Wednesday 12 July 2017

हम भी कुछ कम नही !




तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटलाय, जी अपंग असूनसुद्धा स्वमिळकतीतला हिस्सा इतरांच्या मदतीसाठी स्वखुशीने देते? मी भेटलेय, पार्ल्याच्या प्रशांत अभ्यंकरला. दहावीनंतर MSC-IT करून आज English-मराठी-संस्कृत-हिंदीमध्ये DTP चं काम तो सहजपणे करतोय.
जन्म झाल्यावर पहिल्या पाच दिवसांतच प्रशांतला मेंदूज्वर झाला. अतिताप आणि फिट्समुळे त्याच्या मेंदूभोवतालच्या पाण्याचं प्रमाण वाढून डोकं मोठं दिसू लागलं. उपाय सुरू असतानाही 4 महिन्याच्या प्रशांतला पुन्हा मेंदूज्वराचा ऍटॅक आला. त्याच्या शारीरिक वाढीवर, हालचालींवर परिणाम झाला. बालपण अंथरुणातचं गेलं. मृत्यूशीच झगडा. अखेर १००% कर्णबधिरत्व, जोडीला मुकेपण आणि ८०% अपंगत्व, Cerebral palsy चं निदान झालं. बुद्धी मात्र शाबूत राहिली. तीच त्याच्या जडणघडणीसाठी पर्वणी ठरली.
प्रशांतला वाढवावं कसं, हा प्रश्न होताच. पण हार मानतील ते पालक कसले? समाजसेविका असलेल्या प्रशांतच्या आई स्मिता अभ्यंकर यांना हे स्वीकारणं कठीण गेलं. आई-वडिलांच्या, नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे त्या सावरल्या. त्या स्वतः लोकांना मार्गदर्शन, समुपदेशन करतात. पण जेव्हा त्यांना स्वतःलाच यातून जावं लागलं, तेव्हा आयुष्य खरंच बदलून गेलं, हे त्या मोकळेपणाने मान्यच करतात.
ऍक्यूपंक्चर, फिजिओथेरिपीसोबत समुपदेशन प्रशांतसाठी सुरु झालं.
विशेष शाळेचा शोधही घेतला. लोळागोळा शरीराच्या प्रशांतला कुठली शाळा आपलंस करणार? उपचारादरम्यान आपली माणसं जवळ हवी, म्हणून अभ्यंकर दांपत्य गोरेगावहून पार्ल्यात, प्रशांतच्या आजोळी राहायला आले. पार्ल्याच्या उत्कर्ष मंडळाच्या मूकध्वनी शाळेत प्रशांतचा प्रवेश आणि त्याच शाळेत स्मिताला समाजसेविकेची नोकरी मिळाली. प्रशांतच्या वाटचालीत शाळेचा महत्त्वाचा वाटा आहे. अविश्वसनीय वाटेल, पण प्रशांतने पोहण्याचंही शिक्षण घेतलं आहे. स्वीमिंग थेरीपीमुळे स्टॅमिना, आत्मविश्वास वाढायला मदत झाली. पोहण्याच्या प्रगतीबद्दल १९९४ साली तत्कालीन महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्या हस्ते त्याचा सत्कारसुद्धा झाला.
हिअरिंग एडमुळे थोडं-थोडं बोलणं-एकणं-शिकणं, प्रतिसाद देणं, ओठांच्या हालचाली ओळखून वाचन, शब्दोच्चार अशी प्रगती सुरु होती.
आठव्या वर्षी प्रशांतने पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या दिशा कर्णबधीर विद्यालयात प्रवेश घेतला. इथे त्याची संगणकाशी जी दोस्ती झाली ती नेहमीसाठीच. प्रशांतसारख्या मुलांसाठी DTP हा करियरसाठी चांगला पर्याय होऊ शकतो, हे त्याने सिद्धचं केलं. प्रशांत स्वकमाईतला काही हिस्सा नियमितपणे गरजू मुलांना फी भरण्यासाठी देतो, हे सांगण्यासारखं.
प्रशांतला काही आनंदक्षणांनी भिजवलं आहे. 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्याकडून कौतुकाची थाप, जागतिक अपंग दिनानिमित्त गोरेगाव स्पोर्ट्स क्लबकडून 2014 चा जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्वयंउद्योजक पुरस्कार, 2015 चा महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अपंग कल्याण राज्य पुरस्कार. प्रशांत आज व्हीलचेअरशिवाय वावरू शकत नाही. पण तो टिव्ही मालिका, मॅचेस बघण्याचा आनंद घेतो. DTP च्या कामात रमतो. शारीरिक कमतरता आयुष्याचा आस्वाद घेण्याच्या आड तो येऊ देत नाही.
प्रशांतला विचारलं, तुला काय सांगायचंय? आपल्या सांकेतिक भाषेत त्याने सांगितलं, “आनंदी रहा, छंद जोपासा, स्वावलंबी बना. स्वतःच्या कमतरतेचा बाऊ करू नका.”
मेघना धर्मेश, मुंबई

No comments:

Post a Comment