Tuesday 31 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग पाच



टीन एजमधल्या मुलांना कसं हाताळायचं, ते पालकांना कळत नाही. एक मुलगी बारावीला आहे. दिवसातले १८ तास इंटरनेट, मोबाईल यावर असते. पालकांनी काही विचारलं तर ती त्यांच्या अंगावर ओरडते, धमक्या देते. अशा स्थितीत काय करावं?
- अशा वेळेला पालकांनी आधी संवाद साधायचा पूर्ण प्रयत्न करावा. मागच्या भागात त्याविषयी आपण बरीच चर्चा केली आहे. अनेक मार्गही सुचवलेत. पण ती मुलगी काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये तर आता काउन्सेलिंगची खरंच गरज आहे, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. पालकांनी स्वत: त्रास करुन घेऊन परिस्थिती बदलणार नाहीये. आधी पालकांनी स्वत: काउन्सेलरला भेटून मोकळेपणाने बोलावं. आपल्याला ताप आला की डॉक्टरकडे जातो तेवढ्याच सहजपणे काउन्सेलरला भेटायचं. काउन्सेलर मध्यस्थ आणि तटस्थ व्यक्ती म्हणून आपल्याला चांगली मदत करु शकतात. फॅमिली डॉक्टरप्रमाणेच फॅमिली काउन्सेलर ही सध्या गरज बनत चालली आहे. हे समाजाने मान्य करायला हवं. शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नेहमीच ताबडतोब निदान हिताचं असतं. वेळ घालवला तर गोष्टी आणखी बिघडतील, हे लक्षात घ्यावं. मुलांमध्ये समस्या दिसत असलीत तर लगेच काउन्सेलिंग सुरु करणं बरं.
पालक आणि मुलांसाठीचे काउन्सेलिंगचे काय टप्पे असतात?
सुरवातीला पालक फोन करतात, भेट ठरवतात. पण प्रत्यक्ष यायला उशीर करतात. जेव्हा प्रकरण टोकाला जातं तेव्हाच येतात. लोक काय म्हणतील या भीतीने ते काउन्सेलरकडे यायला वेळ लावतात. पालक येतात तेव्हा इतके वैतागलेले असतात की त्यांना शांत करण्यातच एक सेशन जातं. पहिल्या भेटीत पालकांचं आणि मुलाचं रुटीन विचारलं जातं. ते मुलांशी कसं वागतात, कशा प्रतिक्रिया देतात, ते समजून घेतात. मग काउन्सेलर त्यांना समजावतात, वागण्यात काही बदल सुचवतात. पालकांनी सोशिकपणा अंमलात आणणं सोपं नसतं. आतून कितीही राग आला तरी मुलांशी वागताना बाहेरून शांत राहावं लागतं. पालकांनी स्वतःच्या वागण्या-बोलण्यात-प्रतिक्रिया देण्यात बदल केल्यानंतर बर्‍याचदा काउन्सेलरकडे न येताच मुलांच्याही प्रतिक्रिया बदलतात. अर्थात मुलांमध्ये बदल व्हायला वेळ लागतो. पालकांनी मुलांवर चिडणं जाणीवपूर्वक बंद केलं तरी मुलं सुरवातीला आपला चिडचिडेपणा, हट्ट सोडत नाहीत. अशा वेळी पालकांना खूपच सामंजस्याने घ्यावं लागतं. मुलांमध्ये बदल होण्यासाठी जास्त वाट बघावी लागते. मुलांना पालकांमध्ये झालेला बदल जाणवत असतो. पण सहजासहजी मान्य करतील ती मुलं कसली? पण हळूहळू मुलांच्या वागण्यातून ते जाणवतं.
साधारणपणे पहिल्या टप्प्यात पालकांशी बोलणं, त्यांच्याकडून मुलांची हिस्ट्री समजून घेणं आणि त्याविषयी चर्चा. पुढच्या टप्प्यात पालकांचा नेमकी समस्या शोधून त्यांना काही उपाय सुचवणं, वागण्यात बदल सुचवणं आणि त्यावर चर्चा. तिसर्‍या टप्प्यात त्यांच्यातले बदल टिकून राहिलेत का, हे तपासणं, बदलांमुळे मुलांच्या वागण्यात अपेक्षित बदल दिसताहेत अथवा नाही याची चर्चा आणि बदल दिसत नसतील तर मुलांना काउन्सेलिंगसाठी आणण्याचे प्रयत्न करणं, असं चालतं.
मुलांच्या इंटरनेटच्या वेडाची नुकती सुरवात असेल तर एखाद-दोन सेशन्समध्ये, पालकांशी बोलूनच तो प्रश्न सुटतो. असं एक उदाहरण म्हणजे ८ वर्षांची मुलगी होती. प्रिया म्हणूया तिला. आई नोकरी करत असल्यामुळे शाळेव्यतिरिक्तचा वेळ प्रिया घरात एकटीच असायची. घरात वायफाय होतं. मग ती कंप्युटरवर काहीतरी करत राहायची. मात्र एक दिवस प्रियाने आईच्या मैत्रिणीला फेसबुक रिक्वेस्ट टाकली. मैत्रिणीकडून ते आईला कळलं. आईला धक्का बसला. मग एकदा आई आणि एकदा प्रिया अशी दोन काउन्सेलिंगची सेशन्स झाली. घरातलं वायफाय बंद केलं. आणि प्रश्न सुटला.
एक चांगली गोष्ट म्हणजे हल्ली पालक जागरुक झालेत. त्यांना मुलांमध्ये इंटरनेट किंवा गॅझेट्सच्या वेडाची झलक जाणवली की लगेच काउन्सेलरकडे जातात. मुक्तांगणमध्ये तर आमचा अनुभव तर असा कीे मुलांना मोबाईल घेउन देण्याचं ठरलं की पालक आधीच मुलांना आमची संस्था सहज दाखवायला म्हणून घेउन येतात. पुढच्या भागात आपण आणखी केसेसची चर्चा करूया.
  - मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक,
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
 शब्दांकन: रूपाली गोवंडे.

No comments:

Post a Comment