-बुलढाणा जिल्ह्यातलं शेवटचे, मध्यप्रदेश सीमेनजीकचे भेंडवळ गाव. दिवसभरात जेमतेम एखादी एसटी येणारी-जाणारी. घरेही जेमतेम ५००. गावाची उपजीविका बरीचशी शेतीवर. त्यातही कोरडवाहू शेती. अशातही काही स्त्रियांनी एकत्र येऊन लोणचे उत्पादक गाव म्हणून भेंडवळला ओळख मिळवून दिली आहे. आज नवरात्रातील नवमीला या दुर्गामाता महिला मंडळाच्या कामाचीच ओळख करून घेऊ.
सामान्य कुटुंबातल्या सिंधुताई निर्मळ. घरची थोडी शेती. पण, नवीन काहीतरी करत राहण्याचा स्वभाव. तेव्हाच त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळ आणि अरुणाताई देशमुख यांचं मार्गदर्शन मिळाले.आणि त्यातूनच जन्म झाला लोणचे व्यवसायाचा. लोणचे व्यवसायाचा छोटासा प्रयोग त्यांनी करून बघितला. २०११ पासून व्यवसाय वाढू लागला आणि दुर्गाशक्ति बचत गट सुरु झाला. आज सिंधुताई गटाच्या अध्यक्ष आहेत. एकाचे दोन असे वाढत आज २५ हातांना त्यांनी काम मिळवून दिले आहे. कवठ, आंबा, लिंबू, आवळा, मिरची, हळद अशी जवळपास २५ प्रकारची लोणची या महिला तयार करतात. सिंधुताईंचा दुर्गाशक्ति लोणचे व्यवसाय राज्य स्तरावर पोहचला आहे
एका वर्षाला त्या ४५ ते ५० क्विंटल माल बनवतात. सरासरी २५० ते २७५ रु किलोचा दर त्यांना मिळतो. मंजूरी, कच्चा माल खरेदी, वाहतूक यासाठी खर्च लागतो. कवठ आणि आवळा खरेदीसाठी त्यांना नागपूर आणि चंद्रपूर गाठावं लागतं. एकूण खर्च वजा करता वर्षाला पाच ते सहा लाखांचा नफा त्यांना मिळू लागला आहे. डीलरमार्फत आणि राज्यात विविध प्रदर्शनात मार्केटिंग होते. एकीकडे वर्षभरच विविध स्तरावर लोणच्याचे काम सुरु असतेच. त्यांना राज्यस्तरीय, विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. आज दुर्गाश्क्तीच्या मालाला राज्यात मागणी वाढली आहे. सिंधुताईंच्या लोणच्याची चव आणि नाव सगळीकडे पोचू लागले आहे. शेतीला पूरक व्यवसाय उभारून आणि सोबत घरादाराला उभं करून या महिलांनी दुर्गामाता हे नाव सार्थच केले आहे.
अमोल सराफ, बुलढाणा



No comments:
Post a Comment