Sunday 5 November 2017

शाळा फक्त 'ती'च्यासाठी


तनूला शाळेत कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत. ती एकटीच डबा खाते. एकटीच घरी येते. असं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे... तिच्या शाळेत ती एकटीच शिकते! वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावातली जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा. या शाळेची विद्यार्थीसंख्या आहे फक्त एक.तिसरीत शिकणारी तनू जेव्हा शाळेत पोहोचते, तेव्हा शाळा रोज रिकामीच असते. गेल्या वर्षी पहिली ते पाचवीच्या या शाळेत दोनच विद्यार्थी होते. त्यातला एक विद्यार्थी पाचवी पास झाला आणि तनू मडावी ही एकटीच विद्यार्थिनी शिल्लक राहिली. एकच विद्यार्थिनी असल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.
शाळा बंद पडली तर तनुचं शिक्षण बंद होईल. तिला कदाचित आईसोबत शेतमजुरीलाही जावं लागेल. म्हणूनच वर्धा जिल्हा परिषदेनं या एका विद्यार्थिनीसाठी दरमाही ६० ते ७० हजार रुपये खर्च करून ही शाळा सुरू ठेवली आहे. शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं तनूची शाळा शेजारील किचनशेडमध्ये भरते. या एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी अरुण सातपुते हे शिक्षक रोज शाळेत येतात. तिच्यासाठीच रोज प्रत्येक विषयाचे तास होतात. शाळेत वीजही नसते. पण शाळा सुरू आहेच.



हिंगणघाट तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ललितकुमार बारसागडे यांनी सांगितलं की, "धोकादायक इमारत असल्यास तिथं विद्यार्थ्यांना बसवू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. विद्यार्थीसंख्या कमी असल्यानं शाळेची नवीन इमारत उभी राहू शकत नाही. परंतु, तनूची गैरसोय होऊ नये म्हणून शाळेशेजारील किचन शेडमध्ये तिच्या शिक्षणाची सोय केली आहे."
शाळेची परिस्थिती प्रतिकूल असली तरी तनू मात्र आनंदी आहे. तनूशी गप्पा मारल्यावर तिने सांगितलं, "मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे." यातून तिची शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून आली.
गटशिक्षणाधिकारी बारसागडे म्हणाले की, "विद्यार्थीसंख्या कमी असेल, तर आम्ही त्यांना शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या अन्य शाळेत वर्ग करतो. मात्र इथून तीन किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नाही. तसंच रस्ते चांगले नाहीत. गावात जेमतेम १४ घरं आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे तनुसाठी ही शाळा सुरू ठेवणं क्रमप्राप्त होतं. तिची शिक्षण घेण्याची इच्छा पाहून ही शाळा सुरू ठेवण्यात आली आहे.”
''ती शिकते याचं पालक म्हणून मला समाधान वाटतं. शाळेत विद्यार्थी नसल्याने ती एकटीच असते. वर्गात मैत्रिणीही नाहीत. तरीही तिने शिकून मोठं व्हावं, असंच आम्हांला वाटतं," तिचे वडिल राजू मडावी सांगत होते. 


- प्रतिनिधी, वर्धा 

No comments:

Post a Comment