Thursday 9 November 2017

डोंगरातली सयाआज्जी


दूर डोंगरात वसलेलं कळमनुरी तालुक्यातलं करवाडी हे आदिवासी गाव. जेमतेम २०० लोकवस्ती. अजूनही गावात जायला रस्ता नाही, सहा किलोमीटरची पायपीट करावी तेंव्हा डांबरी रस्ता नजरेला पडतो.
अशा दुर्गम गावातली 65 वर्षीय सयाबाई खोकले घरासमोरच्या दगडावर बसून सांगत होती, "या गावातल्या रस्त्यावर फिरणारं प्रत्येक पोरगं माझ्या हातावर जन्माला आलेलं आहे बाबा." याचं कारण सयाबाई या गावातील दाई आहेत. गावातले अंध समाजाचे आदिवासी लोक तिला सुईण म्हणतात. आणि सारा गाव तिला प्रेमाने सयाआज्जी म्हणून हाक मारतो. सयाआज्जी या गावासाठी देवदूत आहे. कारण या गावात कुण्या गरभारणीचं पोट दुखू लागलं तर या गावातले लोक अम्ब्युलन्स, जीप किंवा कारवाल्याला फोन करत नाहीत तर ते सयाआज्जीच्या घराची वाट चालू लागतात.
कारण गावाला रस्ता नाही. त्यामुळं तिथं कुठलंच वाहन पोहचू शकत नाही. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे नांदापुरला. ते सहा किलोमीटरवर. म्हणजे तेवढं चालणं आलं. कळा सुरु झाल्यावर गरोदर बाईला तेवढं चालवत नेणंही कठीण. त्यामुळेच घरी बाळंतपण केलं जातं. सयाआज्जी आजही सफाईदारपणे बाळंतपणं करते.
“तुमच्या हातावर कुणी बाळंतीण दगावली का?” सयाआज्जी सांगते, "नाही बाप्पा, एकसुद्धा नाही, अर उलट त्या पलीकडच्या गावात डॉक्टरची पोरगी बाळंत झाली तेंव्हा त्या डॉक्टरनंबी माझ्याच हातावर बाळंतपण केलं, त्योच डाक्टर दुसऱ्या बाईचे बाळांतपणाला पाच पाच हजार घ्यायचा अन माझ्या हातावर शंभर टेकवले बाबा."
सयाआज्जीने तिच्या हयातीत दोनशे ते अडीचशे बाळंतपणं केली आहेत. सयाआजी गरिबीत दिवस काढते. रोजगारावर काम करते. पण, बाळंतपणाचे पैसे घेत नाही. गावातले लोक तिला लुगडं चोळी नेसवतात. ती समाधानाने सांगते, "मी पैसे नाही घेत बाबा. पर मला साऱ्या हयातीत, एकदाही लुगडं इकत घ्याया नाही लागलं, ह्याच्यातच समदं आलं."
सरकार, विविध सामाजिक संस्था बाळंतपणं दवाखान्यात सुरक्षितपणे व्हावीत, यासाठी प्रयत्नशील आहेत. या लक्ष्याकडे वाटचाल सुरूच आहे. मात्र सयाआजीसारख्या पारंपारिक सुईणी, दाया यांचं ज्ञान आणि अनुभव कोणी नाकारत नाही. गडचिरोलीत डाॅ अभय-राणी बंग यांनी अशा दायांनाच प्रशिक्षण देऊन बालमृत्यू रोखण्याच्या कामात सहभागी करून घेतलं. खरंच, अशा अनेक सयाआजी आरोग्यसेविका बनू शकतील, हे निश्चित. 


- दत्ता कानवटे.

No comments:

Post a Comment