Friday 13 October 2017

कुरुंजीतलं गमभन



स्वारगेट वरून भोरची बस घ्यायची. भोरच्या अलिकडे माळवाडी फाट्याला उतरायचे. तिथून भोर ते मळे / भुतोंडी बस घ्यायची आणि कुरुंजीला उतरायचे असा प्रवास असतो. बस वेळेत मिळाल्या तर सव्वा तास अधिक दीड तास असा तीनेक तासाचा प्रवास. पण भोर ते कुरुंजी बसेस मनस्वी असतात. त्यांच्या मर्जीप्रमाणे येतात जातात.
सकाळी आठची भोर बस घेऊन नऊ सव्वानऊला माळवाडी फाट्याला उतरायचं. साडेनऊनंतर पुढची बस मिळते. ही शक्यतो वेळेत असते.
या प्रवासाचा कधी कंटाळा येत नाही. याला कारण भेटणारी माणसं. माळवाडी फाट्याला म्हसवली आरोग्यकेंद्राला जाणारी नर्स बाई भेटते. तिच्याकडे त्या भागातल्या सर्व गर्भार आणि बाळंतीण बायकांच्या नोंदी असतात. कुरुंजीतली शेजारची सून तिसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. तिला मुलगा झाल्याचं या बाईंनीच आधी सांगितलं आणि त्यांनी कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन केल्याचं पण.
माळवाडीच्या स्टॉपवर दुपारनंतर जवळपासच्या शेतकरणी स्वतः च्या शेतातली भाजी विकायला येतात. एकदा मटार घेऊन वयस्कर बाई बसली होती. किलोला चाळीस रुपयाच्या खाली एक पैसा कमी करणार नाही या तत्वावर विक्री चालू होती. एवढ्यात एका मोठ्या रिक्षातून शाळेची मुलं जाताना दिसली. हिनं हाक मारून थांबवलं. त्या अमकीचा नातू ना तू म्हणत एका मुलाच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवला आणि पिशवी भरून मटार त्याला खायला दिले आणि ड्रायव्हरला पण एक लहान पिशवी भर दिले. इथं व्यवहार मध्ये आला नाही.
या प्रवासात भेटणारी मंडळी मोकळी ढाकळी असतात.  खूपदा ते एकमेकांना ओळखत असतात, त्यामुळे बसमध्ये भेटले की लगेच गप्पा सुरु होतात.

कधी कधी शेजारचा प्रवासीपण बोलायला लागतो. एकदा शेजारी सत्तर वर्षाचे एक गृहस्थ बसले होते. ते एसटीत चालक म्हणून काम करायचे. रात्रीबेरात्री बस समोर कुणी हात केला तर ती व्यक्ती चांगली असेल का काही वाईट हेतू घेऊन चढत असेल हे ओळखायचं ट्रेनिंग एसटीत दिलं जातं असे ते सांगत होते.
दुपारच्या बसमध्ये गर्दी असते. लोक सर्रास दोघांच्या सीटवर तिघे बसतात. एकदा माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले होते. त्यांना दुसरा मनुष्य जरा सरकून घ्या म्हणाला. तर या गृहस्थांनी माझ्याकडे इशारा करून ‘लेडीज मॅडम बसल्यात, सरकू शकत नाही’ असं सांगितलं.
या बसेसचे चालक वाहक लोकांमध्ये मिळून मिसळून असतात. एक तरुण वाहक शाळेत जाणाऱ्या मुलांच्या गळ्यात हात घालून गप्पा मारत असतो. एकदा बसमध्ये ब्रेक ऑइल मध्येच संपले. वाहक रस्त्यावरून जाताना खिडकीतून बघत होता. एका घरासमोर ट्रॅक्टर आणि इतर मोठी वाहने दिसली. तिथे बस थांबवून तो त्या घरातून मागून ऑइल घेऊन आला आणि काम झाले.
एकदा भोरला जाताना कांबरे गावाच्या स्टॉपवर एका बाईने बांबूचा मोठा हारा बसमध्ये टाकला आणि वाहकाला सांगितले की हरणे गावात मावशी येईल तिला द्या. हरणे स्टॉप वर मावशी आली, तिला हारा दिला. तिने वाहक नको म्हणाला तरी भाजी करून खा म्हणत आठ दहा शेवग्याच्या शेंगा प्रेमाने त्याला दिल्या.
करंदी गावात एका चालकाचे नातेवाईक राहतात. भोरला जाताना खूप वेळा हा चालक करंदीला उतरून त्याच्याकडे चहा पिऊन येतो. प्रवासी सुद्धा, जावं लागतं त्याला पावण्याकं च्या प्यायला, म्हणत आपल्या गप्पा चालू ठेवतात.
पावसाळ्यात लावणीच्या काळात बायका, पुरुष वेगवेगळ्या गावातल्या नातेवाईकांकडे गडबडीनं भात लावायला जात येत असतात. घाईत डोक्यावर इरलं किंवा पोतं, साडी गुडघ्याच्या वर खोचलेली, पुरुषांची हाफ पॅन्ट, चिखलात भरलेले कपडे असेच बसमधून प्रवास करत असतात.
वयस्कर लोकांना निम्म्या तिकिटात प्रवास या एसटीच्या अत्यंत उपयुक्त सवलतीमुळे सगळ्या वयस्कर लोकांकडे कार्ड असते. आणि ते आनंदानं कार्ड दाखवत निम्म्या तिकिटात प्रवास करत असतात. आमच्या सरुबाईला तिचं आणि नवऱ्याचं वय विचारलं तेव्हा ह्यांचं कार्ड निघालंय आणि माझं नाही असा हिशेब सांगितला होता.
या वयस्कर लोकांना खूप बोलायचं असतं. एकदा दहा नातवंडं असलेली, कपाळभर कुंकू लावलेली बाई शेजारी बसली होती. सगळ्या मुलांबाळांबद्दल, लेकीसुनांबद्दल सांगून झाले. माहेरी भावाकडे चालली होती आणि या वयात पण माहेरी जायचं म्हणून हरकलेली ती बाई भावाबद्दल सांगताना कोवळी कोवळी होऊन गेली होती.
पुणे मुंबई शहरी प्रवासात चार तास ओठांना घट्ट मिठी बसलेली असते, भरल्या बसमध्ये पण बऱ्यापैकी शांतता असते. पण या भोर कुरुंजी प्रवासात माणसांचा जिवंतपणा खळखळून वाहत असतो.
- रंजना बाजी

No comments:

Post a Comment