Sunday 4 June 2017

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी: तर, हे असं आहे!

कधी कधी सतत काही घडत असतं आसपास, आपल्यात. कधीकधी अगदीच हालचाल नसते. हालचाल नसते, अशाच काळात घडलेल्या गोष्टी नीट बघायची सवड सापडते. कधी अनुभवलेलं काही सहजपणानं घडाघडा बोलताना काहीतरी सापडून जातं. ऐकणार्याअलाही सापडतं. म्हणून वाटलं की थोड्या गप्पा माराव्यात इथं. 
मी काही वेगळी, विशेष माणूस नव्हे. तीव्र बुद्धीमान, सौंदर्याची पुतळी, सद्गुणांचा महामेरू वगैरेंनी लक्षात ठेवण्याजोगीही नव्हे. शिवाय खूप लहान वयात ‘चालणं’ गमावल्यामुळं माझ्यात बराच न्यूनगंडही होता की आपण फार फिरू शकलो नाही, गप्पांचे कट्टे रंगवू शकलो नाही, वेड लागेपर्यंत वाचावं इतकी पुस्तकं उपलब्ध झाली नाहीत आणि बरंच काही ‘नाही नाही.’ त्यामुळं आपण कुणाला सांगू तरी काय शकणार?
असं रिक्कामं वाटत असताना घराबाहेर पडले नि स्वत:त असणारं, शाबासकी देण्याजोगं काही सापडू लागलं. स्वत:ची संवेदनशीलता उलगडत गेली. प्रसंगी आपण आग विझवू शकतो नि पेटवू शकतो हेही कळलं. कळलं की आपल्या शरीराच्या विशिष्ट स्थितीमुळं शरीराची एक वेगळी ओळख आपल्याला होत गेलीय. व्हीलचेअरशी मैत्र करताना तिच्या कोनातून काही सहजसाध्या गोष्टी कळल्यात, ज्या कुणाच्या लक्षात सहसा येत नाहीत. त्या लक्षात येत नाहीत कारण त्यांच्या जाणीवा विशिष्ट अनुभवांनी विकसित झालेल्या नसतात, ज्या माझ्यासारख्यांच्या झालेल्या असू शकतात.
या प्रवासात मला शारीरिक अपंगत्वाकडे अत्यंत पूर्वग्रहित (सकारात्मक व नकारात्मक) दृष्टीनं पाहणारे लोक भेटले. प्रसंगी त्यांना उत्तरं दिली, चर्चा केल्या, लेख लिहिले, भाषणांमधून, छोट्या गॅदरिंग्जमधून बोलत राहिले. अशा मोकळ्या बोलण्यानं बराच फरक पडतो, हे लक्षात आलं. लक्षात आलं, की अपंगत्त्वाबद्दलचे स्टिओरिओटाईप्स मोडून काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी ड्रेनेज मोकळं व्हायला हवंय. लक्षात आलं, की या बद्दल मी चांगला संवाद करू शकते, माझ्या अशा अनेक मित्रमैत्रिणींचं हृदगत पोहोचवू शकते.
सगळी माणसंच, पण शारीरिक किंवा मानसिक व्यंग समजून निराळ्या युक्त्या शोधत जगणारी किंवा युक्त्या असू शकतात यासाठीचा धीरही गमावलेली. माझ्या लाडक्या व्हीलचेअरवरून फिरताना माझ्या आतलं ‘मॅटर’ बदललं, जाणीवा विस्तारल्या, समृद्ध झाल्या. अनेकदा खूप निराश झाले, भडकले, आक्रस्ताळी वागले, स्वत:ला तोडून घेतलं माणसांपासून, धो धो रडले. सगळ्या प्रोसेसमधून बरंच काही उलगडत गेलं. चांगलं. वाईट. डोळ्यांसमोर काही ध्येय नसताना दहा वर्षांपूर्वी थोडंथोडं लिहायला लागले नि आपल्या अनुभवांकडे नीट बघता यायला हवं, हे कळत गेलं. यातून हातात जे थोडकं, साधंसं सापडलंय ते इथं सांगायचंय.
चार वर्षांपूर्वी सतत डोकं दुखत राहायचं. ठणाठणा नाही, पण पल्स जाणवायची. माझ्या डॉक्टरना, अजित कुलकर्णींना मी सारखी सांगत, विचारत राहायचे, ‘‘सर, माझ्या मेंदूत कसलीतरी गाठ झाली असेल का हो? त्यामुळं २४ तास डोकेदुखी असते का?’’ - शेवटी डॉक्टरनी त्यांच्यासमोर माझं सिटीस्कॅन करवून घेतलं. काही दोष आढळला नाही. तरीही डोकं दुखत राहिलं. एक दिवस पुन्हा गेले त्यांच्याकडे. ते गाणारे, वाचणारे, खूप विषयात रस असणारे. वेगवेगळे विषय बोलत राहिलो आम्ही. पाऊणएक तासानं त्यांनी विचारलं, ‘‘आता कसंय डोकं?’’ - खरंच सांगते, एकदम गायब झाली होती ती फिलींग. अज्जिबातच जाणवत नव्हती ती डोळ्यांखालची नि कानावरची विशिष्ट पल्स. मी चकित! डॉक्टर म्हणाले, बरंवाईट बोलत चला. नेहमी एकसारखंच काम करू नका. प्रवास करा. सिनेमे बघा. सिनेमे बघतानाही ती विशिष्ट पठडीतली गंभीर निवड नको... आवडी उलट्यापालट्या करा नि कामं, रुटिन बाजूला ठेवून आवडत्या मित्रमंडळींशी गुजगोष्टी करा.
आत्ता डोकं दुखत नाहीये; पण गुजगोष्टी करायला ते कारण नकोय!
- सोनाली नवांगुळ

No comments:

Post a Comment