Thursday 13 July 2017

खचायचं नाही, तर लढायचं



धुळे जिल्ह्यातील कापडणे गाव. इथंल्या लक्ष्मीबाई शाळीग्राम माळी. व्यवसाय शेती. लक्ष्मीबाईंचं लहान वयात लग्न लावून देण्यात आलं. लग्नाच्यावेळी लंगडत चालणाऱ्या पतीला पाहून लक्ष्मीबाईंना हसू आलं होतं. काळ पुढे जात राहिला आणि पती लंगडत चालतो हा विनोद नव्हे तर वास्तव आहे, हे त्यांना जाणवलं. त्यांच्या वाट्याला पुढे कडवा संघर्ष वाढून ठेवला होता. वाटण्या झाल्या आणि या कुटुंबाच्या वाट्याला शेती आली. अपंग पती, तीन मुली आणि दोन लहान मुलं. सहा जणांचं कुटुंब पोसायची जबाबदारी लक्ष्मीबाईंनी उचलली.
शेतातील प्रत्येक काम त्या करू लागल्या. पेरणी, निंदणी, कोळपणी, ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामं. शेतीतल्या एकूण एक कामात त्या पारंगत आहेत. त्यांनी चार मुलांची लग्न लावली. त्यांचा निकराचा संघर्ष, कमालीचा आत्मविश्वास पाहून त्यांची ओळख लक्ष्मीबाईऐवजी दुर्गाबाई अशी झाली आहे. मध्यतंरी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली. परिस्थितीला दोष न देता, पती अपंग आहे म्हणून त्याची साथ न सोडता लक्ष्मीबाई यांनी संसार एकटीच्या बळावर उभा केला.
लक्ष्मीबाईचा स्वाभिमानी बाणा आणि वाईटातून चांगलं निर्माण करणाऱ्या इच्छाशक्तीचा गावकरी आदर करतात. लक्ष्मीबाईसमोर अपशब्द बोलण्याची कोणी हिंमत करत नाही, एवढा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा दरारा आहे. खचायचं नाही तर लढायचं, हाच लक्ष्मीबाईंच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.

- प्रशांत परदेशी, धुळे

No comments:

Post a Comment