Wednesday 21 June 2017

दुष्काळग्रस्त मुलांचं 'स्नेहवन'



परभणी जिल्हा. मानवत तालुक्यातील मंगरूळ बु.येथील तरुण अशोक देशमाने. घरची परिस्थिती जेमतेम. पाच-सहा एकर शेती. वडील बाबाराव व आई सत्यभामा शेती, शिवणकाम करून घर चालवतात. याच परिस्थितीतून त्यांनी अशोकला अभियांत्रिकीचं शिक्षण दिलं. अशोकला पुण्यात आयटीत सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरीही मिळाली. नोकरी लागून पाच वर्ष होत आली आणि आई-वडिल सुखावले. अशोक सुट्टी मिळेल तसा गावीही येऊ-जाऊ लागला. या काळात गावातलं चित्र मात्र बदलत नव्हतं. २०१३ च्या दिवाळीतही अशोक गावीच होता. दुष्काळाची झळ दिसत होती. अशोक सांगतो,''गावातलं चित्र पाहून उद्विग्न अवस्थेत मी परत पुण्याला आलो आणि नोकरीवर रुजू झालो. मन लागत नव्हतं. या मुलांसाठी काहीतरी करावंसं वाटत होतं. पण, नेमकं काय हे समजत नव्हतं. स्वतःच्या भूतकाळात डोकावलो तेव्हा जाणवलं, की आपली परिस्थिती फक्त शिक्षणाने बदलली. दिशा मिळाली. ठरलं, आपण या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे. त्यांची संपूर्ण जबाबदारी घ्यायची. त्याच काळात प्रकाशभाऊ आमटे यांची भेट झाली, त्यांना मी माझा संकल्प बोलून दाखवला. त्यांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर मी नोकरी सोडून पूर्णवेळ स्नेहवन साठी काम करायचं ठरवलं. भोसरीत माझे कवीमित्र अनिल कोठे राहतात, ते व्यावसायिक आहेत सोबतच सामाजिक कामाची आवड जपतात. त्यांच्याशी बोललो. त्यांनी त्यांचं ५ खोल्यांचं भोसरीतलं घर विनाभाडेतत्वावर वापरायला दिलं, रात्री नोकरी करत मी त्या घराची आणि डागडुगी करून घेतली आणि स्नेहवनची सुरुवात झाली''.
त्यानंतर अशोकनं परभणी, हिंगोली, जालना, बीड, औरंगाबाद आणि वर्धा जिल्ह्यातील १७ मुलांना शिक्षण व संगोपनासाठी पुण्यात आणलं. ''मुलं आली. पण सुरुवातीला खूप अडचणी आल्या. गावात राहणारी मुलं, त्यामुळे मराठी भाषेतही थोडाफार बदल होता, त्यांना शहरी जीवनमान माहिती नव्हते. मग टॉयलेटमध्ये कसं बसायचं, ब्रश कसा करायचा इथंपासून शिकवावं लागलं. तेंव्हा मी नाईट शिफ्ट घेतली. सुरुवातीला ८ महिने असं काम केलं. नंतर नोकरी सोडली. रात्रभर नोकरी करून आल्यानंतर मुलांचे खूप सारे प्रॉब्लेम्स असायचे, कुणी रडायचं, कुणाचा अभ्यास बाकी असायचा, कुणाला घरची आठवण यायची, कुणी भांडण करायचं. दिवसभर झोपही मिळायची नाही. ऑफिसला जाताना प्रवासात २ तास झोपायचो, तेवढंच'', अशोक सांगत होता.
दरम्यान ‘स्नेहवन’ची माहिती अमेरिकेत स्थायिक असलेल्या चेन्नईच्या एका कुटुंबाच्या कानावर गेली. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन काम बघितलं आणि तीन संगणक, एक लॅपटॉप संस्थेला भेट दिला. मित्रांकडून होणारी मदत आणि पाच वर्षांत नोकरीतून जमवलेले पैसे यातून सध्या संस्थेचं काम सुरू आहे. आता मुलांना तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याचा निर्णयही त्यानं घेतला आहे. आगामी वर्षात ४० मुलांना पालनपोषण व शिक्षणाकरिता दत्तक घ्यायचं असून, त्यासाठी समाजानेही मदतीचा हात पुढं करावा, अशी अपेक्षा अशोक व्यक्त करतो.
 अशोक देशमाने यांचा संपर्क क्र. - 8796400484

- बाळासाहेब काळे, परभणी

No comments:

Post a Comment