Sunday 18 June 2017

आजची पिढी आशादायक वाटते

दुस-याचं मूल पाच मिनिटं घेऊन, कौतुक करून लग्गेच आईवडिलांकडे देता येतं. पण स्वतःच्या मुलाची जबाबदारी घ्यायची वेळ आल्यावर मनावर ताण आला होता. समीरनंतर पाच वर्षांनी परितोषचा जन्म झाला आणि मला माझ्या घरात स्वर्ग अवतरल्यासारखं वाटू लागलं. एका मुलाचं कसं जमेल अशी भीती वाटणारी मी चक्क दोन मुलांची आई बनले होते. ह्या दोघांना वाढवताना, नव्हे त्यांच्यासोबत वाढतानाच्या, पालकत्वाच्या प्रवासात मीही समृद्ध झाले.
‘अभ्यास करा’ म्हणून मुलांच्या मागे लागले नाही, तेही जाणीवपूर्वकच. कारण त्यांनी ‘रॅट रेस’मध्ये सामील व्हावं असं मला वाटत नव्हतं. पाचवी-सहावीत पहिल्या पाचात नंबर आला नाही तर काय मोठंसं आकाश कोसळतं? मी त्यांना यथेच्छ बागडू दिलं, खेळू दिलं. दुपारच्या वेळेस घरात क्रिकेटचा डाव मांडून त्यांनी भिंतीवर छान खड्डा करून ठेवला, मी हौसेनं आणलेल्या काचेच्या फुलदाणीचे पाच मिनिटांतच बॉल मारून तुकडे केले. मी सदैव त्यांच्या जागी लहानपणच्या ‘मला’ पाहिलं. 







माझी स्टेट बॅंकेत नोकरी असली तरी पतींनी नुकताच सुरू केलेला बिझिनेस होता. कधीकधी तर पैशांची बोंब असायची. तरीही बिनपैशांच्या किंवा कमी पैशांत होतील अशा पुष्कळ गोष्टी मुलांसाठी केल्या. पोहणं, सायकलिंग, क्रिकेट, त्यांना घेऊन जमेल तिथं फिरायला जाणं, लहान मुलांची नाटकं दाखवणं. आम्ही आईबाप म्हणजे दोन मोठी भावंडं आणि आमची दोन मुलं म्हणजे धाकटी भावंडं असंच आमच्या घरातलं वातावरण होतं.

२००७ साली माझ्या पतींचं कर्करोगामुळे निधन झालं. या मोठ्या दुःखाच्या प्रसंगातून आम्ही तिघं एकमेकांच्या साथीनं सावरलो. 
 आज समीर आणि परितोष दोघंही सीए आहेत. समीर सीएचा अभ्यास करतानाच जर्मन भाषा शिकला. जर्मन भाषा त्याची पॅशन असल्यामुळे त्यानं मोठ्या पगाराची नोकरी सोडून ठाणे येथे जर्मन आणि फ्रेंच शिकवणा-या संस्थेत भागीदारी स्वीकारली. हा निर्णय घेताना माझा त्याला पूर्ण पाठींबा होता. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ द्यावेत. त्यामुळे मुलं अधिक जबाबदार बनतात. मुख्य म्हणजे अमुक करायला मिळालं नाही म्हणून पालकांना दोष देत नाहीत.
मला आजची पिढी आशादायक वाटते. कालचं उगाळत बसू नये, उगाचच १९८२ साली असं होतं आणि तसं होतं असं म्हणत बसू नये. मुलं नवी नवी गाणी इंटरनेटवरून शोधून लावतात. मला ती खूप आवडतात. खरोखरच, तरूणांच्या संगतीत राहायला मिळणं ह्यापरतं स्वतःही मनानं तरूण राहाण्यासाठी दुसरं काय हवं असतं?
प्रवास पालकत्वाचा - सविता दामले, अनुवादक

No comments:

Post a Comment