Monday 21 January 2019

माळेगावची जत्रा...

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगांव. गावाची लोकसंख्या अडीच तीन हजार. नांदेड-लातूर महामार्गावरच्या या गावाचं अस्तित्व एरवी कुणालाही ओळखू येणार नाही. पण मार्गशीर्ष महिन्यात या गावात लाखो लोक येतात. वद्य एकादशीपासून सुरू होते, दक्षिण भारतातील सर्वांत मोठी माळेगावची जत्रा.
यावर्षी ३ ते ८ जानेवारी दरम्यान ही जत्रा भरली होती. देशभरातून व्यापारी या ठिकाणी आपली उत्पादने घेऊन येतात. घोडे, गायी-बैल, उंट, गाढव, म्हशी, कुत्रे, अशा विविध पाळीव प्राण्यांचा बाजार दरवर्षी येथे भरतो.
पूर्वी खेड्यातील लोकांच्या अनेक गरजा भागविण्याचं, संवाद, गाठीभेटी, संस्कृतिक देवाण-घेवाण करण्याचं महत्त्वाचं केंद्र म्हणून, अशा जत्रा भारतीय संस्कृतीत खूप उपयोगी असायच्या. आता काळ बदलला. माळेगांवच्या जत्रेचं महत्त्व मात्र आज शेतीसाठी उपयोगी वस्तूंच्या खरेदीविक्रीसाठी आहे. लहानात लहान औजारापासून, कपडे, गालीचे ते उंट, घोडे, गाढव, बैल-गाईंपर्यत सर्व गोष्टी इथं विक्रीसाठी उपलब्ध असतात.
   खाण्यापिण्याची विविध दुकानं हे या जत्रेचं खास वैशिष्ट्य. पेढे, बत्तासे, जिलेबी, तांदळाची खिचडी, भजे या सारख्या पदार्थांबरोबरचं मराठमोळ्या चवीचे झुणका भाकर, चिकन, मटणाचे विविध पदार्थ या जत्रेत खवय्यांना स्वस्त दरात उपलब्ध असतात. या सर्व व्यवहारात करोडो रूपयांची उलाढाल दरवर्षी माळेगावच्या जत्रेत होते. ११ व्या शतकात प्रतिष्ठापना झालेल्या खंडोबा देवस्थानाचा हा वार्षिक उत्सव. त्या निमित्ताने ही जत्रा गेल्या अनेक शतकांपासून भरत आहे. खंडोबाची पत्नी बाणाई खंडोबावर रूसून आजचे बनवस (बनवस याचा अर्थ वनवास असाही होतो.) या गाव आली, तिचा शोध घेत श्री खंडेराया माळेगाव येथे आले व गुप्त रूपात तेथेच राहिले. ११ व्या शतकात उदगीर येथील तांदळाचे व्यापारी माळेगाव येथून प्रवास करीत असताना त्यांना दृष्टांत झाला, तेव्हा त्यांच्या जवळील तांदुळाच्या पोत्यांमध्ये खंडोबाचा तांदळा असल्याचं आढळलं.
 मग याच व्यापार्‍याने खंडेरायाच्या तांदळ्याची प्रतिष्ठापना केली. आणि दरवर्षी उत्सव व जत्रेचं आयोजन केलं असा इतिहास येथील लोक सांगतात. आज महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात अशा अनेक राज्यातून या ठिकाणी भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. व्यापारीही येतात. १७ व्या शतकात मराठे आणि निजाम यांच्यात झालेल्या उदगीरच्या लढाईच्या वेळी या जत्रेतून मराठ्यांनी चार हजार घोडे खरेदी केल्याचा किस्सा आजही येथील लोक अभिमानाने सांगतात.
अठरा पगड जाती आणि बारा बलूतेदार या जुन्या भारतीय संस्कृतीचं प्रतिबिंब म्हणजे माळेगांवची जत्रा. या जत्रेत गोसावी, गारूडी, घिसडी, जोशी, कोल्हाटी, मसनजोगी, पांगुळ, वासुदेव, वैद्य अशा विविध भटक्या विमुक्त समाजाच्या जातपंचायती भरतात.

खंडोबाच्या साक्षीने त्यांचे न्यायनिवाडे, तंटे, विवाह आदी विविध सामाजिक विषयावर चर्चा होऊन अनेक निर्णय घेतले जातात.
देशातील विविध भागातून लोककलाकार या ठिकाणी येऊन आपली कला सादर करतात. त्यांना धन, रसिक श्रोत्यांची वाहवा लाभते. शेकडो एकरात ही जत्रा भरते. सर्वत्र पालं, राहूटया, रोशनाई याने सर्व परिसर भरून जातो.
नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने या जत्रेचं, आज आयोजन केलं जातं. नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या ठिकाणी भव्य असं कृषी प्रदर्शन यावर्षी भरवलं आहे. कृषी क्षेत्रातील विविध कंपन्या, मसाले, पिके, भाजीपाला उत्पादक यांनी या कृषी प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. खंडेरायाची शासकीय पूजा, पालखी, कृषि प्रदर्शन, पशु, अश्‍व, कुक्कुट व श्‍वान प्रदर्शन व कुस्ती स्पर्धा, लावणी महोत्सव व पशु प्रदर्शनातील विजेत्यांना बक्षीस वितरण, अश्‍व प्रदर्शन व चाल स्पर्धा, पारंपारिक कला महोत्सव अशा विविध गोष्टींनी ही जत्रा सजते.

- उन्मेष गौरकर, नांदेड




No comments:

Post a Comment