Sunday 4 June 2017

ll गुरूजींना लागला लळा l ३६५ दिवस भरते शाळा ll


उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातलं एकुरगा गाव. इथल्या जिल्हा परिषद शाळा शिक्षकाला शाळेचा इतका लळा लागला की त्याने पत्नीच्या मदतीने शाळेचं नंदनवन करून टाकलं आहे. इतकंच नाही, तर वर्षातले ३६५ दिवस शाळा सुरू ठेवण्याचा आगळावेगळा उपक्रमही त्याने घडवून आणला. चार वर्षापूर्वी, शिवदास भागवत यांना सहशिक्षक पदावर
नियुक्ती मिळाली, तेव्हा शाळेची अवस्था बिकट होती. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग. विद्यार्थी गळती, अस्वच्छ परिसर, सुविधांचा अभाव असं सगळं. हे पाहूनच त्यांनी शाळेचा कायापालट करण्याचा निश्चय केला. गावकऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील, असे उपक्रमही घेण्याची त्यांनी तयारी दाखविली. अभ्यासासोबत कौशल्यविकास प्रशिक्षण, नवीन खेळ, प्राणायाम, योगासनं असे उपक्रम आखले. गावकऱ्यांनीही साथ देण्याची ग्वाही दिली आणि बदल घडू लागला.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत भोरे, गावकरी, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या सहकार्याने भागवत यांनी विकास आराखडा तयार केला. तो गावकऱ्यांसमोर मांडून देणगीचं आवाहन करण्यात आलं. यातून दोन लाख रूपये जमा झाले. त्यातून शाळेत परसबाग, भाजीपाला शेती, शाळेची रंगरंगोटी, ई-लर्निंग, योगाभ्यास, मल्लखांब असे उपक्रम सुरू करण्यात आले. ‘भाजीपाला शेती’ या उपक्रमातून येणाऱ्या पालेभाज्यांचा उपयोग शालेय पोषण आहारात दररोज केला जाऊ लागला. मुलांचं आरोग्य उत्तम राहावं, खेळांची आवड रुजावी यासाठी त्यांना खेळाचे प्रशिक्षण दिलं जातं. गावाकरी राजेंद्र खोत विद्यार्थ्यांना दररोज दोन तास शाळेतच मल्लखांबाचे प्रशिक्षण देतात. भागवत स्वतः योग प्रशिक्षक आहेत. ते विद्यार्थ्यांना पहाटे पाच ते सात या वेळेत योगप्रशिक्षण देतात.
वर्षभरातले सर्वच्या सर्व दिवस - अगदी साप्ताहिक सुट्यांच्या दिवशीही भागवत गुरूजी शाळेतच असतात. ते या काळात झाडांची लागवड, मशागत, साफसफाई करतात विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचं प्रशिक्षण देतात. त्यांच्या पत्नी गीता या गृहिणी. पतीच्या धडपडीला साथ देण्यासाठी सुटी्च्या दिवशी मदतीला जातात. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी त्या शालेय अभ्याक्रमावर आधारित तासिकाही घेतात. त्याचा मोबदलाही त्या घेत नाहीत, हे विशेष. आता शाळेचा चेहरामोहरा बदलून गेला आहे.
भागवत सर म्हणतात, ‘'एकूरका गावकऱ्यांनी मला आपुलकीने सगळ्या उपक्रमांसाठी मदत केल्यामुळेच मला लळा लागला. ग्रामस्थांना शाळेविषयी प्रचंड प्रेम आहे. पुढच्या काळात असेच उपक्रम घेण्याचा प्रयत्न करू’'.
 शहरात वास्तव्य करून नोकरीच्या गावी ये-जा करणारे शिक्षक ग्रामीण भागात बरेचदा पाहायला मिळतात. पण भागवत सरांनी हा पायंडा मोडून काढला आहे.
शिवदास भागवत संपर्क क्र. - 7773984416


- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment