Friday 24 November 2017

कुरुंजीतलं गमभन : खेडेगावात मुलं वास्तवात जगतात


शहरात, विशेषतः मध्यमवर्गातल्या घरात, मुलं आणि मोठे, असे दोन वेगवेगळे भाग असतात. मोठ्यांचे काम घराबाहेर आणि शक्यतो बैठे, कॉम्प्युटर सोबत असते. तिथं मुलांच्या दृष्टीनं बघितलं, तर कोणतीही प्रक्रिया घडताना दिसत नाही. मुलांचा सहभागही नसतो. घरकामात बऱ्याच गोष्टी आउटसोर्स केल्या जातात. कपडे धुणे, भांडी घासणे, स्वच्छता, स्वैपाक इ. यासाठी मशिन्स किंवा कामवाल्या बायका/ पुरुष असतात. त्यामुळे हे काम मुलांपर्यंत पोचत नाही. पुन्हा, मुलांनी शाळा, अभ्यास यावरच फोकस करावे, या अंधश्रद्धेमुळे घरात घडणाऱ्या या प्रक्रियांपासून मुलांना लांब ठेवण्यात येते. मुलांचा वेळ जावा म्हणून त्यांना रिझवायला तयार खेळणी विकत आणली जातात.
खेड्यात तसे नसते. खेडेगावात मुलं वास्तवात जगतात. म्हणजे खूप लवकर ते घराचा एक उपयुक्त घटक बनतात आणि खऱ्या जीवनाला भिडतात. कुरुंजीत मी बघते, की मोठ्या भावंडांना धाकट्यांची काळजी घ्यावी लागते. मुलींना घरकाम, मुलामुलींना बाहेर शेतात, जनावरांचं बघावं लागतं. आईवडील शेतात अडकलेले असतात. त्यामुळं मुलामुलींना हे करावंच लागतं. उन्हाळ्यात बरीच घरं दुरुस्तीला काढली जातात. दुरुस्तीच्या कामातही मुलं सहभागी असतात.




मुलांचे खेळणे दोन प्रकारांनी होताना दिसते. एक म्हणजे ते जे काही काम करत असतात, त्यात खेळकरपणा आणणे आणि दुसरे आपण प्रत्यक्ष घेतलेले अनुभव पुन्हा स्वतःच्या पद्धतीने जगून बघणे.
मुलं जे काही करत असतात त्यात खेळकरपणा आला, की तो आपल्या मोठ्यांच्या दृष्टीने त्यांचा खेळ होऊन जातो. मुलं बैलांना चरायला रानात घेऊन जातात तिथं रानमेवा जमा करतात, पाण्यात, मातीत खेळतात, थंडीत शेकोटी करतात, उन्हाळयात नदीत पोहतात. पावसाळ्यात भात लावायला माणसांची नितांत गरज असते. मुलं प्रसंगी शाळा चुकवून भात लावायला शेतात जातात, तेव्हा त्याचाही आनंद घेतात. मळणी चालू असते तेव्हा भाताच्या राशीत मुलं लोळतात, उड्या मारतात.
समीरला कोंबडीची पिल्लं खूप आवडतात. गेल्या वर्षी, त्याच्या कोंबडीने दहा अकरा अंडी घातली होती. ती उबवून त्यातून पिल्लं बाहेर पडली. या वर्षीही त्याच्या घरी आठ पिल्लं आहेत. घरातली कोंबडी आणि पिल्लं ही आता समीरची जबाबदारी झाली आहे. त्यांना दाणा-पाणी देणं, त्यांना डाळग्यात ठेवणं, त्यांचं रक्षण करणं ही त्याची कामं आहेत. तो या सगळ्यात खूप रमतो. या कामातून त्याचं कोंबड्यांबद्दल ज्ञान वाढताना दिसतं.
गेल्या शनिवारी, तो आणि गावातल्या दोन आज्ज्या गंभीरपणे अंड्यातून पिल्लू बाहेर येण्याबद्दल चर्चा करत होते. काही वेळा, पूर्ण दिवस भरले, तरी एखादं अंडं फुटत नाही. तेव्हा अंडं अलगदपणे सोलून पिल्लू बाहेर काढावं लागतं, ते लगेच ऊबेला कोंबडीखाली ठेवावं लागतं. समीरच्या कोंबडीनं अश्या पिल्लाकडं चक्क दुर्लक्ष केलं, तेव्हा त्याने ते पिल्लू बाकीच्या पिल्लांच्या मधोमध ठेवून त्याला जगवलं आणि मग कोंबडीनं त्याला स्वीकारलं. हे सगळं, समीर त्या प्रक्रियेतून स्वतः गेल्यामुळं समजू शकला. आपण याला खेळ म्हणू शकू. पण ही जगण्यातून आपोआप ज्ञान मिळण्याची प्रक्रिया आहे.
तसंच मुलांना शेतीबद्दल, झाडांबद्दल, जनावरांबद्दल असलेल्या समजेचं पण आहे. डोंगरावरच्या धनगरवाड्यातून बैल खरेदी करून गावात आणला, तेव्हा तो माणसांच्या वर्दळीमुळे बुजला, हे मुलांनी त्याला पाण्यावर नेताना समजून घेतलं. गावात कुठल्या झाडाला कधी फळ येतं, कुठल्या आंब्याला चांगल्या चवीची फळं येतात, कधी येतात हे सगळं त्यांना माहीत असतं.




मुलं एखादा अनुभव पुन्हा स्वतःच्या पद्धतीनं जगून बघत असतात, तेव्हा त्यांना त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ती स्वतः बनवतात. या वस्तूंना आपण मोठी माणसे खेळणी म्हणतो.
एकदा राधा( वय 6) आणि केतकी (वय 8) त्यांच्या घरासमोर बसून बाहुल्या बनवत होत्या. राधानं क्रूसाच्या आकारात दोन काडया जोडून त्याला कापड गुंडाळून त्याच्या बाहुल्या बनवल्या. जरीचं कापड साडीसारखं नेसवलेली नवरी आणि साधं कापड गुंडाळलेला नवरा. नवरीच्या गळ्यात मण्यांची माळ सुद्धा घातली होती. केतकीने बनवलेल्या दोन्ही बाहुल्या साडी नेसलेल्या होत्या. तिनं सांगितलं की या जावा जावा आहेत. मी कधी बाहुल्यांमध्ये, हे नातं बघितलं नव्हतं. तिच्या घरात आई आणि काकू असल्यामुळे तिला ते नातं जवळचं वाटलं असावं.
मुलांच्या खेळण्याबद्दल खूप गोष्टी मी नोंद केल्या आहेत. त्याबद्दल पुन्हा पुढच्या वेळी……….
  रंजना बाजी

No comments:

Post a Comment