Thursday 4 May 2017

ते पाच दिवस तिला परत मिळणार !

आमदार डॉ भारती लव्हेकर यांच्या वर्सोवा मतदारसंघातल्या सर्व शाळा-कॉलेजात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग आणि डिसपोजल मशिन्स बसवली जाणार आहेत. असा कालसुसंगत उपक्रम करणारा - वर्सोवा हा महाराष्ट्रातला पहिलाच मतदारसंघ ठरणार आहे. हा ‘नवी उमेद’च्या जिव्हाळ्याचा, गेलं वर्षभर लावून धरलेला विषय असल्याने आज, या पोस्टद्वारे आम्ही भारतीताईंचं अभिनंदन करत आहोत. विशेष म्हणजे, भारतीताईंनी स्वतःहून, ही बातमी आम्हाला कळवली. मतदारसंघातली एखादी समस्या संवेदनशीलपणे जाणून घेऊन तड लावणार्‍या सर्वच आमदारांना पाठबळ द्यायला हवं.
मतदारसंघातल्या एखाद्या घरात मुलगी जन्माला आली, की भारतीताई स्वतः त्या तान्हुलीचं स्वागत करायला जातात, यावर ‘नवी उमेद’ने मागे लिहिलं आहेच. मासिक पाळीच्या दिवसांतलं मुलींचं आरोग्य हा खूप लक्ष देण्याचा, मुली – पालक - शिक्षक या सगळ्यांनाच जागरूक करण्याचा विषय. हे लक्षात घेऊन भारतीताईनी सुरू केलेल्या कामाने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या वर्सोवा मतदारसंघातल्या सर्व शाळा-कॉलेजांत आणि अन्य मोक्याच्या ठिकाणी मशिन्स बसवली जाणार आहेत. मशिनमधून नॅपकिन्स काढण्यासाठी रिचार्ज करता येण्यासारखं स्मार्ट कार्डही तयार केलं आहे.
उपक्रमाची सुरूवात उद्याच (२१ एप्रिल १७) चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर संस्थेच्या यारी रोड इथल्या शाळेत आणि कॉमर्स कॉलेजात होणार आहे.भारतीताईंच्या प्रयत्नांमुळे ही अत्याधुनिक सुविधा देणं शक्य झाल्याचं संस्थापक अजय कौल म्हणाले. संस्थेचे ऍक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत कशिद यांनी सांगितलं, “या निर्णयाने शाळेतल्या मुलींना फारच आनंद झाला आहे. शाळा आणि कॉलेज मिळून सुमारे अडीच हजार मुली या मशीन्सचा लाभ घेतील.” 
लातूर जिल्ह्यातल्या तांदुळजा जिप शाळा, पारधेवाडी आणि पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन इथे अलिकडेच एनजीओच्या पुढाकाराने मशिन्स बसवली गेली असल्याचं ‘नवी उमेद’ पेजवरून आम्ही प्रसिद्ध केलंच आहे. आता मुंबईतल्या शाळेचाही समावेश यात होत आहे.
आमदार निधीतून मुली-स्त्रियांसाठी ही मशिन्स बसवण्याची परवानगी मिळावी, ही मागणी भारती लव्हेकर यांनी लावून धरली आहे. तसा धोरणात्मक निर्णय अजून झाला नसला, तरी स्वतःच्या आमदार निधीतून मतदारसंघात मशिन्स बसवण्याची परवानगी त्यांनी मिळवली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे हे घडल्याचं भारतीताई म्हणाल्या.
भारतीताई या विधिमंडळाच्या महिला कल्याण समितीच्या सदस्य आहेत. समितीच्या दौर्‍यांदरम्यान जिप शाळा, आश्रमशाळा, वसतीगृह पाहाताना मासिक पाळीच्या काळातली मुलींची सॅनिटरी नॅपकिन्सची निकड भागवणं किती तातडीचं आहे, हे त्यांना जाणवलं. याचसाठी त्यांनी आणि अन्य आमदारांनी त्यासंबंधीच्या धोरणाचा आग्रह धरला आहे. युनिसेफच्या अजेंड्यावरही हा विषय अग्रक्रमाने आहे.
 भारतीताईंनी माहिती दिल्यानुसार वर्सोवा मतदारसंघातल्या सुमारे ५०० जागा मशिन्स बसवण्यासाठी हेरल्या आहेत. यात मेट्रो स्टेशन, बस डेपो, महिलांची स्वच्छतागृह, झोपड्या आणि चाळी असलेल्या वस्त्या आहेत. पोलिस स्टेशनकडूनही मशिन्सची मागणी आली आहे. मतदारसंघाबाहेरचे लोकही माझ्याकडे मशिन्ससाठी मागणी करताहेत, असं त्या म्हणाल्या. टप्प्याटप्प्याने मशिन्स बसवली जातील. सॅनिटरी नॅपकिन्सचा सुरळीत पुरवठा, मशिन्सचा मेंटेनन्स ही यापुढची आव्हानं आहेत. मुली आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागृती करणंही सुरूच ठेवणार असल्याचं भारती लव्हेकर म्हणाल्या. 
- समता रेड्डी, लता परब

No comments:

Post a Comment