Friday 14 October 2016

आयुष्याचा तमाशा झालेल्यांना ‘सेवाश्रम’चा आधार



तमाशा... या कलेने मानसन्मानाचा सुवर्णकाळ अनुभवला. महाराष्ट्राच्या लोककलेचा नाद सातासमुद्रापार नेला. पण काळ बदलला, मनोरंजनाची साधनं बदलली आणि तमाशाच्या दुर्देवाचा नवा खेळ सुरु झाला. नामंवत तमाशा फड बंद पडले, फडमालक कर्जाच्या ओझ्याखाली दबून रस्त्यावर आले. यात उघड्यावर आला, ज्याच्या जीवावर ही लोककला टिकून आहे तो तमाशा कलावंत.
याच तमाशा कलावंतांच्या पुढच्या पिढीच्या आयुष्याचा ‘तमाशा’ होऊ नये यासाठी ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर जि. बीड) इथे ‘सेवाश्रम’ नावाची संस्था काम करत आहे. सुरेश राजहंस या तरुणाने सुरु केलेल्या या शैक्षणिक प्रकल्पात सध्या ३८ मुलगे-मुली शिक्षण घेत आहेत. सुरेशची पत्नी मयुरी या मुलांचा सांभाळ करते.
सुरेश राजहंस म्हणतात, "बीड हा खरा ऊसतोड कामगारांचा जिल्हा. त्यांचे प्रश्नही वेगळेच.आज त्यांच्यासाठी काम करायला पुष्कळ लोकं पुढे येऊ लागले आहेत. मला मात्र तमाशा कलावंताच्या मुलांचा प्रश्न खुणावत होता."
२०१० मध्ये जवळपास २६५ तमाशा कलावंताच्या कुटुंबाचा सर्वे केला. नगर, शेवगाव, जामखेड, जुन्नर या भागात जाऊन कलावंतांच्या, फड मालकांच्या भेटी घेतल्या. यातून वास्तव समोर आलं.
नऊ महिने या कलावंतांचं घराबाहेर असणं. दरकोस मुक्काम करत तमाशाचे कार्यक्रम करत राहाणं. जत्रा, ऊरुस, यात्रा करताना कुटुंब दुरावणं. स्त्रियांच्या अंगवळणी पडलेले हिणकस शेरे, वाईट नजरा. मुलांना नातेवाईकांकडे ठेवावं लागणं. मग शिक्षण सोडून या मुलांचं गारिगार विकणं, भंगार गोळा करणं, हॉटेलात, वीटभट्टीवर कामं करणं. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न, काही ठिकाणी नातेवाईकांकडूनच अत्याचाराच्या घटना घडतात. शिवाय तमाशा कलावंतांची पोरं म्हणून समाजाची बघण्याची दृष्टीही वेगळीच. हे सगळं बघून जीव कळवळला. दररोजच्या स्थलांतराने मुलांचं शिक्षण कसं होणार?
म्हणून २०११ पासूनच सेवाश्रमचं काम सुरु केलं. प्रकल्प सुरु करण्यासाठी एका शेतकऱ्याने जमीन उपलब्ध करुन दिली.
इथे राहणाऱ्या प्रत्येक मुलाची एक वेगळीच कहाणी आहे. एकच आई असलेल्या दोन मुलांचे बाप वेगळे, म्हणून नावं, जातही वेगवेगळी. कुणाला व्यसनी बापाने स्वत:चं व्यसन पूर्ण करण्यासाठी चक्क भीक मागायला लावली. तर कुणाची आई मुलांना आजीकडे सोडून तमाशात गेली, ती परत आलीच नाही. तर कुणाच्या आईला वडिलांनीच मारून टाकल्याने तो तुरुंगात आहे आणि मुलं उघड्यावर आली आहेत.
या मुलांना मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा सुरेशचा प्रयत्न आहे.
सेवाश्रमाचे स्वयंसेवक शाळेचा गंधही नसलेल्या या मुलांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी विविध उपक्रम आयोजतात. अक्षरओळख करुन देण्यापासून या विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं. सहा वर्षांपासून कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय केवळ समाजाने दिलेल्या मदतीच्या बळावर हा प्रकल्प सुरु आहे. मात्र आता शासनही या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विचार करत आहे. यासाठी राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनीही सेवाश्रमची पाहणी केली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी सुरेशच्या कामाला दाद देत सेवाश्रमला भेट दिली. अनिकेत प्रकाश आमटे यांच्यासह डॉ. रविंद्र व स्मिता कोल्हे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनीही सेवाश्रमला भेट दिलीे आहे.
सुरेश राजहंस मो. 9922365675 / 9420403560


- मुकुंद कुलकर्णी.

No comments:

Post a Comment