Sunday 14 May 2017

सोशल मिडियाबद्दल पसरलेल्या निगेटिव्हिटीला ‘नवी उमेद’ हे प्रभावी उत्तर

नवी उमेद वर्षपूर्ती 
टीमचं मनोगत
सोशल मिडियाबद्दल पसरलेल्या निगेटिव्हिटीला ‘नवी उमेद’ हे प्रभावी उत्तर आहे :
आशय गुणे,`नवी उमेद' टीमचे अनौपचारिक मार्गदर्शक, प्रथम या संस्थेत कार्यरत.
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या एका संध्याकाळी मला मेधाताईंचा फोन आला. "अरे आशय, आम्हाला 'संपर्क'चे फेसबुक पेज चालविण्यासाठी कुणीतरी हवे आहे. तुझ्या ओळखीचे कुणी आहे का?" मी क्षणभर विचारात पडलो. पण मग म्हटलं, "मीच करतो की!" आणि मी प्राथमिक कामाला सुरुवात केली. ‘संपर्क’मध्ये हेमंत कर्णिक आहेत, हे मला त्याच दिवशी कळलं. ते माझ्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये होते, पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती.
हे सगळं अगदी मागच्याच वर्षी झाले आहे, ह्यावर खरं तर विश्वासच बसत नाही. 'नवी उमेद'च्या टीमसोबत जुळलेलं 'ट्युनिंग' हे खूप आधीपासून आहे, असं वाटतंय.
सोशल मीडिया, आणि विशेषतः फेसबुक हे आज अतिशय महत्वाचे माध्यम आहे. पण हे किती लोकांच्या लक्षात येते? आपण सगळेजण फेसबुकवर सक्रीय असतो. अनेक विषय वाचतो आणि त्या विषयांवर आपले मतदेखील व्यक्त करतो. पण आपल्या ह्या मताद्वारे आपण काही विधायक करू शकतो का? इंटरनेट हा माहितीचा साठा आहे, हे मान्य. पण ह्या माहितीची किंवा त्यातून सुचत असलेल्या कल्पनांची देवाणघेवाण झाली तर? तर हे नक्कीच आपल्या सर्वांच्या फायद्याचे ठरेल. शिवाय, सोशल मिडियाबद्दल जी काही निगेटीव्हीटी समाजात पसरलेली आहे त्याला हा असा सकारात्मक वापर, हे नक्कीच एक प्रभावी उत्तर असेल.
आणि म्हणता म्हणता एक प्लॅन तयार झाला. पेजसंबंधित कामं आणि माहिती ह्यासाठी एक विशेष ग्रुप वॉट्सअप वर तयार झाला. पॉझिटिव्ह स्टोरीज पेजवर शेअर अथवा प्रकाशित करायच्या, हे ठरल्यानुसार सुरू झालं. त्याला थोडा प्रतिसाद मिळू लागला. आणि मग वाटलं, जर आपलं पेज महाराष्ट्रातून चांगल्या घडामोडी एकत्रित करण्याचा एक प्लॅटफॉर्म म्हणून समोर आलं तर?
संपर्कचे काही कार्यकर्ते, पत्रकार होतेच. त्यांचा संस्थेशी ऋणानुबंध असल्यामुळे त्यांनी हे काम सुरुवातीला हाती घेतलं. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागातून सकारात्मक घडामोडी येऊ लागल्या. आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग आणखी काही जिल्ह्यांतले पत्रकार टीममध्ये सामील झाले. स्टोरीला लाईक्स मिळू लागल्या आणि लोकं त्या शेअर करू लागले. ह्याचा अर्थ असा की फेसबुकद्वारे सकारात्मक गोष्टी 'शेअर' होऊन अनेक लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. आणि आमचा उत्साह वाढला. आम्ही लगेच जून महिन्यात फेसबुक वापरण्याबद्दल आमच्यातच एक वर्कशॉप घेतलं. आमच्या ह्या मित्रांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि आता सगळे फेसबुकवर सक्रिय झाले आहेत.
दरम्यान मी माझा फोन नंबर नवी उमेद पेज च्या 'contact us' मध्ये टाकला. कधी कधी फोन येतो, "नमस्कार, मी लातूरहून बोलतो आहे. सोलापूरच्या अबक ह्यांनी लिहिलेली स्टोरी वाचली. आवडली. मला माझ्याकडे तिचे अनुकरण करायचे आहे. त्यांना संपर्क करायचा आहे...” पेजचा उद्देश सफल होताना पाहणं हा नक्कीच एक वेगळा आनंद आहे!

No comments:

Post a Comment