Tuesday 28 November 2017

मुलांना सुखी झालेलं पाहायचंय

कर्जाच्या ओझ्याने पतीने गळफास घेवून जीवन संपवले. पण त्या कर्जाचे ओझे डोक्यावर घेवून द्राक्षबाग व ऊसाला वाढवतानाच, मुलांना जगवण्यासाठी तिची धडपड सुरु आहे. आईला मदत व्हावी म्हणून मुलगा व मुलगी शिक्षण अर्धवट सोडून शेतात राबत आपल्या आईला मदत करतात. पती अर्ध्यावरती सोडून गेला म्हणून, कुढत घरात न बसता शेतीबरोबर मुलांचे आयुष्य फुलवण्यासाठी सुनंदा यांचा संघर्ष सुरु आहे.
निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर येथील सुनंदा हाडंसंगे. पती श्रीशैल चंद्रशा हाडसंगे यांनी कर्जबाजारी झाल्याने ४ जुलै २०१५ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सात एकर शेती त्यात तीन एकर द्राक्षबाग. त्यासाठी श्रीशैल त्यांनी कर्ज घेतलं होतं. २५ लाखाच्यावर कर्जाचे डोंगर डोक्यावर उभा राहिला. आणि त्या ताणापायी त्यांनी जीवन संपवले. दोन वेळच्या जेवणाला कुटुंब महाग झाले. पत्नी सुनंदा यांनी धीर सोडला नाही. शेतात कधी काम केलं नव्हतं. अचानक जबाबदारी अंगावर पडली. आणि त्यांनी शेती कसायला सुरूवात केली. मोठा मुलगा अमगोंडा, मुलगी रोहिणी दोघेही शाळा सोडून आईच्या मदतीसाठी शेतात राबू लागले. या तिन्ही मायलेकरांनी दिवसरात्र कष्ट करून द्राक्षबाग फुलविली. त्यासाठी नातेवाईकांनी आर्थिक मदत केली.
जिद्द व मेहनतीने सुनंदाने पुन्हा द्राक्षाबाग फुलविली. यावर्षी तीन एकर द्राक्षापासून त्यांनी पाच टन बेदाणा उत्पन्न काढलं. आता नव्याने दोन एकर ऊसाची लागवड केली आहे. पतीच्या आत्महत्येनंतर सरकारी मदत मिळाली नाही. पण नातेवाईकांच्या मदतीने ती जिद्दीने शेती करत आहे. मुलगा अमगोंडा जबाबदारीने साथ देतोय. धाकटा मुलगा सोमलिंग सध्या वाघोली ( जि. पुणे) येथे आठवीत शिकत आहे. त्याला जैन सामाजिक संघटनेने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
“घरातील कर्ता गेल्याने मुलांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आता मला मुलांना सुखी ठेवायचंय. बँकेने ३२ लाख कर्ज भरण्याची नोटीस दिली आहे. पण सध्या माझ्यासमोर मुलांना जगवण्याचा प्रश्न आहे. त्यासाठी मी राबतेय. मुलगा हाताला आल्याने आधार वाटतोय. मुलीच लग्नही करायचं आहे. मला जगण्याबरोबर मुलांना सुखी झालेल पाहायचंय. म्हणून मी सारं दु:ख बाजूला ठेवून राबतेय,” असं सुनंदा यांनी सांगितलं.

- गणेश पोळ.

No comments:

Post a Comment