Wednesday 1 November 2017

झाडं लावली, झाडं जगवली



परभणीतल्या गजानन नगरात रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडं आता बरीच मोठी झाली आहेत. कुणालाही हेवा वाटावा असा हा हिरवागार परिसर. उन्हाळ्यात या परिसरात माणसांना थांबण्यासाठी किंवा वाहनं लावण्यासाठी सावलीचा शोध घ्यायची गरज भासत नाही. झाडं लावा, झाडं जगवा असा प्रचार सतत सुरू असतो. झाडं लावण्याचा एखादा सरकारी उपक्रम लोकांचाच होणं, याचं यशस्वी उदाहरण असं परभणीत घडलंय. लोकसहभागातून सुमारे 12 हजार झाडं लावून अनेक वसाहती हिरव्यागार बनविण्याची किमया परभणीतील वृक्षमित्र कैलास गायकवाड यांनी केली आहे. पुढे येणार्‍या पावसाळ्यात 5 हजार रोपे लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
कैलास गायकवाड हे सध्या मानवत इथे मंडळ कृषी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून परभणीत ते राहत असलेल्या गजानन नगर भागातून त्यांनी वृक्षारोपण उपक्रमाची सुरूवात केली. 2008-09 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी वृक्षलागवड आणि संवर्धन अभियान हाती घेतलं होतं. त्यांनी शहरातील नागरिक, संस्था, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी या सगळ्यांनाच वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार कैलास गायकवाड यांनी आपल्या वसाहतीत लोकसहभागातून पहिल्याच वर्षी अडीच हजार रोपं लावली. त्यानंतर दरवर्षी ते 2 ते 3 हजार रोपं नियमितपणे लावत आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्या घरासमोर ही रोपे लावली जातात, ते रहिवासी या झाडांना पाणी घालून निगा राखतात. रोपं लावण्यासाठी योग्य पद्धतीने खड्डे खोदावे लागतात. त्यानंतर योग्य प्रकारच्या रोपांची निवड करणं आणि ती लावणं. रोपांना पाणी कमी पडणार नाही याचीही दक्षता घेणं हे सगळं करावं लागतं. केवळ रोपं लावून न थांबता गायकवाड नागरिकांचं प्रबोधनही करतात. त्यांची निःस्वार्थ वृत्ती आणि तळमळ पाहून नागरिक स्वतःहून पुढे येतात आणि गायकवाड यांना मदत करतात. काही नर्सरीचालकांनीही या उपक्रमासाठी रोपं विनामूल्य दिली आहेत.

आतापर्यंत गजानन नगरचं अनुकरण करून त्याच भागातील दत्त नगर, श्रीराम नगर, समझोता कॉलनी, आनंद नगर, तुळजा भवानी नगर, सरगम कॉलनी इथल्या रहिवाशांनी झाडं लावायला सुरूवात केली आहे. गायकवाड यांनी ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या परिसरातही 101 रोपे लावली आहेत. कैलास गायकवाड यांनी आजवर लावलेल्या 12 हजार झाडांत प्रामुख्याने औषधी वनस्पतीच आहेत. कैलास गायकवाड यांच्या सांगण्याप्रमाणे करंज या रोपात औषधी गुण असतात. तसंच वर्षभर हिरवंगार राहून रखरखत्या उन्हाळ्यातही त्याला कोवळी पालवी फुटते. त्यामुळे तापमान कमी होण्यास या वृक्षांची मदत होते. या रोपांसाठी पाणी कमी लागतं. ट्री गार्डची गरज नाही आणि जनावरंही करंजाची रोपं खात नाहीत. 

– बाळासाहेब काळे.

No comments:

Post a Comment