Sunday 4 June 2017

अरेरे नव्हे, अरे व्वा ची गरज!


विकलांग, अपंग मुलं इतरांच्या सहानुभूतीवर जगतात, असा सर्वसामान्य समज. पण अशा मुलांमधील 'सिक्स्थ सेन्स' हा सामान्य मुलांच्या तुलनेत अधिक असतो. त्यांना आत्मसन्मान मिळाला, ती एकदा आत्मनिर्भर झाली की, त्यांना कुणाची सहानुभूती किंवा आधार लागत नाही. अशीच काही मुलं, २९ एप्रिलला यवतमाळमधील ‘जिल्हा सातत्यपूर्ण शैक्षणिक विकास संस्थे’ने आयोजित केलेल्या 'दिव्यप्रभा' या कार्यक्रमात एकत्र आली. 
दिव्यंगत्वाचे नाना पैलू आहेत. प्रत्येक दिव्यांगांपुढे आभाळाएवढी आव्हानं! पण ही आव्हानं दिव्यांग मुलं आपल्या क्षमतेप्रमाणे परतूवन लावतात. व्यक्तिगत आव्हानांपेक्षा कौटुंबिक, सामाजिक आव्हानांना सामोरे जाताना प्रचंड दमछाक होते, हे वास्तव या कार्यक्रमात चिमुकल्यांनी उलगडले तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले. 'आम्हाला तुमच्या सहानुभूतीची कुबडी नको, सन्मानजनक सहकार्य हवंय. अरेरे!ची सांत्वना नको, तर अरे व्वा! अशी कौतुकाची थाप हवीय’! असे आर्जव एका विद्यार्थिनीने केले.
इथं आलेल्या सुमय्या परवीनची गोष्ट प्रेरणादायी आहे. तिचे वडील अब्दुल अजीज शेख लाडखेड (ता.दारव्हा जि.यवतमाळ) येथे रिक्षा चालवितात. त्यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह. सुमय्याची आई अफरोज जहान अब्दुल अजीज सातवी शिकलेली. सुमय्या पोटात होती तेव्हा कुटुंबाने तिच्या आगमनाची जय्यत तयारी केली. पण, सुमय्याचा जन्म झाला आणि कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती जन्मतः अस्थिव्यंग. जणू मासाचा गोळाच. हाडं वेडीवाकडी. पालकांनी अनेक ठिकाणी सुमय्याला दाखविले. पण या अस्थिव्यंगावर उपचारच नसल्याचे त्यांना सर्वत्र सांगण्यात आले. घरात आलेला जीव जगवायची धडपड हे आई-वडील गेल्या १७ वर्षांपासून करीत आहेत. सुमय्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. तिचं संपूर्ण शरीर गाठोड्यासारखं. उंची एक ते दीड फुटांच्या आत. कुणीतरी उचलून घेतल्याशिवाय ती जागची हलुही शकत नाही.
'दिव्यप्रभा' कार्यक्रमाची सुरूवातच सुमय्याच्या प्रार्थनेने झाली. तिच्या गोड आवाज सुप्त कौशल्य दाखवून गेला. तिच्या यशाची दखल घेऊन तिचा गौरवही यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषद उर्दू शाळा लाडखेड येथे सुमय्या सर्वसमावेशीत प्रकल्पांतर्गत सामान्य मुलांच्या शाळेत शिकते. ती अत्यंत कुशाग्र बुद्धीची आहे. अशा अनेक सुमय्या दिव्यप्रभातून समाजासमोर आल्या.
समावेशित शिक्षणांतर्गत सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या सर्वांनी दिलेली अरेव्वाची थाप म्हणजे 'दिव्यप्रभा' हा कार्यक्रम होय, अशी प्रतिक्रिया जिल्हा सातत्यपूर्ण शैक्षणिक विकास संस्थेचे प्राचार्य आणि या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. प्रशांत गावंडे यांनी दिली.
 दिव्यांगांचा या प्रकाराचा राज्यातील हा पहिलाच कार्यक्रम होता. 'दिव्यप्रभा'तील दिव्यांगांच्या यशोगाथांमुळे या मुलांसाठी काम करणारे शिक्षक, पालक, विद्यार्थी, विषय साधन व्यक्ती, समावेशित तज्ज्ञ, फिरते विषय शिक्षक आदिंचे मनोबल निश्चितच वाढेल. सर्वसाधारण मुलांच्या आई-वडिलांनीसुद्धा आपल्या मुलांकडे सकारात्मक दृष्टीने बघावे, असे अनेक पैलू दिव्यप्रभातून उलगडले. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला जगण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार आहे. त्यांचा तो अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हेच खरे!


- नितीन पखाले.

No comments:

Post a Comment