Monday 26 June 2017

माझं कामच मला सन्मान देतं !

“एकदा एका बचतगटाचं खातं एका बँकेच्या मॅनेजरने उघडण्यास नकार दिला. त्या महिलांनी मला तसं कळवताच मी मॅनेजरना फोन केला, “तुम्ही बचतगटाची खाती उघडत नाही, असं लिहून द्या.. मग मी पाहते पुढे काय करायचं ते...” असं म्हणताच, ते लागलीच दबकून बोलू लागले. खातं उघडण्यास तयार झाले. शुभांगी हिवाळे अशी कृतीतूनच महिलांना आपल्या हक्कांची जाणीव करून देत असते.
स्त्रीसक्षमीकरणाचा एक प्रयोग मुंबईच्या कांदिवली पूर्व मतदारसंघातल्या (कांदिवली,पोयसर, मालाड) वस्त्यांत बचतगटांची मेढ उभारुन शुभांगीने चालवला आहे. ‘निर्मला निकेतन’मधून समाजसेवेचा पॅरा प्रोफेशनल कोर्स करून तिने २००८ पासून अतुल भातखळकर, जे आता आमदार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सुरवात केली. कामात सातत्य ठेवून तिने स्त्रियांचे 94 बचतगट तयार केले. त्यातून 1,200 महिलांपर्यंत पोचणं शक्य झालं. कौशल्य विकास वर्गांतून वेगवेगळ्या कोर्सेसचा लाभ 3,000 महिला घेत आहेत. अशा चार हजारांहून अधिक महिलांचे उपक्रम शुभांगी हाताळते. हे ती कसं सांभाळते? ती सांगते की प्रत्येक गटाच्या अध्यक्ष महिलांची ती महिन्यातून एकदा मिटिंग घेते. त्या आपापल्या कामाचं रिपोर्टिंग करतात. अडचणी सांगतात. शुभांगी त्यांना सूचना देते. आणि अधनंमधनं थेट गटांना भेटीही देते. यामुळे गट कार्यरत ठेवणं सोपं जातं. शुभांगीच्या कामाची काटेकोर आखणी पाहता ती उत्तम व्यवस्थापक असल्याचं जाणवतं.
शुभांगी सात बहिणींमधली पाचवी मुलगी. ती सांगते, “गरीब, गरजू महिलांसोबत काम करताना बरंच शिकले. त्यांच्या अडचणी काय असतात, हे स्वतःच्या लग्नानंतर आणखी चांगलं समजू लागलं. लग्नानंतर कमी पगारावर काम करण्याची काही गरज नाही, या सासरच्या लोकांच्या तगाद्याला छेद देऊन मी काम चालूच ठेवलं. पुढे माझ्या मुलीच्या जन्मानंतर काम सोडण्यासाठी घरातून पुन्हा टोचणी सुरु झाली. कामाचा व्याप वाढला असताना मी काम सोडणं मला किंवा आमच्या 'स्पंदन सामाजिक प्रतिष्ठान’ संस्थेला परवडणारं नव्हतं. शेवटी सासरचं घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. नवर्‍याने साथ दिल्याने कामाच्या ठिकाणाजवळ भाड्याने घर घेऊन आता आम्ही आमच्या मुलीसह राहातो. असा स्वतंत्र निर्णय घेणारी धाडसी शुभांगी केवळ सत्तावीस वर्षाची आहे. तिच्याच म्हणण्यानुसार, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतंच. 
“सुरवातीला पुरुष कार्यकर्त्यांमध्ये काम करताना संकोच वाटत असे. आधी फारसं महत्व न देणारेही पुढे माझ्या कामाचा आदर करू लागले. सपोर्ट करू लागले. त्यामुळे इतर लोकांकडूनही मला आदर मिळू लागला. मी आणखी जोमाने काम करू लागले.” 
अतुल भातखळकर हे भाजपचे आमदार आहेत. शुभांगी सांगते की तिने पक्षाकडे पाहून नाही, तर सामाजिक काम म्हणून सुरूवात केली. त्यामुळे ती इतर पक्षांच्या महिलांची कामंदेखील सहज करून देते. आणि तसा व्यापक विचार तिच्या सरांमुळे म्हणजेच आमदार अतुल भातखळकर यांच्याच शिकवणुकीमुळे करत असल्याचं ती सांगते. त्यांनी विश्वास टाकला आणि निर्णयस्वातंत्र्यही दिल्यानेच काम उभं करू शकल्याचं तिचं म्हणणं आहे.
 लहान वयात मोठी समज आणि मोठं काम करणारी शुभांगी हिवाळे. तिच्या शब्दाशब्दातून तिची कामावरची श्रद्धा दिसून येते. शुभांगी म्हणते, “माझं कामच मला सन्मान देतं.”
- लता परब

No comments:

Post a Comment