Monday 2 October 2017

अनिता जनार्दन भडके, मुख्याध्यापिका, मनपा शाळा, औरंगाबाद.

'ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सवविशेष

औरंगाबाद शहरातल्या बन्सीलाल नगरची मनपा शाळा. रंग उदास झालेली, खिडक्यांच्या काचा तुटलेली, गरिबांघरच्या पोरांची... नेहमीसारखीच... पण या शाळेत एक गोष्ट मात्र वेगळी आहे. ती म्हणजे या शाळेची मुख्याध्यापिका शाळा टिकावी, मुलं शिकावीत म्हणून जीवाचं रान करते... तिचं नाव आहे अनिता जनार्दन भडके.
अनितामॅडम मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या, भूम तालुक्यातील सुकटा या गावातील. माहेर याच तालुक्यातलं पाथरूड. बाप दादासाहेब बोराडे. त्यांनी अनिताला दहावीपर्यंत शिकवलं आणि दहावीची परीक्षा दिल्याच्या 15 व्या दिवशीच तिचं लग्न लावून दिलं. वरात औरंगाबादला आली. सोबत आलं मनातलं शिकायचं आणि शिक्षक व्हायचं स्वप्नदेखील. 



थोड्यात दिवसात निकाल लागला. आणि अनिता दहावीला बोर्डात पहिल्या आल्या. स्वप्नं पूर्ण होतील अशी आशा वाटू लागली. पण डीएड करण्यास नवऱ्याने नकार दिला. तब्बल पाच वर्षं नवऱ्याने शिकायला परवानगी द्यावी म्हणून त्या प्रयत्न करत राहिल्या. शेवटी एकदा नवऱ्याची नजर चुकवून घराशेजारी असलेल्या डीएड कॉलेजला प्रवेश घेतला. यावेळी कदाचित त्यांची चिकाटी बघून नवऱ्यानेही सूट दिली आणि डीएड झालं. आता पुढचा टप्पा होता, शिक्षक म्हणून नोकरीचा. इथंही पुन्हा नवऱ्याचा नकार. पाच वर्षं प्रयत्न करत राहिल्या आणि मॅडम महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्या.
स्वप्न साकार झालं. आणि कर्तृत्व दाखवायची संधीही मिळाली. मॅडम काही दिवस कंचनवाडीच्या मनपा शाळेत होत्या. इथे फक्त सव्वाशे मुलं होती. गावात रिकाम्या फिरणाऱ्या शाळाबाह्य मुलांचं प्रमाण खूप जास्त होतं. मॅडमनी ही सगळी मुलं शाळेत आणायचं ठरवलं. त्यासाठी सर्वप्रथम वर्गातली छडी फेकून दिली. गाणी, कविता, कथा, गोष्टी सुरू झाल्या आणि मुलांचा आकडा अडीचशे पार करून गेला. पण दुसऱ्याच महिन्यात मॅडमची बदली झाली. बदली रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेला कुलुपही ठोकलं. महापालिकेच्या इतिहासात एक शिक्षकासाठी झालेलं हे पाहिलं आंदोलन. 



पुढे मॅडम बन्सीलाल नगरच्या मनपा शाळेत आल्या इथे तर विद्यार्थ्यांची वानवाच. मॅडमनी वस्त्या, पालावर फिरून भटक्या विमुक्तांची, दलितांची, गरिबांची, शाळा सुटलेली, शाळेत न जाणारी अशी सगळी मुलं गोळा करून शाळा सुरू केली. या मुलांना येण्याजाण्यासाठी वाहनांची सोय सुरू केली. आज या शाळेत शिक्षकांच्या वर्गणीवर, एक तीस सिटांची बस, एक 18 सिटांची व्हॅन आणि सहा सहा सिटांच्या दोन रिक्षा सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे याचे सगळे पैसे मॅडम आणि शाळेतले शिक्षक आपल्या पगारातून वर्गणी करून देतात. शाळेजवळ राहणाऱ्या मुलांना त्यांनी सायकल घेऊन दिल्या. आजही त्यांना पंक्चर काढायला, हवा भरायला मॅडमच पैसे देतात. दुपारच्या खिचडीची सोय उत्तम असते. शाळेची गोडी लागावी म्हणून मॅडम शाळेत कधी जांभळं, बोरं, पेरू, केळं अशी फळं आणतात आणि वाटतात. मुलंही खुशीत असतात.
आता मॅडमची रिटायरमेंट जवळ आलीय. मॅडम म्हणतात, "रिटायरमेंटनंतर मला एक शाळा उघडायची आहे, जिथं गरीब श्रीमंत असं कॉम्बिनेशन असणार आहे. त्या शाळेत श्रीमंतांना फी आणि गरिबांना मोफत शिक्षण देणार." या शाळेसाठी मॅडमनी तीस वर्षांपूर्वी अर्धा एकर जमीन घेऊन ठेवली आहे. महिन्याला शंभर रुपये करत त्यांनी या जागेचे पैसे फेडलेत, निवृत्त झाल्यानंतर त्या येणाऱ्या पेन्शनमधून शाळानिर्मितीचा खर्च भागवणार आहेत. 



नोकरी करतच अनिता यांनी आपलं पुढचं शिक्षणंही पूर्ण केलं. त्यांनी बीए, बीएड, एमए, एमड आणि एमफिल पूर्ण केलं. शिक्षणशास्त्रात पीएचडी करायचं हे त्यांचं पुढचं स्वप्न. ज्या महिलेचं दहावी झाल्यानंतर पंधराव्या दिवशी लग्न होतं, बोर्डात पहिला येऊन डीएड करायला पाच वर्षे लागतात, डीएड ला प्रथम येऊन नौकरी करायला पुढची पाच वर्षे जातात... तीच महिला शिक्षकी पेशात आपल्या कामाने आदर्श निर्माण करत, शिक्षणाच्या सगळ्याच डिग्र्या पादाक्रांत करते. हा प्रवास खरंच थक्क करून सोडणारा आहे. 

No comments:

Post a Comment