Thursday 16 November 2017

कुरुंजीतलं गमभन





आपल्याला माहीत आहेच की मुलं मोठ्यांचं सतत निरीक्षण करत असतात आणि या निरीक्षणातल्या गोष्टी मुलांच्या वागण्यात झिरपत जातात.
कुरुंजीत आजीआजोबा, आईवडील, मुलं अशी एकत्र राहणारी कुटुंबं आहेत. त्याशिवाय चुलत, आते, मामे कुटुंबं पण शेजारीपाजारी राहतात. त्यामुळे मुलं नात्यांच्या एका विस्तृत पटाला सामोरी जात आहेत. चुलत भावंडं सख्ख्याइतकीच जवळची. आते, मामे भावंडंसुद्धा जवळची. त्यामुळे खूप वेगवेगळ्या वयाची मोठी माणसं, मुलं सतत एकत्र असतात.
यामुळे आपल्यापेक्षा लहानांची आणि वयस्करांची काळजी घेणं आपसूकच त्यांना समजतं.
कुरुंजीच्या देवीचं मंदिर नदीजवळ आहे. एकदा मुलांचा एक कंपू मला घेऊन देवळात गेला. यात बारा-तेरा ते सहा अशा वयाची बरीच मुलं-मुली होती. देवळापलीकडे एक शेत आणि नंतर नदी. एक मुलगा म्हणाला, चला आपण पाण्यापर्यंत जाऊया. लगेच त्यातले मोठे दोघे म्हणाले, नको. आपल्याबरोबर लहान मुलं आहेत. आपण नाही पाण्यात जायचं. आणि सगळी मागे वळाली.

कुरुंजीपासून एक-दीड तासाच्या चालायच्या अंतरावर डोंगरावर कचरेवाडी आहे. या वाडीतली मुलं शाळेच्या वसतीगृहात राहतात. दर शनिवारी चालत घरी जातात आणि सोमवारी परत येतात. तेरा-चौदा वर्षाच्या मुलामुलींबरोबर या वर्षी एक सहा वर्षाचा मुलगा पण आलाय.
एका शनिवारी शाळा सुटल्यानंतर गावातली मुलं आणि मी घरी परत येत होतो. रस्त्यात हा सहा वर्षाचा मुलगा एकटा चालत जाताना दिसला. मुलांनी त्याला विचारलं तर म्हणाला, बाकीचे आले नाहीत मी एकटा घरी चाललोय. गावातल्या मुलांचा जीव कासावीस. दोघे त्याच्या बरोबर थांबले, एक पळत पुन्हा शाळेत गेला. कचरेवाडीच्या मोठ्या मुलांना सांगितलं. तीही निघतच होती. त्यांना गडबड केली, सोबत आणलं आणि त्या सहा वर्षाच्या मुलाला जोडून दिलं. खरं तर गावातली मुलं निघून जाऊ शकली असती, पण एकत्र कुटुंबामुळं लहानांची काळजी करणं हा त्यांच्या वृत्तीचा भाग बनला आहे.
गावात वयस्कर मंडळी भरपूर. बहुसंख्य जणांचा मुक्काम घराबाहेर अंगणात किंवा गावात मध्यावर असलेल्या मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर असतो. येता जाता मुलांना हाक मारणं, कामं सांगणं चालू असतं, मुलं पण कुठल्या आजोबांना नाही म्हणत नाहीत. काही आजोबा रागराग करतात, शिव्या देतात पण मुलं ते स्वीकारतात किंवा काणाडोळा करतात.


आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे वयपरत्वे म्हाताऱ्या माणसांना कपड्यांचं भान राहत नाही. पण मुलं त्याकडे लक्ष देत नाहीत. एकदा आम्ही एका घराशेजारून चाललो होतो. तर समीर पोक्तपणे म्हणाला इकडून नको आपण पलीकडून जाऊ. मी कारण काय असावं असा विचार करत बघितलं तर त्या घरातली म्हातारी बाई तिथंच शू ला बसली होती. या गोष्टी लहान वाटतील. पण आजच्या चौकोनी कुटुंबाच्या काळात मुलांना म्हाताऱ्या माणसांच्या अशा गोष्टी स्वीकारणं जड जातं हे बघितलं आहे.
मुलं मला फिरायला सोबत नेतात तेव्हा त्यांचं माझ्याकडे लक्ष असतं. माझी पर्स, पिशवी धरतील, आधारासाठी मजबूत काठी तोडून आणतील, खूपच उतार असेल तर मला हाताला धरून नेतील. लहान-मोठ्यांची काळजी घेणं हा त्यांच्या वाढण्याच्या प्रक्रियेतला भाग बनला आहे.
गावात मुलांना कुठेही मोकळेपणाने हिंडण्याफिरण्याची पूर्ण मुभा असते. दहा-बारा वर्षाची मुलं जनावरं चरायला किंवा नदीवर पाणी पाजायला घेऊन जातात. एकटे किंवा सोबतीने. अंधार व्हायच्या आत घरी येणं महत्त्वाचं. अंधारात मुख्यतः सापाची जास्त भीती असते म्हणून!
गावातले सगळे एकमेकांना ओळखत असतातच. त्याबरोबर आजूबाजूच्या गावचे पण ओळखत असतात.
नववी-दहावीच्या मुलींबरोबर गप्पा मारताना भीती हा विषय निघाला. कशाकशाची भीती वाटते यावर मुली साप, भूत, अंधार असे उल्लेख करत होत्या. रस्त्यावरून एकट्या जात असताना भीती वाटत नाही का? मी विचारलं. त्यात काय भीती वाटण्यासारखं आहे? असा प्रतिप्रश्न मुलींनी केला. मी म्हटलं, रस्त्यावरून एकटं जाताना कुणी येईल असं नाही का वाटतं? मुलींना ही भीतीच समजली नाही. सगळे तर ओळखीचे असतात, कोण काय करणार, असा त्यांचा सूर होता. या मुली किती भाग्यवान असेच वाटून गेलं. खरं तर, मुली बैल चरायला घेऊन जात असतात तेव्हा बरेचदा रस्ता निर्मनुष्यच असतो. पण माणसांची भीती नाही हे किती चांगलं !
- रंजना बाजी

No comments:

Post a Comment