Sunday 18 June 2017

विद्यार्थ्यांसोबतचा पालकत्वाचा दीर्घ प्रवास

“त्यावेळी मुंबईत फेरीवाल्यांना हटवण्याचा विषय सुरु होता.वर्गात आमची त्यावर हिरीरीने चर्चा सुरु होती. फेरीवाल्याचं कसं रॅकेट असत, त्यांना हटवलंच पाहिजे वगैरे. मुलं बोलत होती. एक मुलगा मात्र एकदम गप्प होता. त्याला बोलतं केलं, तेव्हा कळलं की, तो स्वतः फेरीवाला आहे. रात्री तो अंड्यांची गाडी लावायचा. आपल्या वर्गमित्राचं वास्तव ऎकून वर्ग स्तब्ध झाला. त्याच्याकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी उमजल्या. मुलांचं या प्रश्नावरचं मत बदललं. असं विविध समाजघटकांचं भान विद्यार्थांकडून मिळालं”, अरूणा मॅडम सांगत होत्या. 
अध्यापन क्षेत्रात ४० वर्ष कार्यरत राहून मुंबई विद्यापीठातून अलीकडेच निवृत्त झालेल्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका अरुणा पेंडसे यांचा विद्यार्थ्यांसोबतचा पालकत्वाचा दीर्घ प्रवास जाणून घेतला.
कॉलेजचे दिवस भविष्याला दिशा देण्याचे, निर्णय घेण्याचे. घराबाहेरच्या जगाचं आकर्षण वाटू लागण्याचे. कॉलेजमधल्या प्राध्यापकांचा कमी-अधिक प्रभाव या काळात प्रत्येकावर असतो. प्राध्यापकाच्या नजरेतून कसं असतं हे नातं? विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत ते कोणती भूमिका बजावतात? 

"मी एम ए झाले, तेव्हापासूनच माझा हा प्रवास सुरू झाला. तेव्हा मी आणि माझे विद्यार्थी यांच्यात वयाचं अंतर कमी असल्यामुळे नातं पालकत्वापेक्षा मैत्रीचं होतं. हळूहळू ते पालकत्वाकडे झुकू लागलं”, अरुणा पेंडसे म्हणाल्या. दादरमधल्या कीर्ती महाविद्यालयातल्या 20 वर्षांच्या अध्यापन कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं. त्या सांगतात, “तेव्हा कीर्तीमध्ये येणारी अनेक मुलं विशिष्ट पक्षाशी, विचारसरणीशी जोडलेली असायची. त्यावेळी वर्गात चर्चेदरम्यान मी काही टीकात्मक भाष्य केलं, तर मुलांना आश्चर्य वाटायचं. तुम्ही टीका कशी काय करता, असं विचारायची मुलं. राजकारणाकडे त्रयस्थपणे पाहता येतं, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याचा माझा प्रयत्न असायचा. त्यामुळे अनेक मुलं स्वतःची भूमिका तपासून वेगळा विचार करूही लागली."

करियर,लग्न, मैत्री, प्रेमभंग यावरही मुलं बोलतात. अडचणीच्या काळात विद्यार्थी प्राध्यापकांकडेच विश्वासाने येतात. शिक्षक आपल्या प्रश्नाकडे तटस्थपणे पाहू शकतात असे मुलांना वाटतं. पालकांकडून एखाद्या बाबतीत मदत होणार नाही, असं जाणवतं, तेव्हा ती शिक्षकांकडे येतात - अरुणा मॅडम सांगतात. लैंगिक शोषणासारख्या बाबतीत आज मुली आईवडिलांकडे बोलतात पण त्या विरोधात काय पावले उचलायची, याबाबत मार्गदर्शन हवं असतं. शिक्षकांचा त्यांना आधार वाटतो. मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात आपणहून डोकावू नये. पण जेव्हा विद्यार्थी या संदर्भात मदत मागतात, तेव्हा केलीच पाहिजे, असं अरुणा मॅडमचं मत आहे. अनेक मुलामुलींना त्यांनी आंतरप्रांतीय, आंतरजातीय लग्न करण्यासाठी हिम्मत दिली आहे. आज ही सगळी मुलं सुखात नांदत असल्याचं त्या आनंदाने सांगतात. 
एक आठवण त्यांनी सांगितली, ''वर्गात एक चुणचुणीत उत्तर भारतीय मुलगी होती. एक दिवस, तिने तिचा बालविवाह झाला असल्याचं, नवरा तिला नांदवायला घेऊन जाणार असल्याचं सांगितलं. तिला ते नको होतं. तिला पुढे शिकायचं होतं. मग पोलिसांकडे जाऊन, थोडं ओळखीतून, जरब दाखवून ते लग्न रद्द केलं. त्या मुलीला संकटातून बाहेर काढता आल्याचं समाधान वाटलं.”
विद्यार्थ्यांकडूनही भरपूर काही शिकायला मिळालं असल्याचं अरुणा मॅडम सांगतात, ''आपण जे आयुष्य जगत असतो, त्याच्या पलीकडचं जग कितीतरी मोठं आहे, हेही जाणवतं. “एक मुलगा नेहमीच खूप उशिरा यायचा. एकदा त्याला त्याबद्दल विचारलं, तर त्याने झोप नीट होत नाही सांगितलं. त्याच्याशी बोलल्यावर कळलं की, तो रात्री कचरागाडीवर कामाला जायचा आणि पहाटे तीनला घरी पोचायचा. मग झोप कशी मिळणार? त्याच्या जिद्दीचं खूप कौतुक वाटलं मला.” अशी अनेक मुलं जिद्दीनं, कष्टानं शिकत आहेत. आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना शिकता येईल असं वातावरण, सुविधा मिळवून दिल्या पाहिजेत असं अरूणा पेंडसे म्हणतात. 
प्रवास पालकत्वाचा: प्रा. अरूणा पेंडसे
शब्दांकन: सोनाली काकडे 

No comments:

Post a Comment