Sunday 18 June 2017

पक्ष्यांची शाळा

आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ही खास पोस्ट.
उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांचं स्थलांतर घडतं ते पाण्याच्या शोधात. नाशिक इथं नदीकाठी येणाऱ्या पक्ष्यांना पाहून ‘नेचर क्लब’च्या आनंद बोरा यांना पक्ष्यांच्या शाळेची कल्पना सुचली. माणसाचा फारसा वावर नसलेल्या जागा आणि पाणवठा बघूनच त्यांनी जागा निवडल्या. ही शाळा बच्चे कंपनीच्या उन्हाळी सुट्टीत भरते आणि पहिल्या पावसाच्या हजेरीने संपते. 
‘पक्ष्यांच्या शाळेचं’ हे तिसरं वर्ष. पक्ष्यांना दाणा पाणी मिळावं, विद्यार्थ्यांना पक्ष्यांची ओळख व्हावी, पक्षी संवर्धनासाठी काय करता येईल याचा अभ्यास यातून केला जातो.


अंबड येथील कर्णबधीर मुलांच्या शाळेत पहिल्यांदा या शाळेची बेल वाजली. यावर्षी संत गाडगे महाराज धर्मशाळेत हे वर्ग भरले आहेत. संस्थेचे कार्यकर्ते तीन महिन्यापासून शाळेच्या उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत तीस जातीच्या शेकडो पक्ष्यांचा किलबिलाट मुलांनी ऐकला आहे. ‘टाकाऊ तून टिकाऊ’ हे शाळेचं वैशिष्टय. त्यामुळे प्लास्टिक बाटल्यातून पाणी आणि खाद्य ठेवण्यासाठी उपकरणे संस्थेने तयार केली. योगेश कापसे, संपदा पाटील यांनी बाटल्या उपलब्ध करून दिल्या. खराब टायरपासून तळी बनविण्यात आली. नारळाच्या करवंटीचा उपयोग खाद्य देण्यासाठी झाला. तेलाच्या कॅनपासून फूडर तयार झाले. तसेच लाकडाची दहा घरटी देखील लावण्यात आली. 


या परिसरात बगळे, नाईट हेरॉन, कावळे, वटवाघळे, पान कावळे आदींच्या कॉलनी आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास यावेळी करण्यात आला. याशिवाय या पक्ष्याच्या लकबीचा अभ्यासही केला गेला. बोरा पक्षिमित्र. त्यामुळे पक्ष्यांच्या लकबी, सवयी याचा त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. ते सांगत होते, “निरीक्षण करताना जाणवलं की पक्ष्यांनी प्लास्टिक, तारा वापरूनही घरटी बांधली आहेत. एकाच झाडावर पाच जातीचे पक्षी घरटी करतांना दिसून आले. तसंच देशी वृक्षावरच घरटी आढळून आली. जखमी पक्ष्यांवर उपचार करताना त्यांना नावं दिली होती”. प्रेम दिल्यावर प्रेम मिळतं याची अनुभूती आल्याचं बोरा म्हणाले. एरवी कावळा आणि बगळे यांची दुष्मनी बघतांना धमाल येत होती. पण, ‘छकुला बगळा’ आणि ‘काळू पान कावळा’ यांची चक्क मैत्री या शाळेत झाल्याचं त्यांनी सांगितलं.
पक्ष्यांचे काही किस्से तर बोरा सरांकडूनच ऐकण्यासारखे. ते सांगत होते, “तळ्याजवळ फरसाणमधील भावनगरी गाठी टाकल्यावर चिमण्याची गर्दी व्हायची. पण त्यातूनही ‘पिंकी’ नावाची एक साळुंकी चिमण्यांवर हुकुमत गाजवायची. ‘रामू’ खंड्या चक्क इतर पक्ष्यांनी आणलेल्या माश्यांवर ताव मारायचा. कावळ्यांच्या घरट्याजवळ कोकिळेची दादागिरी बघावयास मिळत होती. कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. स्वतः घरटी बांधत नाही त्यामुळे त्यांची पळापळ बघावयास मजा येत असे”.
सध्या शाळेत चिमण्या, बुलबुल, सनबर्ड, स्विफ्ट, हेरॉन, नाईट हेरॉन, साळुंक्या, दयाळ, शिंपी, धोबी, कावळे, भारद्वाज, कोकिळा, तांबट अशा अनेक पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. बऱ्याच पक्ष्यांना बाजरी, मका, ज्वारी तर काहींना अगदी फरसाणही आवडतो. सर्वांच्या मधल्या सुट्टीची वेळ वेगवेगळी. पण डबा खाण्याचा दंगा सारखाच असतो. शाळेत जाणाऱ्या मुलांसारखं इथंही एकमेकांच्या डब्यातील खाऊ पळविण्याची स्पर्धा सुरू राहते. 
शाळेच्या आवारात पक्ष्यांची सुंदर चित्रेदेखील साकारली आहे. पक्ष्यांची ही शाळा आज (पाच जून) जागतिक पर्यावरण दिनाला सर्वांसाठी खुली होणार आहे. यावेळी नागरिकांना टाकाऊतून टिकाऊ फुडर कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. शाळा चालविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा आनंद बोरा, भीमराव राजोळे, अप्पा कोरडे, सागर बनकर, आकाश जाधव, आशिष बनकर, धनंजय बागड, कुणाल देशमुख असे सगळे कार्यकर्ते एकत्र येतात.
- प्राची उन्मेष, नाशिक

No comments:

Post a Comment