Sunday 18 June 2017

तनया

॥छोट्यांची गॅलरी॥
२२ एप्रिल २००३ - ‘ही जास्तीत जास्त आठ-दहा दिवस जगेल’, तनयाचा जन्म झाल्यावर डॉक्टर म्हणाले होते. तनया जन्मतःच अपंग होती. तिचा जबडा, मान, खांदे, कोपर, मनगट, गुडघे, कंबर, बोटे, शरीरातील ८० टक्के सांधे जखडलेले होते. पाठीचा कणा वाकलेला होता. मग दररोज सकाळी तिनं डोळे उघडले की तो दिवस तिचा शेवटचा दिवस समजून हेमांगी आणि जयंत जोपळे तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. दर महिन्याला तिचा वाढदिवस साजरा करू लागले. एक वर्ष उलटलं. आता तनयाला बोललेलं समजू लागलं, पण तोंडाची हालचाल करता येत नसे. मात्र हळूहळू तिला बोलणंदेखील जमू लागलं.
अडीच वर्षांची असताना ती कम्प्युटर चालवू लागली. कम्प्युटर, इंटरनेटवर ऑनलाइन व्हिडिओ, कार्टून पाहणे, गेम खेळणे या तिच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी. 'फार्मविले'सारखे ऑनलाइन गेम खेळता यावेत म्हणून हट्ट करून तिनं स्वत:चं प्रोफाइलही काढून मागितलं.
चार वर्षांची झाल्यावर तिला प्रीस्कूलमध्ये घातलं. तिथे कमी बोलत असे, पण वर्गात बोललेलं तिच्या पूर्ण लक्षात राहात असे. तिची स्मरणशक्ती दांडगी होती. शाळेतल्या सर्व मुलांची नावं-आडनावं तिला पाठ होती. सात वर्षं पूर्ण झाल्यावर तिला प्राथमिक शाळेत घालण्याचं ठरवलं. अपंग असल्यामुळे जवळपासच्या शाळा प्रवेश देण्यास टाळाटाळ करत होत्या. अखेरीस कोठारी कन्या शाळा, जेलरोड नाशिकरोड येथे तिला पहिल्या इयत्तेत प्रवेश मिळाला. तिची अभ्यासातली प्रगती पाहून पंधराच दिवसांत त्यांनी तिला दुसर्‍या इयत्तेत बसवलं. जास्त वेळ बसल्यानं तिची पाठ-कंबर दुखत असल्यानं तिला मधल्या सुट्टीत दहा वाजता घरी आणावं लागत असे. तरीही तिनं पहिला नंबर कधी सोडला नाही.
दोन्ही हातांची बोटे वाकडी असल्याने तिला जास्त लिहिता येत नसे, पण ती चित्रं मात्र सुंदर काढत असे. 'दैनिक सकाळ' बालचित्रकला स्पर्धेत तिनं सर्वसामान्य गटात उत्तेजनार्थ परितोषिकही पटकावलं होतं.

बरोबरीची चुलत-मावस भावंडं, शाळेतली मुलं बाहेर मैदानात खेळत असताना ती स्वतःला रंग, रेषा, कागद, कातरी, हस्तकला वगैरेंच्या दुनियेत गुंतवून घेत असे. अनेकदा ती तिच्या चित्रांत एकच मुलगा किंवा मुलगी काढत असे. 'आणखी मुलं- मुली का काढत नाहीस?' असं विचारल्यावर म्हणायची, 'सगळे माझ्यासोबत थोडाच वेळ खेळतात, मग घराबाहेर खेळायला निघून जातात अन् मी एकटीच असते. मग मी एकटीचंच चित्र काढते.'
बदलत्या हवामानात तिची आधीच नाजूक असलेली प्रकृती आणखीच बिघडत असे. इयत्ता चौथीत असताना साधं सर्दी-पडश्याचं निमित्त झालं. केवळ दोन दिवसांच्या आजारपणात, हसत-खेळत असतानाच, अचानक प्रकृती खालावून तनयानं १० सप्टेंबर २०१२ रोजी जगाचा निरोप घेतला.
आज तनया नाही, पण तिनं काढलेली, तिच्या आईबाबांनी जतन करून ठेवलेली, चित्रं मात्र आहेत.
तनया(भूमी) जयंत जोपळे

No comments:

Post a Comment