Sunday 30 July 2017

देवदासीच्या मुलींची ही कथा


गाव कोळे, तालुका सांगोले, जिल्हा सोलापूर. इथल्या मंडळे कुटुंबात तीन पिढ्यांपासून देवदासीची प्रथा सुरू असलेली. याच कुटुंबातल्या जुळ्या मुली उषा आणि आशा. ८ वी पर्यंत शिकल्या. उषा-आशाला आपल्या घरातल्या या प्रथेची लाज वाटायची. कोले गावात, शाळेत त्यांना मुलंमुली चिडवायची, टोमणे मारायची. आपल्या आईचं देवदासी असणं हा त्यांना शाप वाटायचा. शेवटी दोघींचं शिक्षण सुटलंच. पित्याने लेकींना आपलं नाव तर नाहीच दिलं. आणि तो दोघींच्या वाढत्या वयात कुटुंबाला वार्‍यावर सोडून निघून गेला. 
दोघींची लग्न अवघ्या १२- १३ व्या वर्षी करून दिलेली. उषाचा दारुड्या नवरा तिला त्रास द्यायचा. हिंमत करून उषाने घर सोडलं आणि मुलांना घेऊन ती माहेरी परतली. शेती करू लागली. मुलांना वाढवणं अवघडच होतं. आशाचा नवरा मोठ्या वयाचा नातलग होता. तो मरण पावला. लेकरांची जबाबदारी एकट्या आशाकडेच राहिली. दोघींचं खडतर आयुष्य सुरूच राहिलं. तिशीत पोचल्या, तेव्हा प्रथम संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट उपक्रमाविषयी कळलं. दोघींनी नाव नोंदवलं. ३ महिन्याचा कोर्स पूर्ण केला. एव्हाना त्यांना शिक्षणाचं महत्व कळू लागलं होतं. तिथेच रुग्णसहाय्यक कोर्सबद्दल समजलं. पाठ्यक्रम इंग्रजीत असल्यामुळे, जमेल की नाही अशी भीती होतीच. पण मनात ध्येय असलं की काहीही अशक्य नसतं. उषा-आशाने पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होत कोर्स पूर्ण केला. त्यांच्या प्रशिक्षकांनादेखील दोघींचा अभिमान होता.
चौतीस वर्षांच्या उषा आणि आशा सांगोल्यात भोसले हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून महिना सहा हजार रु मिळकतीवर काम करू लागल्या. हॉस्पिटलमध्ये रुग्णांशी त्या आपुलकीने वागतात. गरजेपुरतं इंग्रजीत बोलू शकतात. हॉस्पिटलमध्ये कोणीही त्यांना कमी लेखत नाही, चिडवत नाही की टोमणेदेखील मारत नाहीत. आयुष्याच्या प्रवासात उषा-आशाने अनेक अडथळे पार केले. आता दिवस पालटले आहेत. उषाची मुलं हर्षदा आणि साहील. आशाची मुलं पंकज आणि करण. यातले मुलगे सांगली जिल्ह्यात तासगावला वसतीगृहात राहून शिक्षण पुरं करत आहेत. उषा अलिकडेच आपल्या लेकीसाठी पुन्हा कोळे गावात येऊन राहिली आहे. मुलीला डोळ्यात तेल घालून वाढवते आहे. आणि गावाजवळपास काम शोधते आहे. उषा-आशाने कुटुंबातली अमानुष देवदासी प्रथा खंडित केली. उशिरा का होईना, शिक्षण घेतल्याने, कौशल्य अवगत केल्याने त्यांचं आयुष्य चांगल्या मार्गाने सुरळीत चाललं आहे.
आईचा विषय निघाला की उषा-आशाचे डोळे पाणवतात. आईविषयीचा आदर त्यांच्या शब्दाशब्दातून व्यक्त होतो, “आमच्या आईने धार्मिकतेने देवदासीपण स्वीकारलं. पण आम्ही मुलींनी देवदासी व्हावं, हे तिला मुळीच मान्य नव्हतं.”
प्रथम संस्थेच्या पेस या कौशल्य विकास उपक्रमाने अशा अनेक उषा-आशांच्या आयुष्याला अर्थ मिळवून दिला आहे. 

No comments:

Post a Comment