलमध्ये रहाणार्‍या मुलांकडे लक्ष ठेवणं पालकांना थोडं अवघड जातं. या बाबतीत पालकांनी नेमकं काय करायचं?
- मी सुचवेन की तंत्रज्ञानाची मदत घ्यावी आणि स्काईपसारख्या माध्यमातून मुलांशी बोलत राहावं. आई-वडील आणि मुलं यांचा व्हॉट्स ॲप ग्रुप बनवावा. आम्ही घरात असा ग्रुप बनवला आहे. आपण काही चांगलं वाचलेलं, चांगला सिनेमा बघितलेला, हे सगळं मुलांबरोबर शेअर करावं. सतत जेवलास का आणि झोपलास का असं विचारत बसू नये. उपदेश तर नकोच नको. आपल्या संवादातून मित्रत्वाची भावना मुलांच्या मनात निर्माण करा. आपण आता मोठे झालो आहोत, हे आपल्या आई-वडिलांना समजलंय, ही जाणीव मुलांमध्ये निर्माण होऊ द्यात. माझी एक मैत्रीण म्हणते की हॉस्टेलवर रहाणार्‍या तिच्या मुलाशी तिचं स्काईपवर होणारं बोलणं जास्त जिव्हाळ्याचं असतं. दिवसातलं २० मिनिटांचं बोलणं थेट आणि समोरासमोर बसून होतं आणि दोघांकडून तेवढा वेळ एकमेकांना दिलाच जातो. काही वेळा एकाच घरात राहूनसुद्धा दिवसेंदिवस स्वत:च्या व्यापात व्यस्त असणार्‍या आई-मुलाचंही रोज एवढं बोलणं होत नाही.
डिजिटल व्हर्च्युअल गेमपायी एखाद्याने आपलं जीवन संपवलं, असं आपण ऎकतो. ही नेमकी काय मानसिकता असते?
- टीन एज किंवा ज्याला पौगंडावस्था म्हटलं जातं या अवस्थेत मुलं वहावत जातात. पटकन कोणाच्याही प्रभावाखाली येतात. मग ते मित्रमैत्रिणी असोत. किंवा फिल्मस्टार असोत. मित्रमैत्रिणी जे सांगतील तसंच मुलं करतात. नकळतपणे निगेटीव्ह गोष्टींचं आकर्षण या अवस्थेत मुलांना जास्त असतं. व्हिलनचा रोल करणार्‍याविषयी त्यांना आकर्षण वाटू शकतं आणि हे त्या वयात नैसर्गिक असतं. मग अशा गेम्सच्या आहारी ते लवकर जातात. पहिल्या भागात आपण म्हटलं की इंटरनेटवर किती वेळ बसायचं, त्याचाही नियम करावा. अर्धा तास ठीक आहे. तर, ज्या मुलांना पालकांनी अर्धा तास इंटरनेटवर बसायची परवानगी दिलेली आहे, त्या मुलांच्या बाबतीत गेमचं आकर्षण, त्यातून काही विपरित प्रकार घडण्याची शक्यता खूप कमी असते. पण जेव्हा मुलं तासच्या तास कंप्युटरसमोर किंवा मोबाईल हातात घेऊन बसलेली असतात तेव्हा ते गेम्सच्या प्रभावाखाली येतात. म्हणूनच, मुलांचा इंटरनेटवरचा वेळ कमी ठेवण्याचीच सवय पहिल्यापासून लावावी.
आणखी एक, घरातला कंप्युटर/लॅपटॉप घरात सगळ्यांचा वावर जिथे असतो, तिथेच हवा. उदा. हॉलमध्ये. म्हणजे घरातल्या सगळ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, हे मुलांच्या डोक्यात रहातं. मुलांच्या मोबाईलला शक्यतो पासवर्ड ठेवू नये. मुलांना विश्वासात घेऊन समजावून सांगा्वं की मी तुझी प्रायव्हसी जपणार आहे. मात्र मोबाईलवरचे गेम तू मला दाखवून खेळ. मुलांशी रोजचा संवाद ठेवणं गरजेचंच आहे. आपल्या कामाचे, ऑफिसमधले इंटरेस्टींग किस्से त्यांना जेवताना सांगा. त्यांच्या कॉलेजमध्ये काय घडलं, ते सहज विचारा. मात्र मुलांनी सगळं सांगितलचं पाहिजे, असा अट्टाहास धरु नका. कारण टीन एजर्स घरात जरा गप्पगप्प झालेली असतात. त्यांना मोकळं व्हायला थोडा वेळ द्यायला हवा.
एखादा मुलगा / मुलगी आज डिप्रेशनमध्ये गेला / गेली आाणि लगेच उद्या आत्महत्या केली, असं कधीच घडत नसतं. हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. ही विचारप्रक्रिया किमान ६-७ महिने डोक्यात चालू असते. अशा वेळी पालकांचं मुलांकडे नीट लक्ष असेल, तर त्यांच्या वागणुकीमध्ये होणारे बदल पालकांना लगेचच जाणवतात. त्यांच्या वागणुकीत, सवयीत बदल झालेत का? त्यांचा रात्रीच्या जागरणांचा वेळ वाढलाय का? अचानक आपला मुलगा / मुलगी पहाटे उठून मोबाईलवर बराच वेळ खेळतायत का? अशा गोष्टी पालकांना लक्षात यायलाच हव्यात.
आत्महत्या हा वैफल्याचा, तीव्र नैराश्याचा परिणाम असतो. अशा वेळेला पालकांना जाणवलं की आपल्या बोलण्याने फार फरक पडत नाहीये, तर काउन्सेलरची जरुर मदत घ्यावी. पालक स्वतःसाठीच काउन्सेलरकडे जाउन बोलू शकतात. प्रत्येक वेळेला मुलांना न्यावं लागतंच असं नाही. मुलं यायला तयार नसतील, तर हल्ली काउन्सेलर घरीही येतात.
इंटरनेट आणि गॅझेटसच्या वापरामुळे कोणते शारिरिक आणि मानसिक आजार होतात?
- या दोन्हीच्या अतिवापरामुळे आपल्या शरिरावर आणि मनावर दुष्परिणाम होतात. याला इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर (IAD) म्हणतात. या परिणामांना अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन आणि जागतिक आरोग्य संघटनेने आजार म्हणून मान्यता दिली आहे. पहिला परिणाम डोळ्यांवर होतो. तासनतास बसल्‍याने आजार होतात. सारखं बसून राहिल्याने शरिराला काहीच व्यायाम होत नाही. मोबाईल, कंप्युटर,टीव्ही एकटक बघताना जंक फुड पोटात जात असेल, तर मुलं ओव्हरवेट किंवा अंडरवेट होतात. संध्याकाळी मोकळ्या हवेत न खेळल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
मानसिक परिणाम म्हणजे एकाग्रता कमी होते, स्मरणशक्ती कमी होते. एकटेपणा आवडायला लागतो. नकार या मुलांना सहन होत नाही. नकारावर मुलं आक्रमक प्रतिक्रिया देतात. या सगळ्याचा नातेसंबधांवर, अभ्यासावर आणि मग पुढे करियरवर परिणाम होतोच. मग ही मुलं आणखी आणखी निराशेच्या गर्तेत जाऊ लागतात. गेम खेळणार्‍या मुलांवर आणखी एक परिणाम होतो. त्यांच्यातला चिडचिडेपणा वाढतो. मग त्यांना मारामारी, रक्त, मरणं हे सगळं खेळण्याइतकं साधं सोपं वाटायला लागतं. आणि त्यांच्यातली संवेदनशीलता संपून जाते. पुढे जाऊन ही मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळायची शक्यता जास्त असते.
हे सगळं होऊ नये, यासाठी पालकांनी मुलांना गेम्स खेळायचा वेळ ठरवून देणं आणि आपण त्या बाबतीत केलेल्या नियमांवर ठाम रहाणं गरजेचं आहे. ठाम राहाणं म्हणजे सतत कडक राहाणं नाही. इतर वेळेला मुलांना मिठी मारा, त्यांना जवळ घ्या. मुलांवर पालकांच्या अशा स्पर्शाचा चांगला सकारात्मक परिणाम होत असतो.
- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक,
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
शब्दांकन: रूपाली गोवंडे

No comments:

Post a Comment