Friday 14 October 2016

मायलेकींचा प्रवास – खडतर तरीही अनोखा



सुयश पटवर्धन, मुंबई
जोरानं भांड्यांचा आवाज होऊनही आपली मुलगी दचकली नाही....?? 
पार्वती पिल्लेंना काहीतरी खटकलं. अश्विनी तीन महिन्यांची झाली तेव्हा मात्र त्यांनी नवऱ्याला, ए कृष्णमूर्तींना शंका बोलून दाखवली. 
“तसं काहीही नसणार गं.. आपल्याकडे कोणालाही असं काही नाहीये.”
अश्विनी नऊ महिन्यांची झाल्यावर तिला वांद्र्याच्या अलीयावर जंग संस्थेत तपासायला नेलं. भीती खरीच ठरली होती. मुलगी जन्मतः कर्णबधीर होती. त्याच दिवसापासून पार्वती-अश्विनी या मायलेकींचा प्रवास सुरु झाला – खडतर आणि अनोखा.
तिला भाषाज्ञान, शिक्षण, उपचार देण्यासाठी झटणं सुरू झालं. सामान्य मुलांप्रमाणे वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘विजय शिक्षण संस्थे’च्या दादरच्या कर्णबधीर मुलांच्या शाळेत घातलं. पार्वतीताई हिंदी माध्यमातून शिकलेल्या. त्यांनी कर्णबधीर पालकांसाठी असलेलं प्रशिक्षण घ्यावं असं शाळेने सुचवलं. ठाकुर्ली –दादर –अंधेरी अशी त्रिस्थळी यात्रा करत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यांना ‘विजय शिक्षण संस्थे’तच संधी मिळाली. अशा शिक्षकांसाठी सरकारी अनुदान नसल्याने पगार अत्यल्प. पण मुलीसाठी शिकण्याचा, तशाच अन्य मुलांसाठी काम करण्याचा आनंद मोठा होता. अश्विनीची शब्दसंपदा वाढवण्यासाठी पुठ्ठ्याची शब्दकोडी, चित्रांतून शब्द, संकल्पना शिकवण्यासारखे प्रयोग त्यांनी केले. हुशारी आणि मेहनत या जोरावर अश्विनीही प्रगती करू लागली. 
शाळेने सुचवलं की पाचवीपासून अश्विनीने सामान्य मुलांसाठीच्या शाळेत जावं. एकदा कर्णबधिरांसाठीची शाळा सोडली की तिथे परतणं अशक्य. त्यात सामान्य मुलांच्या शाळेत प्रवेशासाठी गेल्यावर तिथला शिपाई म्हणाला, “हिला इथं नको.. यांच्यासाठीच्या शाळेत न्या...” पार्वतीताई हार मानणार नव्हत्या. त्यांनी अश्विनीला दादरच्या हिंदी माध्यमाच्या सामान्य शाळेत घातलं.
त्या सांगत होत्या, “शाळेत अश्विनीला फारच त्रास झाला. मुलांनी तिला सामावून घेतलं नाही. स्पेशल स्कूलमध्ये कर्णबधीर मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं, तसं इथे नव्हतं. शिक्षिका शिकवायच्या. अश्विनीला कळायचं नाही. मी वर्गातल्या मुलींकडून गृहपाठ समजून घेऊन, तो विषय शिकून अश्विनीला शिकवायचे. मला गणिताची धास्ती. पण अश्विनीबरोबर शिकताना प्रयत्नाने गणितही जमलं. रोज शाळेची नोकरी, घरकाम, गृहपाठ. शनिवार-रविवार मात्र अश्विनीचा आठवड्याभराचा अभ्यास नीट करून घ्यायचे. पती नोकरी सांभाळून घरकामातही मदत करायचे.”
दहावीनंतर अश्विनी एसएनडीटी कॉलेजात गेली. तिथे अश्विनीला पटकन सामावून घेतलं. मैत्रिणी, शिक्षक छान होते. पण तिचा अभ्यास घेण्याचा प्रश्न होताच. कारण पार्वतीताईंचं शिक्षण दहावीपर्यंतच झालेलं. पण त्यांच्या शाळेतत्या सहकारी-मैत्रिणी कल्पना इंदप आणि नीता धुरी मदतीला आल्या. एका नव्या मैत्रीची खूपच मदत झाली – इंटरनेटची! 
मायलेकींची मेहनत फळली. अश्विनी अर्थशास्त्र या मुख्य विषयासह बीएला वर्गात पहिली, कॉलेजात तिसरी आली. 
सध्या अश्विनी एका नामांकित पर्यटनसंस्थेत नोकरी करते. “मला माझं काम, ऑफिस, सहकारी हे सगळं खूपच आवडतं. त्या सगळ्यांना मी सगळीकडे हवी असते”. अश्विनी सुहास्यवदनाने सांगते. पार्वतीताई दादरच्या साधना विद्यालय या कर्णबधीर मुलांच्या शाळेत गेली सोळा वर्षं शिकवत आहेत. तिथे मिळणार्यां पैशांहून कर्णबधीर मुलांच्या प्रगतीचं मोल त्यांच्यासाठी जास्त आहे.
कर्णबधीर मुलांच्या पालकांना पार्वतीताई सांगतात, “मुलांच्या अपंगत्वाची लाज बाळगू नका. गोड मुलं मिळाली आहेत यात आनंद माना. मुलांसाठी शक्य तितके सारे प्रयत्न करा. मानसिक बळ सर्वात महत्वाचं. ते टिकवण्यासाठी मदत, सल्ला मी नक्की देऊ शकते.”
सहानुभूतीतून नाही, तर स्व-अनुभूतीतून आलेला पार्वतीताईंचा हा विचार आणि मदतीचा हात किती मोलाचा आहे!

No comments:

Post a Comment