Sunday 18 June 2017

'नकोशी' झाली हवीहवीशी!

एकेकाळी महाराष्ट्रात मुलांची नावं दगडू, कचरु अशी ठेवायची प्रथा होती. असं नाव ठेवल्यानं मुलं जगतात, अशी त्यामागची अंधश्रद्धा. अगदी 2011 पर्यंत सातारा जिल्ह्यातही दोन मुलींपाठोपाठ तिसरीही मुलगीच जन्माला आली तर तिचं नाव 'नकुशी' ठेवण्याची प्रथा होती, त्यानंतर मुलगा होतो ही भीषण अंधश्रद्धा!! मात्र 2011 मध्ये सातारा जिल्हा प्रशासनाच्या मदतीने साताऱ्यातील 265 चिमुरड्यांचे हे अवमानकारक नाव बदलण्यात आले. एका चिमुरडीचे आयुष्यही काही महिन्यांपूर्वी असेच बदलले. तिच्यावरचा 'नकुसा'चा शिक्का पुसला गेला आणि तिला नवं नाव मिळालं- सोनल. ही सत्यकथा आहे रत्नागिरी जि.प. शाळा नाचणे क्रमांक 1 मध्ये शिकणाऱ्या सोनलची. मोलमजुरी करणाऱ्या आईबापांचे सोनल हे चौथे अपत्य. त्यात तिच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या दोन बहिणी लहानवयातच अकाली गेल्या. सलग चौथी मुलगी झाल्याने समाजापुढे झुकत पालकांनी नाव ठेवले- नकुसा.

खरंतर आपली सोनल समंजस आणि हुशार आहे. दुसरीत शिकणाऱ्या सोनलला 'नकुसा' या नावाचा अर्थही उमगणे शक्य नाही. पण तिचं नाव 'नकुसा' असणं हा तिच्यावरचा अन्याय तर आहेच, शिवाय यामुळे एक अतिशय चुकीचं उदाहरण समाजासमोर ठेवलं जातंय, याची जाणीव एका अधिकाऱ्याला झाली आणि मग तिचं नाव बदललं. ते अधिकारी आहेत- रत्नागिरी जिल्हा शिक्षण आणि सातत्यपूर्ण विकास संस्थेचे प्राचार्य- डॉ. आय.सी.शेख.
'एक दिवस शाळेसाठी' या उपक्रमातंर्गत डॉ. शेख नाचणेच्या शाळेत आले होते. छोट्या मुलांसोबत गप्पा मारण्यात रमून गेले असताना त्यांनी सोनलला तिचं नाव काय हा प्रश्न विचारला आणि उत्तर आलं- नकुसा! तिचं उत्तर ऐकून डॉ. शेख क्षणभर थबकले, पण त्यांनी मुलांशी आणखी थोड्या गप्पा मारल्या. मग मात्र त्यांनी शिक्षकांकडे या नावाविषयी चौकशी केली आणि 'नकुसा' या नावामागची कहाणी जाणून घेतली. तिच्या पालकांशी बोलून हे अन्यायकारक नाव बदलण्याचा सरांनी निर्णय घेतला. सोनलच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आलं. शेख सरांनी त्यांची भेट घेतली. आपण अगदी आपल्या आईबापांनाही नकोसे झालेले आहोत, असे सुचवणारे हे 'नकुसा' नाव किती अन्यायकारक आहे, ते त्यांनी पालकांना समजावले. त्यापेक्षा तिचं चांगलं नाव ठेवलं तर ते नाव तिला भविष्यात आत्मविश्वास देईल आणि आईबापांच्या प्रेमाचीही जाणीव करुन देईल, हेही सांगितले.
आनंदाची गोष्ट म्हणजे तिच्या आईवडिलांनीही या प्रस्तावाला विरोध केला नाही. उलट समाजाच्या दबावाला बळी पडत, लेकराच्या मनाचा विचार न करता चुकीचं नाव ठेवल्याचा पश्चाताप व्यक्त केला. आणि मग डॉ. शेख सरांच्या उपस्थितीत त्यांच्याच मांडीवर बसून 'नकुसा'चे नामकरण झालं - सोनल शिंदे. मित्र-मैत्रिणींच्या टाळ्यांनी आणि पालकांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी प्रसंगाची शोभा वाढवली. या लेखाच्या लेखिका अश्विनी काणे यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सरकारी गॅझेटमध्ये सोनल शिंदे हेच नाव कायदेशीररीत्या बदलून घेतले आहे.

सुजाण शिक्षक, जाणत्या शाळा : 'नकोशी' झाली हवीहवीशी!
लेखन- अश्विनी काणे, विषयतज्ज्ञ आणि साधनव्यक्ती, रत्नागिरी

No comments:

Post a Comment