Sunday 6 November 2016

बायांना मिळवून दिली आयुष्यभराची भाकरी

साधारणपणे १२ वर्षापुर्वी मूठभर स्त्रिया एकत्र येउन एखादी संस्था सुरु करतात... आज ती संस्था जवळपास ३००० महिलांसाठी उदरनिर्वाहाचे माध्यम बनते. संस्थेच्या प्रेरणेतून आजवर ३०० हून अधिक स्त्रिया उद्योजिका म्हणून भक्कमपणे उभ्या आहेत हेही विशेष. हे साध्य केले आहे उद्योगवर्धिनी या सोलापुरातल्या संस्थेने...
प्रतिकूल परिस्थितीमुळे जेव्हा एखादी स्त्री स्वत:च्या पायावर उभी ठाकते, तेव्हा ती घराला तर सावरतेच पण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरते आणि आजूबाजूच्या स्त्रियांसाठी प्रेरणा बनते. अशीच ओळख आहे उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका चौहान यांची.
पतींच्या व्यवसायामुळे चंद्रिकाताई राजस्थान सोडून सोलापुरात आल्या. पण, काही वर्षातच पतींची तब्येत बिघडल्याने व्यवसाय बंद पडला. औषधोपचारासाठी तिथेच राहणे भाग होते. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, कर्ज, औषधांचा वाढता खर्च यामुळे त्यांना हातपाय हलवणे भागच होते. प्राथमिक शिक्षणाच्या आधारावर नोकरी मिळणे शक्य नव्हते. मग शिवणकामाचे क्लास घेतानाच एकीकडे त्यांनी त्यातले पुढचे कौशल्य शिकून घेतले. क्लासला येणाऱ्या बायकांशी गप्पा व्हायच्या. त्यांच्या अडचणी त्या चंद्रिकाताईंना सांगायच्या, सल्ला मागायच्या. क्लासच्या माध्यमातून चंद्रिकाताईंनी घर सावरलेच पण वाढत्या जनसंपर्कातून नवीन जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली ती म्हणजे सोलापूरमधल्या नगरसेविका पदाची.


अर्थात ही जबाबदारी त्यांनी ताकदीने पेलली. एक मनाशी पक्के होते की लबाडीचा पैसा घरात येणार नाही. त्यांनी नगरसेविका असताना वस्त्यांमध्ये राहणार्याय, नवर्या चा मार खाणार्याप बायकांना भक्कम आधार दिला, सरकारी सवलतींचा वापर करुन वाँर्ड्मध्ये सुधारणा घडवून आणल्या. नगरसेवक पदाची १० वर्षे त्यांनी सचोटीने काम केले. यापुढेही स्त्रियांसाठी काम करायचे. तसेच आपल्यावर आलेल्या अडचणीतून जसा मार्ग निघाला तसा त्यांना मिळावा यासाठी सर्वतोपरी मदत करायची हेही त्यांनी मनाशी पक्के केले.
मग चंद्रिकाताई आणि त्यांच्या मैत्रिणीनी उद्योगवर्धिनीची सुरवात केली. उदिष्ट होतं, ग्रामीण भागातील तसेच अडीअडचणीमध्ये सापडलेल्या बायकांना आधार देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे. ही संस्था त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देते. बचतगटाच्या माध्यमातून स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करते. स्वावलंबन व अंगभूत कौशल्याच्या बळावर उद्योजिका बनण्यासाठी प्रवृत्त करते.
संस्थेने कुठल्याही कामाला नाही न म्हणता सगळ्या लहान-मोठ्या आँर्डर स्विकारल्या. संस्था गरजू स्त्रीला कर्ज मिळवून द्यायला मदत करते. तिला कामाचे पैसे देते आणि त्यानंतर आलेल्या नफ्यातून पहिला हप्ता बँकेला जातो मग उरलेला तिला मिळतो.

सोलापुरची प्रसिद्द कडक भाकरी व चटणी, केटरिंग, उन्हाळी वाळवण, दिवाळी फराळ, टेलरिंग मध्ये कोटन बँग, रजई, गोधड्या, कापडी फाईल्स अश्या अनेक कामांनी उद्योगवर्धिनीला परदेशापर्यंत ओळख मिळाली आ्हे.
उद्योगवर्धिनीच्या मालाला सर्वत्र मार्केट मिळवून देणे, प्रोफेशनल वातावरणात बायकांना शिकायला मिळावे यासाठी ट्रेनिंग सेंटर उभारणे अशी काही ध्येयं चंद्रिकाताईंसमोर आहेत. सामान्य बायकांना उभं केलं तर अख्खं कुटुंब उभं राहतं हा विश्वास त्यांना आहे.
दरवर्षी १००० महिला उद्योजिका निर्माण करण्याची ताकद माझ्या टीममध्ये आहे असे चंद्रिकाताई सांगतात. तेव्हा असं वाटतं की, स्त्रीला दशभुजा म्हणतात ते खरच आहे. जेव्हा ती दोन हातांनी एखादं काम करायला पुढे होते तेव्हा मदतीसाठी तिचे आठ अदृश्य हात आपोआपच सिद्ध होतात.
 रुपाली गोवंडे, पुणे.

No comments:

Post a Comment