Sunday 18 June 2017

संघर्षातून उभी राहिलेली तिरवंजे शाळा


या कथेच्या नायिका आहेत, शाळेच्या मुख्याध्यापिका अलका ठाकरे मॅडम. 2012 साली मॅडमची एका शाळेत नियुक्ती झाली. मॅडम शाळा शोधत गावात पोहोचल्या. चंद्रपुरात भद्रावती तालुक्यातलं, पायथ्याशी कोळशाच्या खाणी असणारं हे गाव - तिरवंजे.
मॅडमने इथे येऊन पाहिलं. मुलं दोन कोंदट खोल्यात आणि मंदिराच्या किचन शेडमध्ये कशीबशी शिकत होती. त्यांना कळलं, की शाळेला चार खोल्यांच्या बांधकामासाठी 'सर्व शिक्षा योजने'तून 11 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हेही कळलं की तिरवंजे गावाजवळच 'वेस्टर्न कोलफिल्ड'च्या मालकीच्या कोळसा खाणी आहेत. याच डब्ल्यूसीएल कंपनीने गावातील बहुतांश मोकळ्या जागा विकत घेतल्या आहेत.
एकीकडे कंपनीने पार्किंगसाठी विकत घेतलेली जागा वापराविना पडून आणि दुसरीकडे मुलं कोंदट जागेत बसून. मग याच पडीक जागेत शाळा उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. एका शिक्षकाने बांधकामात पुढाकार घेतला. इमारत अर्धवट असतानाच कोणीतरी डब्ल्यूसीएलकडे कागाळी केली आणि कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल करुन बांधकाम थांबवलं. विनापरवाना बांधकाम केल्याने त्या शिक्षकाने वरिष्ठांची बोलणी खाल्ली. पैसा आणि जागा असूनही विद्यार्थी मात्र कोंदट जागेतच राहिले!
या गावातील मुलांचं भविष्य उजळायचं, तर शिक्षणाला पर्याय नाही, हे ठाकरे मॅडम जाणून होत्या. शिक्षणाचं हेच महत्त्व त्यांनी गावातल्या महिलांनाही समजावलं. अशा कोंदट जागेत बसून मुलांचा अभ्यास होणार तरी कसा? आपल्याला सरकारकडून शाळेच्या इमारतीसाठी अनुदान मिळालं आहे, आपण बांधकाम पूर्णत्वाला नेऊया. त्यासाठी आपल्याला सरकारशी आणि कंपनीशी वाटाघाटी कराव्या लागतील. मॅडमच्या आवाहनाने गावात चांगलीच वातावरणनिर्मिती झाली.
मॅडम आणि गावकरी कायदेशीर मार्गाने ती जागा शाळेला कशी मिळविता येईल, हा प्रयत्न करु लागले, पण दाद मिळेना. आपल्याच गावाची जागा आणि कामगार वापरणारी ही कंपनी, गावात साधी शाळा उभारु देत नाही, म्हणजे काय? - अशी लोकभावना तयार झाली आणि महिलांनी कंपनीच्या गाड्यांचा 'रास्ता रोको' केला. प्रशासन नमलं, तीन महिन्यांची मुदत त्यांनी मागितली. या कालावधीत शाळेला नवं बांधकाम करता येणार नव्हतं. पण त्यानंतर कंपनीकडून संवाद न झाल्यास ती जागा शाळेचीच होणार, असा ठराव झाला.
तीन महिने उलटले. डब्ल्यूसीएलकडून कसलीच हालचाल न झाल्याने जागा शाळेला मिळाली. एका बलाढ्य कंपनीविरोधातील लढाई शाळेनं जिंकली. आता उर्वरित बांधकाम पूर्ण करायचं होतं. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेला निधी नव्या बांधकामाला पुरणार नव्हता. म्हणून मॅडमनी स्वत:च निधी उभारायचं ठरवलं, सर्वात आधी 10 हजार रुपयांची देणगी स्वतः देत! ते पाहून शाळेचा इतर स्टाफ, ग्रामस्थ महिलांनीही 200-300 रुपये देऊ केले.
पैसे जमा झाले. पण आंदोलन करणार्याॅ, त्यामुळे एफआयआर दाखल झालेल्या शाळेचं हे 'भानगडीचं काम' करायला कोणीच ठेकेदार तयार होईना. कसाबसा एकजण 10 लाखांत काम करायला तयार झाला, पण गावातले राजकारणी त्यालाही 'तुझे पैसे बुडणार' म्हणून रोज फितवायचे. त्यातून त्याने ठाकरे मॅडमच्या वडिलांचं निधन झाल्याच्या तिसऱ्या दिवशी पैशांची मागणी केली. अशा अडीअडचणींतून शेवटी 2014 मधे शाळा उभी राहिली.
या प्रवासाबद्दल डोळ्यातलं पाणी पुसत ठाकरे मॅडम सांगतात, "शाळेचं बांधकाम होईपर्यंत मला दोन वर्षे शांत झोपही लागली नाही. या काळात गावातल्या महिलांनी मला देलेली साथ अनमोल होती. या महिला कमी शिकलेल्या असल्या, तरी शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे. एका कार्यक्रमाला बोलावलं नाही, म्हणून नाराज होऊन तत्कालीन सरपंचांनी माझ्या बदलीचा ठरावही करुन घेतला होता, पण गावातल्या महिलांनी ते घडू दिलं नाही.”
आज, या जि प शाळेची बैठी इमारत मुलांनी बनविलेल्या फुला-फळांच्या, औषधी वनस्पतीच्या बागा तसंच मोठं मैदान मिरवत दिमाखात उभी आहे. शाळेच्या भिंती मराठी-इंग्रजीच्या शब्दखेळांनी आणि गणिती कोड्यांनी सजलेल्या आहेत. आणि शाळेचा ‘आदर्श शाळा’ म्हणून गौरव झाला आहे. 
 स्नेहल बनसोडे- शेलुडकर, संपादक, www.samata.shiksha

No comments:

Post a Comment