Wednesday 9 November 2016

त्यांना मिळाला आवाज



वैयक्तिक दुःख कुरवाळून बसणारे अनेक असतात. पण त्या दुःखाच्या पलीकडे जाऊन इतरांना मार्ग दाखवणारे विरळाच. सोलापूरच्या भांगे दाम्पत्यानं आपल्या दुःखातून वाट काढलीच, आणि अनेकांना उभं राहायचं बळ दिलं. त्याचीच ही कथा.
प्रसून दोन वर्षाचा झाला तरी बोलत नव्हता. त्याला ऐकू येत नसेल, हेच भांगे दाम्पत्याच्या लक्षात आले नाही. त्याचा काहीच प्रतिसाद यात नाही हे पाहून मात्र त्याची काळजी वाटू लागली. या वयातील मुले सोपे शब्द उच्चारतात. आई, बाबा, दादा असे अडखळत बोलतात. परंतु प्रसून काहीच बोलत नव्हता. त्यामुळे त्यांनी पुणे येथे ‘बेरा टेस्ट’ केली. त्यांची भीती खरी ठरली. प्रसून ऐकू शकत नव्हता. तो बहिरा होता.
प्रसून बोलावा याकरिता अनेकांनी नाना उपाय सांगितले. अनेक डॉक्टरांनी तो चार-पाच वर्षांचा होईपर्यंत बोलेल असे सांगितले. भांगे पती-पत्नी हतबल झाले. त्याचवेळी एक आशेचा किरण दिसला. पुण्यातील अॉडिओलॉजिस्ट अरूणा सांगेकर यांनी प्रभात रोडवरील अलका हुंदलीकर यांचा पत्ता दिला. त्यांच्याकडे ऐकू न येणारी मुले येत होती. परंतु ती बोलू शकत होती. अरूणा सांगेकर यांनी श्रवणयंत्राबाबत मार्गदर्शन केले. वर्षभराच्या प्रयत्नानंतर योगेश आणि जयाप्रदा यांच्या प्रयत्नांना यश आले. प्रसून खेळताना पडला आणि त्याच्या तोंडून आई हा शब्द फुटला. त्याच्या आईबापाला नवी उमेद मिळाली. तो २००४-०५ पासून बोलू लागला. ‘आम्ही केलेल्या कष्टाचे चीज झाले’ योगेश भांगे सांगतात. ही कथा इथे संपत नाही; तर सुरू होते.
प्रसूनप्रमाणेच इतरही गरीब घरातील मुले ऐकू न येण्यामुळे बोलू शकत नाहीत. पालकांचा वाटत राहातं की काही मुले लवकर बोलायला शिकतात. तर काही उशीरा! त्यांच्या कानावर पडणा-या शब्दांमधून ते बोलणे शिकत असतात. परंतु मूकबधीर मुले आवाजाला प्रतिसाद देत नाहीत. या मुलांसाठी काम करण्याचे भांगे दांपत्याने ठवले. २००९ साली त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावी ‘व्हाईस अॉफ व्हाईसलेस’ ही संस्था सुरु केली.
अपंगाचे सहा प्रकार मानले जातात. त्यातला कर्णबधीर प्रकार पालकांच्या लवकर लक्षात येत नाही. अशा दीड ते दोन वर्ष वयातील मुलांची तपासणी करायला हवी हे भांगे यांच्या लक्षात आले. समस्या लवकर कळली तर त्यावर उपायही लगेचच करता येतो. मग त्यांनी पंढरपूर तालुक्यातील कर्णबधीर मुलांच्या पालकांना काही प्रश्न विचारले. पण मुलांना ऐकायला येत नाही हे पालक मानायला तयार होत नसत. मग ‘ताट-वाटी’ या संकल्पनेतून मूकबधीर मुले शोधण्याची मोहिम हाती घेतली. आवाजाच्या दिशेकडे मुलाने लक्ष दिले तर ते त्याला ऐकू येते. जे लक्ष देत नाहीत ते कर्णबधीर.
त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्हा परिषद अधिका-यांशी बोलून अंगणवाडी सेविकांकडून हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभर राबवला. ४,२८८ अंगणवाडी क्षेत्रात चाचणी घेण्यात आली. त्यातून ८९ मुले कर्णबधीर असल्याचे लक्षात आले. या मुलांना श्रवणयंत्रे देण्यात आली. त्यांच्या पालकांना स्पीच थेरपीचे धडे मुलांना कसे द्यायचे याचे प्रशिक्षण दिले. ही मुले २०२० पर्यंत चांगली बोलू शकतील असा विश्वास भांगे यांना आहे. त्यांनी स्पीच थेरपीचे धडे देण्यासाठी एक मानवी साखळी तयार केली आहे.
भांगे दांपत्यांला मुंबईच्या 'कोरो' या संस्थेची मदत मिळत आहे. ते म्हणतात, कोरोमुळे आमच्या कामाला वेगळी दिशा मिळाली आहे’.
अगदी कमी वयात मुलांना ऐकू येत नाही हे पालकांना समजले तर प्रश्न सुटू शकतात असे भांगे म्हणतात. राज्य सरकारने हा उपक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवला पाहिजे असे भांगे यांचे म्हणणे आहे. आपली आमदार मंडळी याकडे लक्ष देतील का?

No comments:

Post a Comment