Thursday 2 November 2017

कुरुंजीतलं गमभन




मी कुरुंजीत ज्या घरी जेवते तिथे एक आज्जी आहे. आज्जीला एकच मुलगा आणि तीन चार मुली आहेत. सुरुवातीच्या काळात शहरी पद्धतीने मी तुमचे वय काय असे विचारले तर आज्जीने हात हलवून माहीत नाही असा इशारा केला. तिचा मुलगा शेजारीच बसला होता, तो म्हणाला, असेल सत्तर पंचाहत्तर.
आज्जी सतत कामात असते. कोंबडी हा तिचा आवडता विषय असावा. घरात नेहमी कोंबड्या असतात. कोंबड्यांनी घातलेली अंडी त्यांच्याकडून उबवून घेऊन त्या पिल्लांकडे लक्ष देणे ती आवडीने करते. मागे एकदा मुलीकडे गेली तर मुलीने एक कोंबडी भेट दिली...आज्जी या कोंबडीला सवय होईपर्यंत पाय बांधून घरात खाटेला बांधून ठेवायची. नंतर कोंबडीने अंडी दिली तर ती नीट तिच्याकडून उबवून घेतली. येताजाता कोंबडी तिच्या पिल्लांबरोबर आणि आज्जी कौतुकाने तिच्याकडे बघताना दिसायची.

पुढच्या वेळेला गेले तर एकही पिल्लू नाही. पिल्लं कुठं गेली या प्रश्नाला, दोन तीन घरातल्या देवाला कापली, गोठ्यातल्या गाईनं दोन तोंडात धरली, ती ओढून घेताना मेली असा हिशेब मिळाला. काही कावळ्यांनी पण उचलली होती.
सर्व म्हाताऱ्या माणसांप्रमाणे आम्ही आमच्या काळात किती कामं करत होतो आणि आत्ता कशी कामं नसतात हे तिचं पण म्हणणं असतं.
आज्जी म्हणजे एक चालता बोलता इतिहास आहे. जुन्या काळच्या खूप गोष्टी तिच्याबरोबर बोलताना कळत राहतात.
पूर्वी रस्ता नव्हता त्यामुळं भाटघर धरणाच्या पाण्यातनं लांचीतून ( लाँच मधून) भोरला जावं लागे. घर सामान आणायचे असेल तर समोरचा डोंगर चढून उतरून पलीकडच्या गावाहून जड जड पिशव्या वाहून पायी यावं लागे. पायली पायली भात घरात कांडावा लागे, पूर्वी कशी चारचार दिवस लग्नं व्हायची इ. अनेक गोष्टी तिच्याकडून ऐकायला मिळतात.
कितीही म्हातारं झालं तरी आपल्याला झेपेल तसं काम करून घराला हातभार लावायचा हा गावातल्या सगळ्या म्हाताऱ्यांचा गुण आज्जीतही आहे.
आज्जी कधी बसून नसते. सतत काही काम सुरू असते. घरात, बाहेर. या पावसाळ्यात पण ती तिला झेपेल इतका भात लावायला शेतात उतरली होती. दुपारी डोक्यावर पदर घट्ट बांधून ती शेतात तण काढताना पण दिसते. कोंबडया बघणं असेल, घरातल्या गाई बैलांना वैरण पाणी देणं असेल, झाडून काढणं असेल ती करते. स्वैपाक मात्र ती करताना दिसत नाही. पण भांडी घासेल. घरात नात आहे तिच्याकडून कामं करून घेईल. उन्हाळ्यात ती गावातल्या बायकांबरोबर दुपारी गोधडी शिवताना सुद्धा दिसली होती.
सहा महिन्यांपूर्वी आज्जी खूपच आजारी पडली. ससूनमध्ये ठेवावं लागलं, दहा पंधरा हजार खर्च झाले. डिस्चार्ज मिळाल्यावर पुण्याहून परस्पर ती गोष्टीतल्या म्हातारीसारखी पलीकडच्या गावातल्या मुलीकडं गेली आणि विश्रांती घेऊन टुणटुुणीत बरी होऊन आली.
आज्जीकडे पारंपरिक माहितीचा साठा आहे. एकदा तिच्या दारात गप्पा मारत बसलो असताना घरासमोरच्या रस्त्याच्या कडेला उगवलेल्या प्रत्येक झुडपाचं नाव, वैशिष्ट्य आणि औषधी उपयोग ती सहज बोलता बोलता सांगत होती. पूर्वी तिनं सुईणीचं काम केलंय. त्यात खूप महत्त्वाचा मुद्दा तिनं बोलताना सांगितला. ती म्हणाली, आमच्या काळात बायका आपणच बाळंत हुयाच्या. सुईण सगळ्यांना न्हवती लागत, कधीतरी फार अडचणीचं असंल तर सुईण बोलवायची.
आज्जी जेवताना कधी ताट घेत नाही. भाकरी मांडीवर ठेवेल, लहान ताटलीत किंवा वाटीत भाजी आमटी घेईल आणि हळू हळू चावत जेवेल. स्वतःला अगदी कमी महत्त्व द्यायची पूर्वीची पद्धत तिच्या वागण्यात दिसते.
झाडपाल्याची बरीच माहिती असली तरी आजकालच्या खेड्यातल्या लोकांप्रमाणे आज्जीला सुई टोचून घेतली, डाक्टरचं औषध घेतलं तरच बरं वाटतं. आधी कधीतरी विकत घेतलेली आणि खायची राहिलेली औषधं तिच्या पिशवीत असतात. एकदा तिनं मला अंगदुखीवर हे औषध खाऊ का म्हणून एक स्ट्रीप दाखवली. कधीच्या काळातल्या Amoxicilin च्या गोळ्या होत्या. गोळ्या डॉक्टरनं दिल्याशिवाय खायच्या नाहीत असं सांगितल्यावर तिनं काढून ठेवल्या.
गावातल्या सगळ्या लोकांप्रमाणे आज्जीचा गावातल्या देवीवर खूप विश्वास. शेजारच्या फार्महाऊसमधल्या माणसाला कित्येक दिवस मूल बाळ नव्हतं. त्यानं कुरुंजाई देवीला नवस केल्यावरच त्याला मुलगा झाला यावर तिला पूर्ण विश्वास आहे.
गावापासून बऱ्याच लांब असलेल्या देवळात जाताना ती घरापासूनच अनवाणी जाते. ती देवाकडं काही फार मागत असावी असं वाटत नाही. आहे त्यात ती समाधानी दिसते.
पुस्तकातच जगण्याचे धडे शोधू पाहणाऱ्या आजच्या काळात जगण्यातूनच जगण्याचं ज्ञान मिळवणारी असली माणसं हळूहळू संपत चालली आहेत याचं वाईट वाटत राहतं.
- रंजना बाजी

No comments:

Post a Comment