Sunday 19 November 2017

जिगरबाज शिवाजी

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड गावातला शिवाजी आवटे. वय वर्ष ५०. एका हाताने अपंग असूनही बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीच्या हाताखाली ते काम करतात. शिवाजीला वयाच्या तेराव्या वर्षी अपंगत्व आले. उच्च वीज वाहिनीच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे त्याचा डावा हात खांद्यापासून तोडावा लागला.
मात्र या अपंगत्वाचा बाऊ न करता अगदी सुदृढ माणसाला लाजवेल असं काम ते करतात. शिक्षण केवळ पाचवी. शिवाजी अत्यल्प भूधारक कोरडवाहू शेतकरी. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्याने मिस्त्रीच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली.
सिमेंट कालवलेला माल उचलून कोणाच्याही मदतीशिवाय ते बांधकामापर्यंत नेऊन टाकतात. एकाच हाताने भिंतीला प्लास्टर करणं, विटा वाहून नेणं, उंच बांधकामासाठी लागणारे बांबूचे पालकही बांधणं, एवढंच काय, गाजळीची बांधीही करतात. बांधकामामध्ये स्लॅब आणि पिलरसाठी बांधी करणं हे अतिशय कौशल्याचं काम समजलं जातं. काम करताना इतर मजुरांच्या चुका होतात, पण शिवाजी ते अतिशय सफाईदारपणे करतात.
मुख्य मिस्त्री रमेश वाढवे कुठेही बांधकाम निघालं की आधी शिवाजीला बोलावून घेतात. ते सांगत होते, “गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी माझ्या हाताखाली काम करतो. त्याला काम करताना पाहून तो अपंग आहे असं जाणवतच नाही. इतर मजुरांच्या तोडीस तोड काम. अपंग असल्याचं कोणत्याही प्रकारचं भांडवलसुद्धा करत नाही.”
एका हाताने शिवाजी खांद्यावर कावड घेऊन पाणी भरतात. एकाच वेळी तीन तीन घागरी उचलतात. दोन घागरी कावडीला आणि एक हातात. फिरण्याची आवड असलेले शिवाजी ५० ते १०० किलोमीटरचा प्रवास चक्क सायकलवरून करतात. हंगामाच्या दिवसात शेतीची नांगरणी, वखरणी, कोळपणी, पेरणी ही सारी कामंही ते करतात. या कामात त्यांना पत्नीही मदत करते.
शिवाजी गावातील इतर युवकांचं प्रेरणास्थान आहे. त्याला हिरीरीने आणि मोठ्या उत्साहाने काम करताना पाहून अनेकजण कामाला लागले आहेत. अपघाताने आलेलं अपंगत्व हसतमुखाने स्वीकारून सतत काम करत राहाणं. जिगरबाज शिवाजीचं हे उदाहरण हाताला काम नाही म्हणून बेकार हिंडणाऱ्या व लोकांपुढे लाचारीने हात पसरणाऱ्या लोंकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे.


- गजानन थळपते.

No comments:

Post a Comment