Wednesday 9 November 2016

तांड्यावरील रानफुलांना शिक्षणाचा आनंद देवू


"पानी आयो सर-सर , घरेन चालो रं, भर-भर-भर !
पानी वाजच धडाडधूम, धासो-धासो ठोकन धूम !"
कवयित्री शांता शेळके यांच्या पहिलीच्या पाठ्यपुस्तकातल्या मूळ मराठी कवितेचा हा गोरमाटी भाषेतला अनुवाद. मूळ कविता अशी:
“पाऊस पडतो सर-सर-सर ,घरी चला रे भर-भर-भर !
पाऊस वाजे, धडाडधूम, धावा-धावा ठोका धूम !"
गोरमाटी म्हणजेच लमाणी भाषा ही बंजारा किंवा लमाण जमातीची. लमाणांचे वास्तव्य महाराष्ट्रात सर्वाधिक उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. लमाणी लोक तांड्याने राहाणारे, मोलमजुरी, शेतीनिगडीत कामे करून जगणारे, शिक्षणापासून दूर असलेले. पण वाड्या-वस्त्या-तांड्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा पोचल्या आणि बंजारा समाजदेखील शिक्षणाकडे झेपावला. मात्र तांड्यावरील शाळेत पहिलीच्या वर्गाला हाताळणे शिक्षकासाठी जिकीरीचेच असते. शिक्षक गांगारून न गेला तरच नवल!

तुळजापूर तालुक्यात निलेगाव तांड्यावरील शाळेत आरोग्यतपासणीच्या दरम्यान घडलेली ही घटना.
शहरातून आलेले डॉक्टर तांड्यावरील छोट्यांना तपासत होते. पहिलीतल्या एका लेकराला डॉक्टरांनी विचारले, “काय झाले आहे?” या लेकराने उत्तर देले, “सळकम आवंच”. डॉक्टर बुचकाळ्यात पडले. ‘सळकम’ म्हणजे काय? त्यांना अर्थ लागेना. गुरुजींनाही अर्थ सांगता आला नाही. चौथी-पाचवीच्या मुलांना विचारल्यावर त्यांनी “सळकम आवंच” म्हणजे “मला सर्दी झाली आहे” हा अर्थ सांगितला. त्यानंतर पहिलीत शिकणा-या त्या विद्यार्थ्याला उपचार देण्यात आले. विजयकुमार सदाफुले या शिक्षकाच्या काळजावर ही घटना कोरली गेली.
भाषेतल्या फरकामुळे प्रमाण मराठी भाषेतल्या पुस्तकांतली भाषा या मुलांना कळेल का? भाषाच कळली नाही तर त्यांना शिकण्याची गोडी कशी लागणार? या प्रश्नांची उत्तरे शोधणा-या सदाफुले गुरुजींकडून एक मोठेच काम उभे राहिले. बघता-बघता त्यांनी मागील अकरा वर्षांत जिल्ह्यातील तांड्यावर शिकणा-या मुलांना बंजारा भाषेतून पर्यायी अभ्यासक्रम उपलब्ध केला आहे. सुरूवातीला दिलेली शांता शेळके यांची कविता सदाफुलेंनीच अनुवादित केली आहे.
तांड्यावरील रानफुलांना त्यांच्याच बोलीभाषेचा सुगंध देवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रमाण मराठी आणि गोरमाटी यात बांधलेला पूल राज्यातील वाड्या-वस्त्या-तांड्यांसाठी पथदायी ठरणार आहे. बडबडगीतांपासून सुरु झालेल्या या प्रयोगाने आता पुस्तकाचे रूप धारण केले आहे. असे काम करणारे विजयकुमार सदाफुले हे राज्यातील पहिले शिक्षक आहेत. ऐतिहासिक म्हणावे, असेच हे काम आहे.
इयत्ता पहिलीत प्रवेश घेणारे तांड्यावरील विद्यार्थी त्यांच्या गोरमाटी भाषेत घडलेले असतात. पहिल्यांदा शाळेत आल्यावर ते बावरतात. त्यात मराठी अभ्यासक्रमाची भर पडून गोंधळ वाढतो. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्याच बोलीभाषेत गंमतीगंमतीने शिकवल्यास परिणाम साधला जाऊ शकतो, हे विजय सदाफुले यांनी दाखवले आहे. आता ते तांड्यावरील शाळेत शिकवत नाहीत. मात्र तांड्यावर शिकवणा-या शिक्षकांना अडचण येवू नये याकरिता त्यांनी ‘लमाणी भाषाभ्यास’ नावाची एक पुस्तिकादेखील तयार केली आहे. अवयव, आजारांची नावे, अंक,वार, वेळ, फुले-फळे-भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तूंचा परिचय आणि काही प्रश्नोशत्तरे असा खजिनाच या पुस्तिकेत आहे. त्यांड्यावरच्या शाळेत पहिल्या दिवशी शाळेत गेलेला शिक्षक आता या पुस्तिकेच्या आधारे सहजपणे गोरमाटी भाषेचा उपयोग करून तांड्यावरील रानफुलांना शिक्षणाचा आनंद देवू शकणार आहे. सदाफुले यांच्या या कामाची दखल आता जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागाने घेतली आहे. त्यांचा हा प्रकल्प राज्यभर राबविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
 रवींद्र केसकर, उस्मानाबाद

No comments:

Post a Comment