Wednesday 21 June 2017

किशोरींसाठी अक्षय्य 'उर्जा'

सुजाण शिक्षक, जाणत्या शाळा :
वय वर्षे 11 ते 19 – तारुण्याची सुरुवात. सळसळता उत्साह, कष्ट करण्याची तयारी हे सगळं याच वयात असतं. पण मुलींसाठी हेच वय ‘सोळावं वरीस धोक्याचं’ म्हणत बंधनं घालणारं आणि ‘सातच्या आत घरात’ यायला लावणारंही असतं. अनेक ठिकाणी “आता लहान आहेस का गं तू? काय पोरांसारखी फिदीफिदी हसते ? अंगभर कपडे घाल, आता मैदानात खेळायला जाऊ नको” असं बोलणंही मुलींच्याच वाट्याला येतं.
समाजातला मोठ्ठा हिस्सा आजही मुलींना त्यांच्या खेळण्या- बागडण्याच्या आणि आत्मनिर्भरतेच्या हक्कापासून वंचित ठेवतोय, हे वारंवार दिसून येतं. उस्मानाबादच्या तत्कालीन सीईओ सुमन रावत यांनीही हे हेरलं, आणि या उमलत्या कळ्यांसाठी ‘ऊर्जा’ उपक्रम सुरू केला. 2012 साली प्रारंभ झाला. 11 ते 19 वयोगटातल्या मुलींसाठी हा उपक्रम आहे. यातूनच ‘किशोरी उत्कर्ष मंच’ या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली.


या मंचातंर्गत वयात येणाऱ्या मुलींना डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिलं जातं. मासिक पाळीची शास्त्रीय माहिती, स्वच्छतेची आवश्यकता आणि लैंगिक शिक्षण दिलं जातं. व्यायाम आणि पोषक आहाराचं महत्त्व पटवून दिलं जातं. मुलींच्या घटत्या जन्मदराविषयीचं प्रबोधन करुन मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृतीचे प्रयत्न केले जातात. स्त्रियांना कायद्याने दिलेले हक्क, माणूस म्हणून त्यांचे असणारे हक्क, आरोग्यविषयक हक्क अश्या बाबींवर वेळोवेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं. प्रबोधनासाठी रुढी परंपरा आणि विविध विषयांवर गटचर्चा आयोजित केल्या जातात. निबंध, वक्तृत्त्व आणि वादविवाद स्पर्धाही घेतल्या जातात. माहितीपट, पथनाट्य, गाणी यांच्याद्वारे हा 'किशोरी उत्कर्ष मंच' सामाजिक जागृतीचे कामही करतो आहे.

शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक. त्यासाठी व्यायाम महत्त्वाचा. हे जाणून त्यांना ज्युडो- कराटेचं मोफत प्रशिक्षण देण्यात येतं. स्वसंरक्षणासाठी मुलींचा आत्मविश्वास वाढवला जातो. हिमोग्लोबिनची वेळोवेळी चाचणी केली जाते. शिवाय किशोरींसाठी एक हेल्पलाईनही सुरु केली आहे, ज्याद्वारे छेडछाड, लैंगिक छळ अथवा कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार मुली करु शकतात. 180023322688 हा हेल्पलाईन नंबर प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावं, असा आग्रह हा ‘ऊर्जा’ उपक्रम धरतो.
याशिवाय मुलींच्या कलागुणांना वाव मिळेल, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मुलींना आवर्जून आडनावाऐवजी प्रथम नावानं हाक मारली जाते. आपल्या आयुष्याचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला आहे, याचं भान प्रत्येक मुलीला दिलं जातं. मुलींचा सामूहिक वाढदिवस साजरा होतो, त्यांना वेगवेगळ्या शासकीय संस्थांमध्ये आणि कारखान्यात नेऊन कामकाजाचे प्रत्यक्ष धडे दिले जातात. प्रत्येक शाळेत या ‘ऊर्जा ’ उपक्रमाची समन्वयक म्हणून एका शिक्षिकेची नेमणूक करण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे 180 शाळांमधील विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी आहेत. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम अतिशय उत्तमरीत्या चालू आहे. उस्मानाबादच्या सीईओ सुमन रावत यांची ठाण्याला बदली झाली तरी नंतर आलेले प्रशासकीय अधिकारी आणि उत्साही मुलींनी हा ‘ऊर्जा’ उपक्रम सुरु ठेवलेला आहे. 
संकलन सहाय्य- रमेश कांबळे, विषयसाधनव्यक्ती आणि शहनाझबानो औसेकर, उस्मानाबाद 
लेखन- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, 

No comments:

Post a Comment