Thursday 30 November 2017

कुरुंजीतल्या सगळ्या घरांप्रमाणेच माझं घर पण मुलांसाठी खुलं असतं.

कुरुंजीतलं गमभन :
घरात एक कपाट आहे त्यात जुन्या ओढण्या, पुस्तकं, कापडाचे तुकडे, रंग, ब्रश, कागद, पेन्सिली, कात्री, सुईदोरे, वेगवेगळे रेशीम, लोकर, क्रोशा सुया, मणी असे बरेच प्रकार असतात. स्वैपाकघरात काही भांडी आहेत त्याबरोबर पुठ्ठ्याचे मोठमोठे रिकामे बॉक्स आणून ठेवले आहेत.
लहान मुलींना स्वैपाकघर आवडतं. एके दिवशी त्यांनी, ताई तुम्ही किती गबाळ राहता असं म्हणत, सगळे डबे, भांडी मांडणीतून काढून रिकामी करून घासली, मांडणीवर वर्तमानपत्र अंथरून पुन्हा मांडली. त्यांच्या घरात या गोष्टी आया करत असतात त्याचं हे अनुकरण ! मुलींना घर, शाळा खेळायला पण स्वैपाकघर लागतं. पुठ्ठे, ओढण्या घेऊन घरं, वर्ग बनतात, त्यातल्याच कुणी आई, मूल, शिक्षक, विद्यार्थी बनतं आणि खेळ चालू असतो.मुलग्यांना कुतूहल वाटून ते डोकवायचा प्रयत्न करतात तर त्या भांडखोर चिमण्यांसारख्या अंगावर येतात. मुलं माघार घेतात किंवा हळूच आत घुसतात. मग कल्ला!
खेड्यात मुलामुलींचे हात सतत चालत असतात. गप्पा मारताना सुद्धा त्यांचं हातानं काही ना काही करणं सुरू असतं.
घरात पोस्टर कलर आहेत. मुलामुलींना रंगवायला खूप आवडतं. बहुतेक सगळेजण आले की आधी कपाट उघडून रंग, कागद काढतात आणि काम सुरू होते. ब्रश नसले तरी अडत नाही. काड्या चालतात. मयूरने एकदा काडी पुढच्या बाजूने ठेचून ब्रश बनवून घेतला होता.थोडया मोठया मुलींना विणकाम भरतकाम करायचे असते. क्रोशा आवडतो. काही जणी शिकल्या सुद्धा. आरतीला भरतकामात रस आहे. यू ट्यूब वरून बरेच व्हिडीओ मी डाउनलोड करून नेले. तिने आणि बाकीच्या मुलींनी पण नमुने बनवून ठेवलेत. मुलग्यांना शिवायला आवडते. त्यांनी छोटे बस्कर शिवलेत आणि फळा पुसायला कापडी डस्टर पण.गोट्यांचा ब्रेन व्हिटा हा गेम मुलांना आवडला. साप शिडी, लुडो पण आवडतात. बुद्धिबळाचा गेम थोड्या दिवसांपूर्वी नेलाय. सुरुवातीला मी नियम सांगितले. पण नंतर त्यांनी स्वतः नियम बनवून खेळायला सुरू केलं.
या मुलांच्या खेळण्याचं वैशिष्ट्य म्हणजे एकटं कुणी खेळत नाही. दोघेच जरी खेळत असले तरी अनेक सल्लागार बाजूला बसलेले असतात आणि त्यांचा सहभागही शंभर टक्के असतो.घरात किरकोळ दुरुस्ती किंवा काही असेल तर मुलं करतात. खिडक्यांना पडदे लावायचे होते. माझ्या दृष्टीनं काहीच मिळत नव्हतं.
 तुषार घराच्या भिंती नीट बघून आला आणि त्याला इकडेतिकडे चार खिळे मिळाले. बाहेरून मोठा दगड आणून त्याने खिळे मारून पडदे लावले.
गेल्या नवरात्रीच्या एका रात्री जेवण करून झोपायच्या बेतात असताना चार उंदीर बाहेरच्या खोलीतून आत पळताना दिसले. माझी पळापळ. देवळाजवळ मुलं दांडिया खेळायची तयारी करत होती. मी त्यांना बोलावून आणलं. घर मालकिणीनं घरात असावी म्हणून एका कोपऱ्यात मातीची चूल ठेवली आहे. मुलांनी तिथं पर्यंत माग काढला. घरात खिडक्यांना लावून उरलेली लोखंडी जाळी होती ती त्या चुलीला बांधून वर मोठे दगड ठेवून बंदोबस्त केला. अजूनही अधून मधून मुलं चूल तपासत असतात.
या सगळया खेळण्याबरोबर महत्त्वाचं घडतं ते म्हणजे गप्पा! आमच्या सतत गप्पा सुरु असतात. मी शुक्रवारी जाते. स्टॉपवरून घरी जाताना निम्मं गाव ओलांडायला लागतं.एखादं शाळेला न गेलेलं मूल मला बघून सोबत येतं. काहीतरी करत बसतं. गप्पा होतात. संध्याकाळी शाळा सुटल्यावर बरीच मुलं येतात. मग अंधार होऊन गेला तरी इथंच असतात. मग सरुबाईकडे जेवायला जाताना तीही आपापल्या घरी जातात. सकाळी सातलाच आशा, केतकी, राधा, मयूर, गौरव यापैकी कुणीतरी दार वाजवायला येतं. माझं आवरून झाल्यावर मी दार उघडते. मग आमचा दिवस सुरू होतो.
मुलांना खूप सांगायचं असतं. घराबद्दल, शाळेबद्दल, ऐकलेल्या, बघितलेल्या, केलेल्या, अनुभवलेल्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात.
गौरव अनेकदा शाळेत जाताना कंटाळा करतो. तो एकदा बोलताना पहिली पासूनच शिक्षक कसे मारत आलेत याबद्दल सांगत होता. अशा संवेदनशील मुलांना मग शाळा आवडेनाशी होते.
पहिलीतली राधा ते टी. वाय. बी. कॉम. ची आरती सगळे गप्पांमध्ये रमतात. करण आणि मयूर यांना भुताच्या गोष्टी सांगायच्या असतात. आरती आणि तिचा भाऊ प्रसाद कॉलेज बद्दल सांगतात, शाळेत जाणारी मुलं शाळेतल्या शिक्षकांच्या मित्रांच्या, घटनांच्या गोष्टी सांगतात.
माझ्यासाठी या अनौपचारिक गप्पा अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण त्यातून मुलं समजत जातात. पुढं काय करायला पाहिजे याची दिशा दिसत राहते.
रंजना बाजी

No comments:

Post a Comment