Thursday, 24 November 2016

...त्याने दिली प्रेरणा

‘आम्ही सेवक’ या संस्थेच्या माध्यमातून रवी बापटले काम करीत होते. एकदा काही कारणाने ते उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथे गेले. तिथे घडलेल्या एका विचित्र घटनेने अस्वस्थ झाले आणि तिथंच खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. गावात एक एचआयव्हीबाधित जोडपे होते. पदरी एक मुलगा. आजाराने मुलाची आई मरण पावली. नंतर या लहानशा मुलालाही एचआयव्हीचा असल्याचे समजले. तेव्हा कुटुंबीयांनी या मुलाला त्याच्या पित्यासह वाळीत टाकले. एका पडक्या खोलीत त्यांची रवानगी झाली. काही काळातच या मुलाचा अन्नपाण्यावाचून मृत्यू झाला. आजाराचा संसर्ग होईल या गैरसमजामुळे त्याच्या मृतदेहाकडे तब्बल तीन दिवस कोणीही लक्ष दिले नाही. हे पाहून बापटले यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने या मुलावर अंत्यसंस्कार केले. याच घटनेमुळे बापटले यांच्या मनात ‘सेवालया’चे बीज रूजले. 
हासेगाव ता. औसा जि. लातूर येथे रवी बापटले यांनी २००७ मध्ये सेवालय सुरू केले. सध्या या सेवालयात ७१ मुलं आहेत. त्यांच्या या कामाला समाजातून मोठा विरोध झाला. मात्र, त्यांनी खंबीरपणे उभे राहत सरकारी अनुदानाशिवाय हे केंद्र चालविले. स्वत: अविवाहित राहून हा प्रपंच त्यांनी व्यापक केला आहे. अशी अनेक लहान मुले त्यांनी न केलेल्या दोषाची शिक्षा भोगत असतील, अनाथ व बहिष्कृत होऊन जगत असतील या विचाराने एचआयव्हीबाधित मुलांसाठी सेवालयाची स्थापना केल्याचे ते सांगतात. 
बापटले यांनी हासेगावच्या माळरानावर नंदनवन फुलवले आहे. सेवालय उभारून ७१ मुलांचे आईबाप बनून ते संगोपन करीत आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी, परदेशी फंड न घेता लोकांच्या दातृत्वावर हे सेवालय चालते. याच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शांतेश्वर मुक्ता यांचे आजोबा कै. मन्मथ अप्पा मुक्ता यांनी सेवालयाला साडेसहा एकर जमीन दान केलेली आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी सेवालयाचे पालकत्व स्वीकारले आहे. 
शिकायला मिळणे हा प्रत्येक बालकाचा हक्कच. पण तो हक्कही इथल्या ग्रामसभेने डावलला होता. शेवटी लातूरमधील पत्रकार व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुलांच्या पाठीशी उभे राहत हसेगावच्या जिल्हापरिषद शाळेत या मुलांना प्रवेश देणे भाग पाडले.
आज एचआयव्हीबद्दलची दहशत काहीशी कमी झाली असली तरी एचआयव्हीबाधित व त्यांच्या मुलांचे प्रश्न अजूनही कायम आहेत. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर या मुलांचे मोठे हाल होतात. अशा मुलांना येथे आधार दिला जातो, मायेने सांभाळले जाते, एवढेच नाही तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. 
 चिमुकली मुले लवकरच १८ वर्ष पूर्ण करणार आहेत. आता पुढे काय, या विचारातून अस्वस्थ झालेल्या बापटले यांच्या चिंतनातून ‘हॅप्पी इंडियन व्हिलेज’चा (एचआयव्ही) चा जन्म झाला. सज्ञान मुलांच्या पुनवर्सनाचा हा देशातील एकमेव प्रकल्प असावा. आर्थिक पायाबांधणीला हीच मुले पुढे सरसावली. स्नेहा शिंदे यांच्या सहकार्यातून मुलांनी 'हैप्पी म्युझिक शो' सुरु केला. आणि त्यातून होणाऱ्या अर्थप्राप्तीतून संस्थेचं बरचसं कामकाज चालतं. मायेचा पदर आणि बापटले यांच्या आश्वासक खांद्यांचा आधार घेऊन हे बाळगोपाळ वाटचाल करीत आहेत.

रवी बापटले यांचा मोबा. क्र. - ९५०३१७७७००

शिवाजी कांबळे - लातूर.

महिलांनी बनवलेल्या सुताने गाठलं Amazon ऑनलाइन शॉप


दिवसभर शेतात राबल्यावर प्रियंका शिंदेंच्या हाती ८० रुपये पडायचे. याच पैशात घर चालवायचं. हे मजुरीकामही मोसमी. पेरणी आणि कापणीच्या हंगामात हाताला उसंत नाही. आणि एरवी मात्र बेरोजगारी ‘आ’ वासून उभी. पण सोलर चरख्यावर सूतकताई प्रकल्पात त्यांना काम मिळालं आणि परिस्थिती पालटून गेली. दिवसाला १५० ते २०० रुपये आणि वर्षभर हाताला काम मिळू लागलं. ही गोष्ट एकट्या प्रियंकाची नाही. आता अमरावतीतल्या किमान १०० जणींच्या बाबतीत हेच घडलं. कसं ?
महाराष्ट्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग मंडळाने ग्रामीण भागातील जनतेच्या उन्नतीसाठी सोलर चरख्याद्वारे सूत तयार करण्याची योजना सुरु केली. पहिल्या प्रयोगासाठी निवडला गेला कापूस उत्पादक अमरावती जिल्हा. प्रदीप चेचरे या खादी ग्रामोद्योग अधिकाऱ्याने ही योजना कल्पकपणे राबवून दाखवली.

प्रत्येक गावातून दहा याप्रमाणे जिल्ह्यातील १३ गावांतील दारिद्रयरेषेखालील १३० महिलांचे गट तयार करण्यात आले. प्रदीप चेचरे सांगतात, "अमरावती जिल्ह्यातला हा पथदर्शी प्रकल्प. तो यशस्वी व्हावा एवढा एकच ध्यास मनात होता. या प्रकल्पामुळे घडून येणारा बदल महिलांना समजावून सांगण्याचं आव्हान आमच्यापुढे होतं. कारण बचत गटांचा अनुभव काहीसा वेगळा होता. अधिकाधिक महिलांनी यात सहभागी व्हावं यासाठी त्यांच्या बैठका घेत प्रत्येकीला विश्वासात घेत प्रकल्पाचा फायदा समजावून सांगितला. त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल हे सांगितलं. परिस्थितीशी झगडणार्‍या या महिलांना प्रकल्पाचा फायदा लक्षात आला अन कामाला सुरुवात झाली. बऱ्याचशा बाया शेतकरी कुटुंबातल्या किंवा शेतमजूर. त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचीही गरज होती.
चेचरे यांनी वर्ध्याच्या ‘महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण’ (mgiri) या संस्थेशी संपर्क साधला. त्यांच्याकडून महिलांना सोलर चरख्याच्या सहायाने सूतकताईचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर दहा स्पिंडल आणि दोन तासाचा बॅटरी बॅकअप असलेले सोलर चरखे या गटांना पुरवण्यात आले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विशेष घटक योजनेतून प्रत्येकीला राष्ट्रीयकृत बँकेकडून ५० हजारांचं कर्ज आणि त्यावर मंडळाकडून १० हजारांचं अनुदानही दिलं गेलं. कच्च्या मालाचा पुरवठा, सूत तयार करून घेणे, सूत खरेदी, कर्जाची परतफेड, तांत्रिक सहकार्य यासाठी ‘कस्तुरबा सोलर खादी महिला समिती’ असा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.
सूतकताई सुरु झाली. यातूनच कापडनिर्मिती सुरु झाली तर या महिलांची अर्थप्राप्ती वाढू शकेल हे चेचरे यांच्या
लक्षात आलं. मग त्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जळगावातल्या एका कारखान्याने कापडनिर्मितीत रस दाखवला.कापडाची विक्रीही सुरु झाली. तेव्हाच केंद्र आणि राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना एक दिवस खादी वापरण्याचं आवाहन केलं. त्यामुळे प्रकल्पाने कपडे बनवण्याचा टप्पाही गाठला.
अमरावतीतल्या शर्ट तयार करणाऱ्या व्यावसायिकाशी करार करण्यात आला. आणि एका महिन्यात ५०० शर्ट याप्रमाणे उत्पादन सुरु झालं. याशिवाय कुर्ती, हातरुमालही तयार होऊ लागले. उत्पादन सुरु झाले. पण विक्रीचं काय? मग शासकीय कार्यालयांमधून स्टॉल लावण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हुरूप आला. या कपड्यांना १००० ते १२००रु किंमत मिळाली. जून २०१६ मध्ये मुंबईत सचिवालयात स्टॉल लागला. आणखी विक्री झाली. विशेष म्हणजे या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यामध्ये सूतकताई करणाऱ्या महिलांची भागीदारी आहे.
आता चक्क ‘Amazon ऑनलाईन शॉपवर 'ईश्वरी टेक्सटाईल्स प्रोडक्ट - ग्रीन फॅब' या नावाने ही उत्पादनं उपलब्ध आहेत, तर महाबळेश्वरला पहिलं खादी उत्पादन विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे. शेतमजुरीवर गुजराण करणार्‍या महिलांना आर्थिक उत्पन्नाचा नवा आणि स्थिर मार्ग मिळाला.
महिलांच्या प्रगतीची आस आणि योग्य नियोजन यामुळे प्रदीप चेचरे हे काम उभं करू शकले.
(प्रदीप चेचरे - संपर्क - 09561737772)
- अमोल देशमुख, अमर

Saturday, 12 November 2016

वाशिमच्या लेडी सिंघम ज्योती विल्लेकरवाशीम शहर. एक लाख लोकसंख्येचं. दुचाकी १८ हजार तर चार चाकी दोन ते अडीच हजाराच्या आसपास. ही फक्त खाजगी वाहनं. प्रवासी वाहनांची संख्या वेगळी. इतक्या वाहनांची रोज शहरातून ये-जा. यातल्या ४०टक्के वाहनांवर फॅन्सी नंबर तर काहींवर नंबर प्लेट्सच नाहीत. हे सगळं प्रथम हेरलं ज्योती विल्लेकर यांनी. चार महिन्यांपूर्वी वाहतूक शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्या रुजू झालेल्या. पदभार स्वीकारताच वाशीम शहरातल्या नियम न पाळणार्‍या वाहनांवर त्यांनी धडक कारवाई सुरु केली. बेशिस्त वाहन चालवणारा दिसला की कारवाई ठरलेलीच. जी वाहनं नंबर प्लेटविना धावत होती त्यांवर नंबर प्लेट लागल्या. बाकी नियमभंग करणारेही शिस्तीने वागू लागले. आणि वाशिम शहर वाहतूक विभागाच्या चांगल्या कामाची दखल घेणं सुरू झालं. लेडी सिंघम अशी ज्योतीताईंची ओळख बनली. मात्र, पोलीस विभागाची दहशत लोकांना बसावी, असं ज्योतीताईंना नको होतं. त्यांना शिस्त आणायची होती. म्हणून लोकसंवादाचे अनोखे मार्ग शोधले. रक्षाबंधनाच्या दिवशी विभागातील सर्व महिला पोलिसांना घेऊन शहरातील दुचाकी प्रवासी, विनापरवाना वाहन चालवणारे, अवैध प्रवासी वाहनचालक, बेशिस्त वाहनचालक या सगळ्यांना सुरक्षाबंधन बांधलं. तर पोळ्याच्या दिवशी सर्व जनावरांच्या शिंगांना रेडियम लावून शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं. गणपती उत्सवात वाहतुकीवर खूप ताण येतो. या वर्षी पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांना मदतीला घेऊन वाशीम शहरात वाहतूक व्यवस्थापन केलं गेलं.
समस्या सोेडवण्यासाठी लोकांचाच सहभाग घेतला की लोक आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडतात, हे वाशीम वाहतूक विभागाने दाखवून दिलं. 
एक महिला आणि सोळा पुरूष वाहतूक शिपाई एवढा विल्लेकर यांचा स्टाफ. या चार महिन्यात त्यांनी ४,०२८ वाहनांवर केसेस केल्या. रु ३,९२,६००रुपये दंड वसूल करण्यात आला. आता नव्वद टक्के वाहनांवर नंबर प्लेट लागल्या आहेत.
२०१४ सा्ली १३,८६१ केसेस केल्या गेल्या आणि १४,५६,८००रुपये दंड आणि २०१५ मध्ये १२,८९६ केसेस झाल्या आणि १२,४५,८५०रुपये दंड जमा झाला.
या तुलनेत ज्योती विल्लेकर यांचं काम खरोखरच उठून दिसणारं आहे.
मनोज जयस्वाल, वाशीम

Wednesday, 9 November 2016

..या शाळेने मिळवले आय एस ओवाशीम शहर. एक लाख लोकसंख्येचं. दुचाकी १८ हजार तर चार चाकी दोन ते अडीच हजाराच्या आसपास. ही फक्त खाजगी वाहनं. प्रवासी वाहनांची संख्या वेगळी. इतक्या वाहनांची रोज शहरातून ये-जा. यातल्या ४०टक्के वाहनांवर फॅन्सी नंबर तर काहींवर नंबर प्लेट्सच नाहीत. हे सगळं प्रथम हेरलं ज्योती विल्लेकर यांनी. चार महिन्यांपूर्वी वाहतूक शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्या रुजू झालेल्या. पदभार स्वीकारताच वाशीम शहरातल्या नियम न पाळणार्‍या वाहनांवर त्यांनी धडक कारवाई सुरु केली. बेशिस्त वाहन चालवणारा दिसला की कारवाई ठरलेलीच. जी वाहनं नंबर प्लेटविना धावत होती त्यांवर नंबर प्लेट लागल्या. बाकी नियमभंग करणारेही शिस्तीने वागू लागले. आणि वाशिम शहर वाहतूक विभागाच्या चांगल्या कामाची दखल घेणं सुरू झालं. लेडी सिंघम अशी ज्योतीताईंची ओळख बनली. मात्र, पोलीस विभागाची दहशत लोकांना बसावी, असं ज्योतीताईंना नको होतं. त्यांना शिस्त आणायची होती. म्हणून लोकसंवादाचे अनोखे मार्ग शोधले. रक्षाबंधनाच्या दिवशी विभागातील सर्व महिला पोलिसांना घेऊन शहरातील दुचाकी प्रवासी, विनापरवाना वाहन चालवणारे, अवैध प्रवासी वाहनचालक, बेशिस्त वाहनचालक या सगळ्यांना सुरक्षाबंधन बांधलं. तर पोळ्याच्या दिवशी सर्व जनावरांच्या शिंगांना रेडियम लावून शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं. गणपती उत्सवात वाहतुकीवर खूप ताण येतो. या वर्षी पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांना मदतीला घेऊन वाशीम शहरात वाहतूक व्यवस्थापन केलं गेलं.


समस्या सोेडवण्यासाठी लोकांचाच सहभाग घेतला की लोक आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडतात, हे वाशीम वाहतूक विभागाने दाखवून दिलं. 
एक महिला आणि सोळा पुरूष वाहतूक शिपाई एवढा विल्लेकर यांचा स्टाफ. या चार महिन्यात त्यांनी ४,०२८ वाहनांवर केसेस केल्या. रु ३,९२,६००रुपये दंड वसूल करण्यात आला. आता नव्वद टक्के वाहनांवर नंबर प्लेट लागल्या आहेत.
२०१४ सा्ली १३,८६१ केसेस केल्या गेल्या आणि १४,५६,८००रुपये दंड आणि २०१५ मध्ये १२,८९६ केसेस झाल्या आणि १२,४५,८५०रुपये दंड जमा झाला.
या तुलनेत ज्योती विल्लेकर यांचं काम खरोखरच उठून दिसणारं आहे.
मनोज जयस्वाल, वाशीम

गोष्ट सिंधुताईंच्या लोणच्याची-बुलढाणा जिल्ह्यातलं शेवटचे, मध्यप्रदेश सीमेनजीकचे भेंडवळ गाव. दिवसभरात जेमतेम एखादी एसटी येणारी-जाणारी. घरेही जेमतेम ५००. गावाची उपजीविका बरीचशी शेतीवर. त्यातही कोरडवाहू शेती. अशातही काही स्त्रियांनी एकत्र येऊन लोणचे उत्पादक गाव म्हणून भेंडवळला ओळख मिळवून दिली आहे. आज नवरात्रातील नवमीला या दुर्गामाता महिला मंडळाच्या कामाचीच ओळख करून घेऊ.

सामान्य कुटुंबातल्या सिंधुताई निर्मळ. घरची थोडी शेती. पण, नवीन काहीतरी करत राहण्याचा स्वभाव. तेव्हाच त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळ आणि अरुणाताई देशमुख यांचं मार्गदर्शन मिळाले.आणि त्यातूनच जन्म झाला लोणचे व्यवसायाचा. लोणचे व्यवसायाचा छोटासा प्रयोग त्यांनी करून बघितला. २०११ पासून व्यवसाय वाढू लागला आणि दुर्गाशक्ति बचत गट सुरु झाला. आज सिंधुताई गटाच्या अध्यक्ष आहेत. एकाचे दोन असे वाढत आज २५ हातांना त्यांनी काम मिळवून दिले आहे. कवठ, आंबा, लिंबू, आवळा, मिरची, हळद अशी जवळपास २५ प्रकारची लोणची या महिला तयार करतात. सिंधुताईंचा दुर्गाशक्ति लोणचे व्यवसाय राज्य स्तरावर पोहचला आहे
एका वर्षाला त्या ४५ ते ५० क्विंटल माल बनवतात. सरासरी २५० ते २७५ रु किलोचा दर त्यांना मिळतो. मंजूरी, कच्चा माल खरेदी, वाहतूक यासाठी खर्च लागतो. कवठ आणि आवळा खरेदीसाठी त्यांना नागपूर आणि चंद्रपूर गाठावं लागतं. एकूण खर्च वजा करता वर्षाला पाच ते सहा लाखांचा नफा त्यांना मिळू लागला आहे. डीलरमार्फत आणि राज्यात विविध प्रदर्शनात मार्केटिंग होते. एकीकडे वर्षभरच विविध स्तरावर लोणच्याचे काम सुरु असतेच. त्यांना राज्यस्तरीय, विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. आज दुर्गाश्क्तीच्या मालाला राज्यात मागणी वाढली आहे. सिंधुताईंच्या लोणच्याची चव आणि नाव सगळीकडे पोचू लागले आहे. शेतीला पूरक व्यवसाय उभारून आणि सोबत घरादाराला उभं करून या महिलांनी दुर्गामाता हे नाव सार्थच केले आहे.
 अमोल सराफ, बुलढाणा

तांड्यावरील रानफुलांना शिक्षणाचा आनंद देवू


"पानी आयो सर-सर , घरेन चालो रं, भर-भर-भर !
पानी वाजच धडाडधूम, धासो-धासो ठोकन धूम !"
कवयित्री शांता शेळके यांच्या पहिलीच्या पाठ्यपुस्तकातल्या मूळ मराठी कवितेचा हा गोरमाटी भाषेतला अनुवाद. मूळ कविता अशी:
“पाऊस पडतो सर-सर-सर ,घरी चला रे भर-भर-भर !
पाऊस वाजे, धडाडधूम, धावा-धावा ठोका धूम !"
गोरमाटी म्हणजेच लमाणी भाषा ही बंजारा किंवा लमाण जमातीची. लमाणांचे वास्तव्य महाराष्ट्रात सर्वाधिक उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. लमाणी लोक तांड्याने राहाणारे, मोलमजुरी, शेतीनिगडीत कामे करून जगणारे, शिक्षणापासून दूर असलेले. पण वाड्या-वस्त्या-तांड्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा पोचल्या आणि बंजारा समाजदेखील शिक्षणाकडे झेपावला. मात्र तांड्यावरील शाळेत पहिलीच्या वर्गाला हाताळणे शिक्षकासाठी जिकीरीचेच असते. शिक्षक गांगारून न गेला तरच नवल!

तुळजापूर तालुक्यात निलेगाव तांड्यावरील शाळेत आरोग्यतपासणीच्या दरम्यान घडलेली ही घटना.
शहरातून आलेले डॉक्टर तांड्यावरील छोट्यांना तपासत होते. पहिलीतल्या एका लेकराला डॉक्टरांनी विचारले, “काय झाले आहे?” या लेकराने उत्तर देले, “सळकम आवंच”. डॉक्टर बुचकाळ्यात पडले. ‘सळकम’ म्हणजे काय? त्यांना अर्थ लागेना. गुरुजींनाही अर्थ सांगता आला नाही. चौथी-पाचवीच्या मुलांना विचारल्यावर त्यांनी “सळकम आवंच” म्हणजे “मला सर्दी झाली आहे” हा अर्थ सांगितला. त्यानंतर पहिलीत शिकणा-या त्या विद्यार्थ्याला उपचार देण्यात आले. विजयकुमार सदाफुले या शिक्षकाच्या काळजावर ही घटना कोरली गेली.
भाषेतल्या फरकामुळे प्रमाण मराठी भाषेतल्या पुस्तकांतली भाषा या मुलांना कळेल का? भाषाच कळली नाही तर त्यांना शिकण्याची गोडी कशी लागणार? या प्रश्नांची उत्तरे शोधणा-या सदाफुले गुरुजींकडून एक मोठेच काम उभे राहिले. बघता-बघता त्यांनी मागील अकरा वर्षांत जिल्ह्यातील तांड्यावर शिकणा-या मुलांना बंजारा भाषेतून पर्यायी अभ्यासक्रम उपलब्ध केला आहे. सुरूवातीला दिलेली शांता शेळके यांची कविता सदाफुलेंनीच अनुवादित केली आहे.
तांड्यावरील रानफुलांना त्यांच्याच बोलीभाषेचा सुगंध देवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रमाण मराठी आणि गोरमाटी यात बांधलेला पूल राज्यातील वाड्या-वस्त्या-तांड्यांसाठी पथदायी ठरणार आहे. बडबडगीतांपासून सुरु झालेल्या या प्रयोगाने आता पुस्तकाचे रूप धारण केले आहे. असे काम करणारे विजयकुमार सदाफुले हे राज्यातील पहिले शिक्षक आहेत. ऐतिहासिक म्हणावे, असेच हे काम आहे.
इयत्ता पहिलीत प्रवेश घेणारे तांड्यावरील विद्यार्थी त्यांच्या गोरमाटी भाषेत घडलेले असतात. पहिल्यांदा शाळेत आल्यावर ते बावरतात. त्यात मराठी अभ्यासक्रमाची भर पडून गोंधळ वाढतो. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्याच बोलीभाषेत गंमतीगंमतीने शिकवल्यास परिणाम साधला जाऊ शकतो, हे विजय सदाफुले यांनी दाखवले आहे. आता ते तांड्यावरील शाळेत शिकवत नाहीत. मात्र तांड्यावर शिकवणा-या शिक्षकांना अडचण येवू नये याकरिता त्यांनी ‘लमाणी भाषाभ्यास’ नावाची एक पुस्तिकादेखील तयार केली आहे. अवयव, आजारांची नावे, अंक,वार, वेळ, फुले-फळे-भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तूंचा परिचय आणि काही प्रश्नोशत्तरे असा खजिनाच या पुस्तिकेत आहे. त्यांड्यावरच्या शाळेत पहिल्या दिवशी शाळेत गेलेला शिक्षक आता या पुस्तिकेच्या आधारे सहजपणे गोरमाटी भाषेचा उपयोग करून तांड्यावरील रानफुलांना शिक्षणाचा आनंद देवू शकणार आहे. सदाफुले यांच्या या कामाची दखल आता जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागाने घेतली आहे. त्यांचा हा प्रकल्प राज्यभर राबविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
 रवींद्र केसकर, उस्मानाबाद

शौचालय बांधा, वर्षभर ‘मोफत दळण’ मिळवाविदर्भातला बुलढाणा जिल्हा. तिथल्या मेहकर तालुक्यातलं दुर्गम पांगरखेड गावं. ४२२ घराचं आणि २,००० लोकसंख्येचं. मोजक्याच १९८ घरांमध्ये शौचालयं. गावच्या सरपंच आहेत अंजली सुर्वे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीत पाच महिला तर चारच पुरुष सदस्य. सध्या सुरु असलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत पांगरखेडच्या सरपंचानीही एक आगळीवेगळी योजना जाहीर करून गावं हागणदारी आणि दुर्गंधीमुक्त करण्याचं ठरवलं आहे.
‘शौचालय बांधा, वर्षभर ‘मोफत दळण’ मिळवा’ - योजनेच्या नावातच वेगळेपणा दिसून येतो. नुकतीच म्हणजे १ सप्टेंबरपासून या योजनेला सुरुवात झाली आहे.

वर्षभरापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नव्या सदस्यांनी गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी इतर आदर्श गावांचा अभ्यासदौरा केला होता. पांगरखेडही आदर्श गावं व्हायला हवं हे तेव्हाच त्यांच्या मनाने घेतलं. अर्थातच मुख्य प्रश्न होता शौचालयं असण्याचा आणि ती वापरण्याचा. सरपंच अंजली सुर्वे यांनी बायकांचा विचार केला. बाईला उघड्यावर शौचाला जावं लागतं आणि घरातलं दळण आणण्यासारखं कामही तिलाच करावं लागतं. मग ज्यांच्या घरात शौचालय आहे त्यांना मोफत दळण दळून दिलं तर आपोआपच बाकी कुटुंबंही घरात शौचालय बंधायला तयार होतील. या विचारातून ही योजना आकाराला आली. ‘कुठलीही गोष्ट फ्री मिळतेय, कशावर काही फ्री आहे तर घ्यायचं’ ही मानसिकताही इथे उपयोगी पडल्याचं सरपंच अंजलीताई सांगतात.
यासाठी ग्रामपंचायतीने स्वखर्चाने पीठगिरणी खरेदी केली. पीठगिरणीचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायत आपल्या उत्पन्नातून करणार आहे. ‘ना नफा ना तोटा' या तत्वावर ही योजना राबविण्याचा निर्णयही घेतला आहे. अर्थातच कितीही फ्री असलं तरी यासाठी एक नियमावली केली आहे. कुटुंबाकडे शौचालय असणं गरजेचं आहे आणि ज्या कुटुंबाने ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर भरलाय, त्या कुटुंबातील प्रति व्यक्ती ९ किलो धान्य दळून दिलं जाणार आहे. लग्न, बारसं, साखरपुडा आणि तेराव्याच्या कार्यक्रमासाठी लागणारं दळणसुद्धा नाममात्र १ रुपये प्रति किलोप्रमाणे दळून मिळणार आहे. तसंच गावातील सार्वजनिक कार्यक्रमाला लागणारं दळणही १ रुपये प्रति किलोप्रमाणे मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांसाठी तसं कार्डही छापून दिलं आहे. या योजनेमुळे संपूर्ण गाव हागणदारीमुक्त, स्वच्छ, सुंदर होऊ शकेल असा विश्वास सरपंचताईंना आहे.
पांगरखेड ग्रामपंचायतीने 'बेटी बचाओ बेटी पढाओ', महिलांसाठी शिलाई आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण, जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकवर्गणीतून ई -लर्निंग, गावातील रस्ते तयार करून सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालेबांधणी, स्वच्छतासंदेश देणाऱ्या म्हणींचं घरांच्या भिंतींवर लेखन असे अनेकानेक उपक्रम केले आहेत. महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीने महिलांच्या आणि किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला असून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
गाव स्वच्छ करण्यासाठी अनोख्या योजनेची शक्कल या ग्रामपंचायतीने लढवली आहे. ही योजना पांगरखेडकरांना शौचालय वापरायला, गाव हागणदारीमुक्त करायला उद्युक्त करो आणि पांगरखेडपासून अन्य गावांनाही प्रेरणा मिळो, हीच इच्छा.
अमोल सराफ, बुलढाणा

त्यांना मिळाला आवाजवैयक्तिक दुःख कुरवाळून बसणारे अनेक असतात. पण त्या दुःखाच्या पलीकडे जाऊन इतरांना मार्ग दाखवणारे विरळाच. सोलापूरच्या भांगे दाम्पत्यानं आपल्या दुःखातून वाट काढलीच, आणि अनेकांना उभं राहायचं बळ दिलं. त्याचीच ही कथा.
प्रसून दोन वर्षाचा झाला तरी बोलत नव्हता. त्याला ऐकू येत नसेल, हेच भांगे दाम्पत्याच्या लक्षात आले नाही. त्याचा काहीच प्रतिसाद यात नाही हे पाहून मात्र त्याची काळजी वाटू लागली. या वयातील मुले सोपे शब्द उच्चारतात. आई, बाबा, दादा असे अडखळत बोलतात. परंतु प्रसून काहीच बोलत नव्हता. त्यामुळे त्यांनी पुणे येथे ‘बेरा टेस्ट’ केली. त्यांची भीती खरी ठरली. प्रसून ऐकू शकत नव्हता. तो बहिरा होता.
प्रसून बोलावा याकरिता अनेकांनी नाना उपाय सांगितले. अनेक डॉक्टरांनी तो चार-पाच वर्षांचा होईपर्यंत बोलेल असे सांगितले. भांगे पती-पत्नी हतबल झाले. त्याचवेळी एक आशेचा किरण दिसला. पुण्यातील अॉडिओलॉजिस्ट अरूणा सांगेकर यांनी प्रभात रोडवरील अलका हुंदलीकर यांचा पत्ता दिला. त्यांच्याकडे ऐकू न येणारी मुले येत होती. परंतु ती बोलू शकत होती. अरूणा सांगेकर यांनी श्रवणयंत्राबाबत मार्गदर्शन केले. वर्षभराच्या प्रयत्नानंतर योगेश आणि जयाप्रदा यांच्या प्रयत्नांना यश आले. प्रसून खेळताना पडला आणि त्याच्या तोंडून आई हा शब्द फुटला. त्याच्या आईबापाला नवी उमेद मिळाली. तो २००४-०५ पासून बोलू लागला. ‘आम्ही केलेल्या कष्टाचे चीज झाले’ योगेश भांगे सांगतात. ही कथा इथे संपत नाही; तर सुरू होते.
प्रसूनप्रमाणेच इतरही गरीब घरातील मुले ऐकू न येण्यामुळे बोलू शकत नाहीत. पालकांचा वाटत राहातं की काही मुले लवकर बोलायला शिकतात. तर काही उशीरा! त्यांच्या कानावर पडणा-या शब्दांमधून ते बोलणे शिकत असतात. परंतु मूकबधीर मुले आवाजाला प्रतिसाद देत नाहीत. या मुलांसाठी काम करण्याचे भांगे दांपत्याने ठवले. २००९ साली त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावी ‘व्हाईस अॉफ व्हाईसलेस’ ही संस्था सुरु केली.
अपंगाचे सहा प्रकार मानले जातात. त्यातला कर्णबधीर प्रकार पालकांच्या लवकर लक्षात येत नाही. अशा दीड ते दोन वर्ष वयातील मुलांची तपासणी करायला हवी हे भांगे यांच्या लक्षात आले. समस्या लवकर कळली तर त्यावर उपायही लगेचच करता येतो. मग त्यांनी पंढरपूर तालुक्यातील कर्णबधीर मुलांच्या पालकांना काही प्रश्न विचारले. पण मुलांना ऐकायला येत नाही हे पालक मानायला तयार होत नसत. मग ‘ताट-वाटी’ या संकल्पनेतून मूकबधीर मुले शोधण्याची मोहिम हाती घेतली. आवाजाच्या दिशेकडे मुलाने लक्ष दिले तर ते त्याला ऐकू येते. जे लक्ष देत नाहीत ते कर्णबधीर.
त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद अधिका-यांशी बोलून अंगणवाडी सेविकांकडून हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर राबवला. ४,२८८ अंगणवाडी क्षेत्रात चाचणी घेण्यात आली. त्यातून ८९ मुले कर्णबधीर असल्याचे लक्षात आले. या मुलांना श्रवणयंत्रे देण्यात आली. त्यांच्या पालकांना स्पीच थेरपीचे धडे मुलांना कसे द्यायचे याचे प्रशिक्षण दिले. ही मुले २०२० पर्यंत चांगली बोलू शकतील असा विश्वास भांगे यांना आहे. त्यांनी स्पीच थेरपीचे धडे देण्यासाठी एक मानवी साखळी तयार केली आहे.
भांगे दांपत्यांला मुंबईच्या 'कोरो' या संस्थेची मदत मिळत आहे. ते म्हणतात, कोरोमुळे आमच्या कामाला वेगळी दिशा मिळाली आहे’.
अगदी कमी वयात मुलांना ऐकू येत नाही हे पालकांना समजले तर प्रश्न सुटू शकतात असे भांगे म्हणतात. राज्य सरकारने हा उपक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवला पाहिजे असे भांगे यांचे म्हणणे आहे. आपली आमदार मंडळी याकडे लक्ष देतील का?

Tuesday, 8 November 2016

...त्यांस देव आहे

नगर शहर, परिसरात किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात एखादी अनाथ, वेडसर व रस्त्यावर फिरणारी महिला असल्याचे डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांना कळाले की ते लगेचच त्या व्यक्तीला घेऊन येतात अन तिथपासून धामणे दाम्पत्याची सुरु होते न संपणाऱ्या वेदनांची लढाई.
नगर शहर, परिसरात किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात एखादी अनाथ, वेडसर व रस्त्यावर फिरणारी महिला असल्याचे डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे 
यांना कळाले की ते लगेचच त्या व्यक्तीला घेऊन येतात अन तिथपासून धामणे दाम्पत्याची सुरु होते न संपणाऱ्या वेदनांची लढाई. 
नगर-मनमाड रस्त्यावर अहमदनगर शहरापासून साधारण वीस किलोमीटरवरचं शिंगवे गावं. साधारण तीन हजार लोकसंख्या. या गावाला गावपण आलं ते डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांच्या 'इंद्रधनु' अनाथलयामुळे. या अनाथालयात तब्बल १०५ अनाथ, मनोविकलांग महिला आणि त्यांची १५ मुले कायमस्वरूपी राहत आहेत.


हे सगळं कसं सुरु झालं त्याची ही गोष्ट. डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता यांचे नगर शहरात खाजगी रुग्णालय. स्वभाव संवेदनशील. त्यामुळे मदतीलाही तत्पर. एक दिवस त्यांना एक वेडसर व विकलांग महिला विष्ठा खाताना दिसली. ही गोष्ट त्यांच्या नजरेसमोरून हटेना. या महिलांचं आयुष्य नेमक काय, कसं आहे याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यानंतर त्यांनी वेडसर, विकलांग, अपंग महिलांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरुन निघाले की या महिलांना देण्यासाठी खाद्यपदार्थ सोबत ठेवू लागले. दिवसभरात तब्बल साठ ते सत्तर अनाथ, निराधार, अपंग, मनोरुग्णांना रोजच घरचं जेवण द्यायला सुरुवात झाली. 
एकदा एक विकल अवस्थेतील आजीबाई त्यांना रस्त्यात दिसल्या. सारखं ‘मरायचं आहे’ असं म्हणत होत्या. त्यांच्या मुलाने त्यांना त्या मनोरुग्ण, अपंग झाल्या म्हणून रस्त्यावर टाकून दिलं होत. या आजीबाईंना डॉक्टरांनी घरी आणायचं ठरवलं. ‘मी त्यांना घरी घेवून येवू का?’ असा प्रश्न मी माझी पत्नी डॉ.सुचेताला फोन करून विचारल्याचं डॉक्टर सांगतात. हाच खरा दोघांच्याही कसोटीचा क्षण! कारण या लोकांना खायला घालण्यासाठी दररोज ६०-७० डबे तयार करण, रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण ठीक होतं. पण, एकदम अशा घाणीने माखलेल्या.. देहधर्माची शुद्ध हरवलेल्या एखाद्या महिलेला घरीच घेवून यायचं म्हणजे अतिच झालं. पण काहीही विचार न करता सुचेता यांनी मात्र लगेच घेऊन या..असं सांगितल. इथूनच खऱ्या अर्थाने 'इंद्रधनू'ची सुरुवात झाली. 

महामार्गावर, शहरात, गावखेड्यात येथील शहाण्या म्हणवल्या गेलेल्या व्यवस्थेने मनोरुग्ण आणि गंभीर आजारांनी त्रस्त महिला मरण्यासाठी सोडून दिलेल्या असतात. त्या अनन्वित लैंगिक अत्याचाराची शिकार होतात. त्यामधून कधी गर्भवती होतात आणि रस्त्यावरच फिरत राहतात. त्याचं पुढे काय होत? गायीची पवित्रता आणि संगोपन याची काळजी असणारा आपला समाज रस्त्यावर जगणाऱ्या बाईला मात्र माणूसही मानण्यास तयार नसतो. हा विरोधाभास पाहून आपणचं अशा महिलांच्या सेवेसाठी स्वखर्चातून अनाथालय सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं डॉ. राजेंद्र सांगतात. 'इंद्रधनू' मुळे त्यांना हक्काच घर मिळालं. 
महामार्गावर, एखाद्या गावात, शहरात बेवारस, मनोरुग्ण महिला सापडल्या की त्यांना तातडीने तेथून घेऊन यायचं. आल्यावर प्रथम स्वच्छ करायचं. त्यांच्या सर्व वैदकीय तपासण्या, मनोविश्लेषण करून त्यांच्यावर उपचार सुरु करायचे. एखादी महिला रस्त्यावर झालेल्या बलात्कारातून गर्भवती झालेली असते. आपल्या पोटात बाळ आहे ही जाणीवही तिला नसते. तिच्या प्रसूतीपूर्व तपासण्या करायच्या. ती मुळातच उकिरड्यावरच अन्न खाऊन कुपोषित आणि आजारी असते. मग तिची विशेष काळजी धामणे दाम्पत्य घेतात. बाळंतपण पार पाडायचं, तिची काळजी घ्यायची आणि पुढे या मुलांना आपलं नाव देवून त्यांचे पालकत्व स्वीकारायचं. ही मुलं कायदेशीर अडचणीमुळे दत्तक जात नाहीत. त्यांचा सांभाळ आपली मुलं म्हणून करायचा हेही एक महत्वाचं काम. यामुळेच आज 'इंद्रधनू' या नावाबरोबरच 'माऊली' या नावानेही संस्था ओळखली जाते.
डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे
संपर्क - ९८ ६० ८४७९५४
सूर्यकांत पाटील, नगर


Monday, 7 November 2016

दिवाळी विशेष…. पाचव्या वर्गाची ओवाळणी!


बहिणीच्या भाऊरायावरच्या मायेच्या कथा खूप; पण भावाची बहिणीवरच्या प्रेमाची आणि बहिणीने ओवाळणीत जे मागितलं, ते दिल्याची कथा एखादीच. आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी Manoj Jaiswal यांनी पाठवलेली कहाणी दिवाळीच्या निमित्ताने आमच्या पेजवरून प्रकाशित करताना मन भरून आलं आहे.
गोष्ट थेट १९५१मधली. भाऊबीजेचा दिवस. एक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ओवाळणीसाठी पोहचला. बहिणीने ओवाळल्यानंतर ओवाळणी घालण्यासाठी भावाने खिशात हात घातला. इतक्यात त्याला थांबवत ती म्हणाली, “भाऊराया या भाऊबीजेला पैशाची ओवाळणी नको. तुझ्याकडे अधिकार आहे. आमच्या गावातल्या शाळेत ५ वीचा वर्ग सुरु करण्याचं वचन दे.” 

बहिणीच्या या अनोख्या मागणीने भाऊ भावविभोर झाला. त्याने त्याच क्षणी एक चिठी लिहून बहिणीच्या ओवाळणीच्या तबकात टाकली. त्यात लिहीलं होतं – “५ वा वर्ग सुरु केला जाईल!” 
हे घडलं वाशिम जिल्ह्यातल्या केकतउमरा गावात. वाशिमपासून १५ किमीवरच्या या गावात विठाबाई देवाप्पा पसारकर आपल्या कुटुंबियांसोबत रहात होत्या. आत्ताच्या ग्रामपंचायतीसारख्या त्या काळाच्या जनपद यंत्रणेकडून, तेव्हा शाळा चालवल्या जायच्या. केकतउमऱ्यात १ली ते ४ थी पर्यंतची शाळा होती. मात्र पुढे ५ वीपासून गावात शिक्षणाची सोय नव्हती. गावाबाहेर जाऊन पुढचं शिक्षण घेणं सगळ्यांना कसं परवडणार? त्यामुळे गरीब घरातली मुलं शेतीच्या कामात गुंतली जायची.
विठाबाई ४ थीपर्यंत शिकलेल्या, शिक्षणाची तळमळ, वाचनाची आवड, पोथीपुराण आणि भजन-कीर्तनाचा नाद असलेल्या. त्या काळातलं ‘जीवनविकास’ मासिक नियमितपणे वाचणार्‍या. शिक्षणातून जीवनविकास साधता येतो, या विचाराच्या. विठाबाईंचे भाऊ स्वातंत्र्यसैनिक अप्पासाहेब अनशिंगकर. १९५१ साली जनपदचे अध्यक्ष झालेले आणि विठाबाईंनी अप्पासाहेबांकडे शाळेची ओवाळणी मागितलेली. त्याकाळी जनपदचा वर्ग सुरु करण्यासाठी दीडहजार रुपये लोकवर्गणी जमा करावी लागत असे.
विठाबाई अणि आप्पासाहेब यांनी गावात वर्गणी गोळा करायला सुरवात केली. पण गरीब गावात वर्गणी कुठून गोळा होणार? बहीण-भावांची तगमग पाहून गावाकरी रणजितसिंग जमादार यांनी ती रक्कम उभी करून दिली. आणि गावात १९५२ साली ५ वा वर्ग सुरू झाला. विठाबाई आनंदल्या. १९५३ ला ६ वा आणि १९५४ मध्ये ७ वा वर्गही सुरु झाला. 
१९७८ साली विठाबाई हे जग सोडून गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ अप्पासाहेब अनाशिंगकर आणि विठाबाईंचे सुपुत्र डॉ .शरद पसारकर यांनी १९८४ साली 'जीवनविकास’ ही संस्था स्थापन करून ‘विठाबाई पसारकर विद्यामंदिर’ सुरु केलं. या शाळेमुळे गावात १२वी पर्यंत शिकण्याची सोय झाली आहे. आजघडीला या शाळेत केकतउमरा गावाबरोबर वाघोली आणि बोरखडी या शेजारच्या गावातले ५२० विद्यार्थी शिकताहेत.
भावाच्या बहिणीवरच्या मायेतून गावातल्या मुलामुलींचं भविष्य घडलं.
                                                                                                                                                                    मनोज जेस्वाल-वाशिम.                                                                    

Sunday, 6 November 2016

बायांना मिळवून दिली आयुष्यभराची भाकरी

साधारणपणे १२ वर्षापुर्वी मूठभर स्त्रिया एकत्र येउन एखादी संस्था सुरु करतात... आज ती संस्था जवळपास ३००० महिलांसाठी उदरनिर्वाहाचे माध्यम बनते. संस्थेच्या प्रेरणेतून आजवर ३०० हून अधिक स्त्रिया उद्योजिका म्हणून भक्कमपणे उभ्या आहेत हेही विशेष. हे साध्य केले आहे उद्योगवर्धिनी या सोलापुरातल्या संस्थेने...
प्रतिकूल परिस्थितीमुळे जेव्हा एखादी स्त्री स्वत:च्या पायावर उभी ठाकते, तेव्हा ती घराला तर सावरतेच पण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरते आणि आजूबाजूच्या स्त्रियांसाठी प्रेरणा बनते. अशीच ओळख आहे उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका चौहान यांची.
पतींच्या व्यवसायामुळे चंद्रिकाताई राजस्थान सोडून सोलापुरात आल्या. पण, काही वर्षातच पतींची तब्येत बिघडल्याने व्यवसाय बंद पडला. औषधोपचारासाठी तिथेच राहणे भाग होते. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, कर्ज, औषधांचा वाढता खर्च यामुळे त्यांना हातपाय हलवणे भागच होते. प्राथमिक शिक्षणाच्या आधारावर नोकरी मिळणे शक्य नव्हते. मग शिवणकामाचे क्लास घेतानाच एकीकडे त्यांनी त्यातले पुढचे कौशल्य शिकून घेतले. क्लासला येणाऱ्या बायकांशी गप्पा व्हायच्या. त्यांच्या अडचणी त्या चंद्रिकाताईंना सांगायच्या, सल्ला मागायच्या. क्लासच्या माध्यमातून चंद्रिकाताईंनी घर सावरलेच पण वाढत्या जनसंपर्कातून नवीन जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली ती म्हणजे सोलापूरमधल्या नगरसेविका पदाची.


अर्थात ही जबाबदारी त्यांनी ताकदीने पेलली. एक मनाशी पक्के होते की लबाडीचा पैसा घरात येणार नाही. त्यांनी नगरसेविका असताना वस्त्यांमध्ये राहणार्याय, नवर्या चा मार खाणार्याप बायकांना भक्कम आधार दिला, सरकारी सवलतींचा वापर करुन वाँर्ड्मध्ये सुधारणा घडवून आणल्या. नगरसेवक पदाची १० वर्षे त्यांनी सचोटीने काम केले. यापुढेही स्त्रियांसाठी काम करायचे. तसेच आपल्यावर आलेल्या अडचणीतून जसा मार्ग निघाला तसा त्यांना मिळावा यासाठी सर्वतोपरी मदत करायची हेही त्यांनी मनाशी पक्के केले.
मग चंद्रिकाताई आणि त्यांच्या मैत्रिणीनी उद्योगवर्धिनीची सुरवात केली. उदिष्ट होतं, ग्रामीण भागातील तसेच अडीअडचणीमध्ये सापडलेल्या बायकांना आधार देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे. ही संस्था त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देते. बचतगटाच्या माध्यमातून स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करते. स्वावलंबन व अंगभूत कौशल्याच्या बळावर उद्योजिका बनण्यासाठी प्रवृत्त करते.
संस्थेने कुठल्याही कामाला नाही न म्हणता सगळ्या लहान-मोठ्या आँर्डर स्विकारल्या. संस्था गरजू स्त्रीला कर्ज मिळवून द्यायला मदत करते. तिला कामाचे पैसे देते आणि त्यानंतर आलेल्या नफ्यातून पहिला हप्ता बँकेला जातो मग उरलेला तिला मिळतो.

सोलापुरची प्रसिद्द कडक भाकरी व चटणी, केटरिंग, उन्हाळी वाळवण, दिवाळी फराळ, टेलरिंग मध्ये कोटन बँग, रजई, गोधड्या, कापडी फाईल्स अश्या अनेक कामांनी उद्योगवर्धिनीला परदेशापर्यंत ओळख मिळाली आ्हे.
उद्योगवर्धिनीच्या मालाला सर्वत्र मार्केट मिळवून देणे, प्रोफेशनल वातावरणात बायकांना शिकायला मिळावे यासाठी ट्रेनिंग सेंटर उभारणे अशी काही ध्येयं चंद्रिकाताईंसमोर आहेत. सामान्य बायकांना उभं केलं तर अख्खं कुटुंब उभं राहतं हा विश्वास त्यांना आहे.
दरवर्षी १००० महिला उद्योजिका निर्माण करण्याची ताकद माझ्या टीममध्ये आहे असे चंद्रिकाताई सांगतात. तेव्हा असं वाटतं की, स्त्रीला दशभुजा म्हणतात ते खरच आहे. जेव्हा ती दोन हातांनी एखादं काम करायला पुढे होते तेव्हा मदतीसाठी तिचे आठ अदृश्य हात आपोआपच सिद्ध होतात.
 रुपाली गोवंडे, पुणे.