Wednesday 21 June 2017

गोष्ट सत्यभामाची



माजलगाव तालुक्यातील सादोळा. इथल्या सत्यभामा भुजंगराव सौंदरमलची ही गोष्ट. तिला चार बहिणी, एक भाऊ. वडिल मुंबईत मजुरीला. बायको-मुलांना वाऱ्यावर सोडून त्यांनी तिथंच दुसरं लग्न केलं. आई मुलांसह माहेरी परतली. 1983-84 चा हा काळ. मुली अडाणी राहू नयेत, त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये, म्हणून आई-आजीनं मुलांना शाळेत घातलं. 
99 साली सत्यभामानं दहावीची परीक्षा दिली. सुट्टीत आई, आजीसोबत शेतात मोलमजुरीचं काम करू लागली. वयात आलेल्या सत्यभामावर गावातल्या टवाळखोरांची नजर पडली. या धनदांडग्यांना तिनं कडाडून विरोध केला. परिणाम म्हणून चोरीचा आळ घेऊन आजी-नातीला त्यांनी पोलिसांच्या हवाली केलं. सत्यभामा तीन दिवस कोठडीत राहिली. बालमनावर दहशत पसरली. दलित–सवर्ण वादाला तोंड फुटलं. तिथं मानवी हक्क अभियानाचे ॲड. एकनाथराव आवाड, बाबूराव पोटभरे आल्यानं थोडं पाठबळ मिळालं. सुटका झाल्यानंतर सत्यभामा पेटून उठली. ॲड. आवाड (जिजा) यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन तिनं काम सुरू केलं. विरोध झालाच. यातूनच ती सावरत, धीट होत गेली. 
सत्यभामा सांगतात, ‘‘लहानपणापासूनच आई, आजी यांचं एकाकी जीवन पाहत होते. कर्त्या पुरूषाचा आधार नव्हता. त्यामुळे शिक्षण घेऊन फौजदार व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्यामुळे अगोदर लहान बहिणीचं लग्न केलं. दहावीनंतर पाच वर्षे माजलगावला समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेतलं. लहानपणीच आघात झाल्यानं धीटपणा वाढवला.परंतू, बाहेर पडण्याला बंधनं आली. यातच आई, आजींनी लग्न उरकून टाकण्याची घाई केली.’’ नात्यातीलच स्थळ बघितलं. पहिलं लग्न झालेल्या, वयाने मोठ्या पुरुषाशी लग्न ठरलं. ठामपणानं सत्यभामानं या लग्नाला नकार दिला. आणि लहान बहिणीचा दीर नारायण डावरे याच्याशी 2004 साली लग्न केलं. मात्र अन्याय, अत्याचारा विरूद्ध लढण्याची वृत्ती तिला गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे सासरी भाऊबंदांच्या दडपणाखाली येऊन नवऱ्यानं विरोध केला.
2006 मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीनं गोदावरीला महापूर आला. गावागावांत पाणी शिरलं. सरकारनं सोय केली आणि गाव स्थलांतरीत झाला. तिथंही सत्यभामा मदतीला पुढं झाली. आता भावकीतील लोकांनी साथ दिली. या कामामुळे तिचा आत्मविश्वास दुणावला. इथूनच तिनं ॲड. एकनाथ आवाड यांच्या मानवी हक्क अभियानाचं पूर्णवेळ काम सुरू केलं. स्त्री-पुरूष समानता प्रकल्पावर काम केलं. स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीविरोधात लढा सुरू केला. पती-पत्नींमधील वादाची कारणं ती शोधू लागली. सत्यभामा सांगते, ‘‘घरगुती हिंसाचारात दारू मुख्य कारण असल्याचं जाणवलं. म्हणून दारूबंदीचा लढा सूरू केला. 2016 मध्ये माजलगावला दारूबंदीसाठी समुपदेशन केंद्र सुरू केलं. पोलिस विभागाच्या महिला दक्षता समितीचं सदस्यत्व मिळालं. त्यामुळे अधिक अभ्यास करता आला.’’
लऊळ गावातील महिला दारूबंदीसाठी पुढे झाल्या. सत्यभामा सांगतात, ‘‘गावभर पाटीलकी करत फिरणारे ‘नवरोबा’ काबाडकष्ट करणाऱ्या बायकोला कशी मारझोड करतात’’ हे इथं प्रत्यक्ष पाहिलं. हा अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी त्या महिलांचीच मोट बांधली. दारू जमिनीत गाडलेली, ती काढण्यासाठी हातपंप बसवलेले. संसाराची राखरांगोळी होत असलेल्या महिलांनीच साथ दिली. त्यामुळे पोलिसांना सोबत घेऊन आठ ते दहा वेळा लऊळला हातभट्टी, दारूचे हातपंप उद्ध्वस्त केले. त्यापाठोपाठ किट्टीआडगाव, वारोळा, पुरचुंडी, कवडगाव घोडा, कवडगाव हुडा या ठिकाणी दारूबंदी करण्यात यश मिळवलं. दारूवर महिलांनी वचक निर्माण केला. दारूबंदी समित्या नव्हत्या. यासाठी देशी, हातभट्टी दारूचे बॅरल घेऊन महिलांसह उपोषण केलं. परंतू, परिणाम झाला नाही. पोलिस ठाण्यासमोर दारूविक्रीची दुकानं थाटली. तत्कालिन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेतली. त्यांनी तालुकास्तरावर अवैध देशी, हातभट्टी दारूबंदी समित्या नियुक्त केल्या. कौटुंबिक छळाच्या सुमारे 70 ते 80 केसेस समुपदेशनाने मिटवल्या. सत्यभामाचं काम पाहून आता पती नारायण यांची मदत मिळू लागली आहे. आज निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेचं कार्यालय माजलगावच्या केसापुरी वसाहतीत सुरू केल्याचं सत्यभामा सौंदरमल सांगतात. 
- मुकुंद कुलकर्णी. 

No comments:

Post a Comment