Sunday 4 June 2017

कोठाळे बुद्रुकचा 'मास्टरशेफ' !!

सुजाण शिक्षक, जाणत्या शाळा :
जि.प. प्राथमिक शाळा कोठाळे बुद्रुक, ता. घनसावंगी, जि. जालना. मैदानात अनेक चुली पेटलेल्या. आणि शालेय गणवेषातील विद्यार्थी- विद्यार्थिनी त्यावर स्वयंपाक करण्यात रमलेले आहेत. एकजण पुऱ्या लाटतोय, तर दुसरी विद्यार्थिनी सांबार फोडणीला टाकतेय, कुणी कांदा चिरतोय, तर कुणी लाडू वळण्यात मग्न आहे. 
हे दृश्य आहे 'मीना- राजू मंच' पाककला स्पर्धेचं. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी असा गट असणं अनिवार्य आहे. स्पर्धेत, त्या दोघांनाही शाळेच्या मैदानावर 45 मिनिटांत पदार्थ बनवून दाखवायचा आहे. या शाळेतील 'मीना- राजू मंच'चे सुगमकर्ते राजू सावंत गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन करीत आहेत.
स्त्री- पुरुष समानतेचं उद्दिष्ट घेऊन राज्याच्या शिक्षण विभागातर्फे हा 'मीना- राजू मंच' कार्यक्रम चालवला जातो. 
"लिंगभावसमानतेचे धडे केवळ शिकविण्याच्या पातळीवर न राहता ते आचरणातही यावेत असा माझा प्रयत्न असतो. स्वयंपाक ही महिलांची जबाबदारी असं मानलं जातं. प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाला स्वयंपाक करता यायलाच हवा, असं मला वाटतं. प्रत्येकाला भूक लागते, तर ती स्वत:हून भागवताही आली पाहिजे. आणि घरातल्या कामाची जबाबदारी एकट्या बाईवर टाकणं योग्य नाही, त्यात घरातल्या पुरुषांसह सर्वांनी मदत करायला हवी " सावंत सर बोलत होते. "गप्पा मारताना हा गुण मुलग्यांमधे रुजविण्याचा मी प्रयत्न करीत होतो. त्याच दरम्यान स्टार प्लस वाहिनीवर 'मास्टरशेफ इंडिया' या स्पर्धेची सुरुवात झाली. पाककलेची हौस असलेले अनेक स्त्री- पुरुष या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेने 'स्वयंपाक' या कलेला प्रतिष्ठा मिळवून दिली, असं मला वाटतं. कारण या स्पर्धेच्या विजेत्यांना भरपूर प्रसिद्धीसोबतच तब्बल एक कोटी रुपयांचं बक्षीसही मिळणार होते. अशीच स्पर्धा जर आपल्याही शाळेत घेतली तर? शिवाय या स्पर्धेद्वारे आपण मुलग्यांनाही स्वयंपाक करायला प्रोत्साहन दिलं, तर समानतेचं उद्दिष्ट काही प्रमाणात प्रत्यक्षात उतरेल, असं मला वाटलं."
सरांनी प्रत्यक्ष स्पर्धा आयोजित केली तेव्हा फक्त सात जोड्या स्पर्धेत सहभागी झाल्या. स्पर्धेत मुलगा- मुलगी अशीच जोडी हवी ही अट पालकांना विचित्र वाटत होती. त्याऐवजी दोन मित्रांना किंवा मैत्रिणींना सहभागी करुन घ्या, अशी विनंती ते करत होते. उद्दिष्ट होतं, समानतेचं. म्हणून सरांनी ही अट मुळीच बदलली नाही. हळूहळू पाककला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला.
स्पर्धेच्या निमित्ताने मुला- मुलींचा संवाद, सहकार्य आणि मैत्री वाढीस लागली आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थी पुरी- भाजी, इडली- सांबार, भेळ असे अनेक पदार्थ बनवतात. शाळेच्या मैदानावर स्वयंपाक करताना त्यांना कसलीही इजा होऊ नये यासाठी शिक्षक आणि स्वयंसेवक देखरेख करीत असतात. शिवाय प्रथमोपचाराची पेटी आणि पाण्याने भरलेल्या बादल्याही बाजूला असतातच.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमुळे मुलग्यांना स्त्रियांच्या घरातल्या कष्टांचं महत्त्व समजू लागलं आहे. अनेक मुलगे आता त्यांच्या आया- बहिणींना घरात स्वयंपाक आणि साफसफाईत प्रत्यक्ष मदत करताना दिसतात.
 लेखन- प्रल्हाद सोलाटे.

No comments:

Post a Comment