Thursday 4 May 2017

पोस्टवरच्या लाइक्सपेक्षा इंपॅक्ट महत्वाचा, हे कळलं

नवी उमेद वर्षपूर्ती 
टीमचं मनोगत
बघता बघता नवी उमेदला आणि मलाही उमेदसोबत काम करायला लागून एक वर्ष पूर्ण झालं. नेहमीपेक्षा वेगळं काम म्हणून ही जबाबदारी घेतली. पेजचं काम सुरू केलं तेव्हा मी कुणा मित्र-मैत्रिणींचे फोटो लाईक करणं, क्वचितच कमेंट करणं, जुन्या शाळा-कॉलेजातल्या मित्र-मैत्रिणींशी पुनर्भेट एवढ्यापुरतंच फेसबुक वापरत होते. जरा नवीन कुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली तरी ओळखीचं नसताना नकोच ऍक्सेप्ट करायला, असा विचार करायचे. 
नंतर जसं रोज फेसबुकवरचं पेज हँडल करायला लागले तशी मला या माध्यमाची ताकद जाणवायला लागली. म्हणजे एक पोस्ट होती, ‘मुलींच्या नावाच्या पाट्या’ ही. ती प्रसिद्ध झाली. नंतर एक-दोन दिवसातच पोस्टनायक दादाभाऊ जगदाळे यांचा फोन आला. त्यांच्या कामाविषयीची पोस्ट शेअर होत होत जालना सीईओपर्यन्त पोचली होती. त्यांनी त्याच दिवशी दुपारी दादाभाऊना बोलावून घेतलं, त्यांचं कौतुक केलं आणि जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. दादाभाऊ अगदी भारावून गेले होते. तुमच्यामुळे आणि नवी उमेदमुळे हे घडू शकलं, असं म्हणत राहिले. या प्रसंगामुळे माणसाला पाठिंब्याची, पाठीवर कुणाचा तरी हात असण्याची किती गरज असते आणि त्यातून पुढं काम करायचीही ऊर्जा मिळत राहते, हे जाणवलं. अर्थातच ती ऊर्जा माझ्यापर्यंतही पोहोचली.
माझं काम आलेल्या लेखांच्या संपादनाचं, तो थोडक्या शब्दांत पोस्टमध्ये रूपांतरित करायचा. लेख अशासाठी म्हणते, कारण माझ्यासह सगळ्यांनाच भारंभार लिहायची सवय. पण निरीक्षणातून हे लक्षात आलेलं की ‘रीड मोअर’ आलं की वाचक पुढे जात नाहीत. इतका पेशन्स आता कुणामध्येच नाही. म्हणून मग पोस्ट 700-800 वरून 500 शब्दांपर्यत आणली. फेसबुकने सांगितलं की वाचकांमध्ये मोबाईलवर वाचणारे अधिक आहेत. मग मोबाईलच्या स्क्रीनवर पटकन वाचता येणारी छोटीच गोष्ट हवी हे लक्षात आलं. जास्त शब्दांत आपण जेवढा आशय व्यक्त करतो तोच कमी शब्दातही सांगू शकतो हे मला तेव्हाच जाणवलं. आता मी योग्य आशय थोडक्या शब्दातही वाचकांपर्यंत पोचवू शकते. आत्तापर्यंत मी काम केलं होतं ते फिचर एजन्सीसाठी, साप्ताहिक किंवा क्वचित कधी पेपरसाठी. संपर्कसोबत पुणे प्रतिनिधी म्हणूनही काम केलं होतं. पण उमेदनी मला एकाचवेळी संपादक आणि समन्वयक अशा दोन्ही जबाबदाऱ्या दिल्या. समन्वयक म्हणून एकाचवेळी 20-22 जणांशी संपर्कात राहायचं, विषयांची चर्चा करायची, त्यांना एकत्र बांधून ठेवायचं, टीमस्पिरिट टिकवायचं, ही खरी माझी परीक्षा. पण माझ्या टीमनं नेहमीच सहकार्य केलं. एकदा विषयांचे निर्णय झाल्यावर सगळ्यांनीच त्यानुसार काम केलं, नवं काही सुचवलं आणि स्वतःहून सतत संपर्कात राहिलेसुद्धा.
पेजच्या कितीतरी तांत्रिक बाबी सुरुवातीला कळायच्या नाहीत. हळूहळू पोस्टचा ‘रिच’ किती, वाचक संख्या, पोस्ट आधीच draft करून ठेवणं, नंतर त्या शेड्युल करणं यामुळं काम खूपच सोपं झालं. फेसबुकने ही शिस्त घालून घ्यायला एक प्रकारे मदतच केली. तांत्रिक बाबी शिकताना कळलं की पोस्टला मिळालेल्या लाईक हा एक अगदीच छोटा, खरं तर दुर्लक्षित करण्याचा भाग आहे. खरं महत्त्व आहे ते कमेंटला आणि शेअर होत होत घडून येणार्याो इंपॅक्टला.
उमेदचं काम सुरू असतांनाच आम्ही विकासपिडियासह वेबलेखन प्रशिक्षण शिबीर आयोजित केलं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. उमेदला काही नवे लेखकही यातून गवसले.
वर्षपूर्तीनिमित्ताने हे सगळं शेअर करावंसं वाटलं. सोशल मिडियावरच्या नव्या प्रयोगात सहभागी होण्याचं मोठं समाधान वाटत आहे. वाचकांचा छान प्रतिसाद मिळत आहे. लहान मुलं-मुली हा आमचा फोकस आहे. लवकरच आम्ही काही नव्या कल्पना घेऊन येऊ. शेवटी मला आमच्या जिल्हा प्रतिनिधींचे खास आभार मानायचे आहेत खास. सलग वर्षभर नवनवीन विषय शोधून ते उत्साहात लिहीत राहिले. त्यांच्या पोस्टसने पेजचा प्रभाव वाढत आहे.
 : वर्षा जोशी-आठवले, संपादक-समन्वयक



No comments:

Post a Comment