Sunday 18 June 2017

गोष्ट एका छोट्या शाळेची


सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कुडाळ तालुका. इथल्या वाडोस या अती दुर्गम गावातील एकुंद्रा वाडी. वाडीवर अवघी २५ घरं! इथल्या जिल्हापरिषद शाळेत, मनिषा सावंत यांची मे २०१३ मध्ये उपशिक्षिका पदावर नेमणूक झाली. शाळा पहिली ते पाचवीपर्यंतची. शाळेत १२ विद्यार्थी आणि २ शिक्षक. संपूर्ण इमारतीला भेगा पडलेल्या. सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर आणि पावसाळ्यात कधीही इमारत कोसळेल अशी अवस्था. मुलं जीव मुठीत घेऊनच इथं शिकायला येतात हे लगेचच सावंत यांच्या लक्षात आलं. सावंत बाई अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी वाडीवरील पालकांना बोलावून घेतलं. हेतू प्रामाणिक आणि काम चांगलं असलं की लोकसहभाग आपोआप मिळतो. अगदी तसंच झालं. शाळेला स्वतःची जागा नव्हती. लोक एकत्र येऊ लागले. २०१४ साली कामत आणि म्हाडगूत कुटुंबीयांनी सात गुंठे जमीन शाळेला भेट दिली. २०१६ साली सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं.
सावंत बाईंचं स्वप्न इथूनही पुढचं होतं. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २४३ शाळा. त्यापैकी काही डिजिटल. आपलीही शाळा डिजिटल व्हायला हवी हा मनोदय त्यांनी ग्रामस्थांच्या कानी घातला. वर्गणी जमा झाली. २०१६ सालीच शाळा डिजिटल झाली.
 आता एकुंद्रा वाडीवरची शाळा सर्व सोयीयुक्त आहे. त्यात सहाय्यक शिक्षक मनोज खोचरे अणि गावकरी यांचाही महत्वाचा वाटा आहे. नवीन शैक्षणिक धोरणास अनुरूप अशा ज्ञानरचनावादी पद्धतीने अध्ययन केलं जातं. मनीषा सावंत यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कुडाळ शाखेने 'उपक्रमशील शिक्षकरत्न' हा पुरस्कार दिला आहे.
या सन्मानाने आणि अधिकारी वर्गाच्या शाबासकीने सावंत बाईंना प्रेरणा मिळाली. आयएसओ मानांकनासाठी त्यांनी अर्ज केला. आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या. आणि यावर्षीच्या महाराष्ट्रदिनी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. कुडाळ तालुक्याच्या उपसभापती श्रेया परब यांच्या हस्ते एकुंद्रा शाळेला आयएसओ मानांकन मिळालं.
 प्रबळ इच्छाशक्ती आणि चांगलं काम, जनसहभाग आणि अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन यामुळे सावंत बाईंनी एका छोट्याशा शाळेला योग्य मार्गावर आणलं. इतर शाळा, शिक्षक आणि पालकांनीही यातून प्रेरणा घ्यावी.

- विजय नाना पालकर.

No comments:

Post a Comment