Monday 7 November 2016

दिवाळी विशेष…. पाचव्या वर्गाची ओवाळणी!


बहिणीच्या भाऊरायावरच्या मायेच्या कथा खूप; पण भावाची बहिणीवरच्या प्रेमाची आणि बहिणीने ओवाळणीत जे मागितलं, ते दिल्याची कथा एखादीच. आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी Manoj Jaiswal यांनी पाठवलेली कहाणी दिवाळीच्या निमित्ताने आमच्या पेजवरून प्रकाशित करताना मन भरून आलं आहे.
गोष्ट थेट १९५१मधली. भाऊबीजेचा दिवस. एक भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ओवाळणीसाठी पोहचला. बहिणीने ओवाळल्यानंतर ओवाळणी घालण्यासाठी भावाने खिशात हात घातला. इतक्यात त्याला थांबवत ती म्हणाली, “भाऊराया या भाऊबीजेला पैशाची ओवाळणी नको. तुझ्याकडे अधिकार आहे. आमच्या गावातल्या शाळेत ५ वीचा वर्ग सुरु करण्याचं वचन दे.” 

बहिणीच्या या अनोख्या मागणीने भाऊ भावविभोर झाला. त्याने त्याच क्षणी एक चिठी लिहून बहिणीच्या ओवाळणीच्या तबकात टाकली. त्यात लिहीलं होतं – “५ वा वर्ग सुरु केला जाईल!” 
हे घडलं वाशिम जिल्ह्यातल्या केकतउमरा गावात. वाशिमपासून १५ किमीवरच्या या गावात विठाबाई देवाप्पा पसारकर आपल्या कुटुंबियांसोबत रहात होत्या. आत्ताच्या ग्रामपंचायतीसारख्या त्या काळाच्या जनपद यंत्रणेकडून, तेव्हा शाळा चालवल्या जायच्या. केकतउमऱ्यात १ली ते ४ थी पर्यंतची शाळा होती. मात्र पुढे ५ वीपासून गावात शिक्षणाची सोय नव्हती. गावाबाहेर जाऊन पुढचं शिक्षण घेणं सगळ्यांना कसं परवडणार? त्यामुळे गरीब घरातली मुलं शेतीच्या कामात गुंतली जायची.
विठाबाई ४ थीपर्यंत शिकलेल्या, शिक्षणाची तळमळ, वाचनाची आवड, पोथीपुराण आणि भजन-कीर्तनाचा नाद असलेल्या. त्या काळातलं ‘जीवनविकास’ मासिक नियमितपणे वाचणार्‍या. शिक्षणातून जीवनविकास साधता येतो, या विचाराच्या. विठाबाईंचे भाऊ स्वातंत्र्यसैनिक अप्पासाहेब अनशिंगकर. १९५१ साली जनपदचे अध्यक्ष झालेले आणि विठाबाईंनी अप्पासाहेबांकडे शाळेची ओवाळणी मागितलेली. त्याकाळी जनपदचा वर्ग सुरु करण्यासाठी दीडहजार रुपये लोकवर्गणी जमा करावी लागत असे.
विठाबाई अणि आप्पासाहेब यांनी गावात वर्गणी गोळा करायला सुरवात केली. पण गरीब गावात वर्गणी कुठून गोळा होणार? बहीण-भावांची तगमग पाहून गावाकरी रणजितसिंग जमादार यांनी ती रक्कम उभी करून दिली. आणि गावात १९५२ साली ५ वा वर्ग सुरू झाला. विठाबाई आनंदल्या. १९५३ ला ६ वा आणि १९५४ मध्ये ७ वा वर्गही सुरु झाला. 
१९७८ साली विठाबाई हे जग सोडून गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ अप्पासाहेब अनाशिंगकर आणि विठाबाईंचे सुपुत्र डॉ .शरद पसारकर यांनी १९८४ साली 'जीवनविकास’ ही संस्था स्थापन करून ‘विठाबाई पसारकर विद्यामंदिर’ सुरु केलं. या शाळेमुळे गावात १२वी पर्यंत शिकण्याची सोय झाली आहे. आजघडीला या शाळेत केकतउमरा गावाबरोबर वाघोली आणि बोरखडी या शेजारच्या गावातले ५२० विद्यार्थी शिकताहेत.
भावाच्या बहिणीवरच्या मायेतून गावातल्या मुलामुलींचं भविष्य घडलं.
                                                                                                                                                                    मनोज जेस्वाल-वाशिम.                                                                    

No comments:

Post a Comment