Friday 22 November 2019

मूर्तिकामातून आदितीला आणि तिच्या मैत्रिणींना मिळाला आत्मविश्वास

"मला की नाही गुलाबी रंग खूप आवडतो, त्यामुळे मी की नाही बाप्पाला गुलाबी रंगच देते." किशोरवयीन आदिती सांगत होती. आदिती विशेष मुलगी आहे. गाणं, नृत्य, चित्रकला यात तिला गती. पण सर्वसामान्यांपेक्षा बुद्ध्यांक कमी. तिच्या पालकांनी तिच्यासाठी नाशिकची घरकुल परिवार संस्था निवडली. विद्याताई फडके आणि त्यांच्या सुहृदांनी २००६ मध्ये स्थापन केलेली ही संस्था. संस्थेत आदितीसारख्या 52 विशेष मुली.या सगळ्या स्वयंरोजगाराकडे वाटचाल करत आहेत. त्यासाठी मार्गदर्शन 30 कला शिक्षकांचं. वारली चित्रकला, मेणबत्त्या तयार करणं , शिवणकाम, खाद्यापदार्थ तयार करणे, आकाशकंदील, पणत्या तयार करणे, असे बाजारपेठेच्या गरजेनुसार उपक्रम संस्था राबवते. 
मुलींमधली चिकाटी, संयम पाहता त्यांना मूर्तिकामाचं शिक्षण देण्याचा विचार विद्याताईंनी केला. त्यासाठी तीन वर्षांपूर्वी त्यांनी पुण्याच्या दीप्ती आणि पराग काळे यांना विचारलं. शाडूची मूर्ती कशी करायची ते काळे शिकवतात. ५२ पैकी १० मुलींना हे काम आवडलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर पहिल्या वर्षी मुलींनी ११ गणेशमूर्ती घडवल्या. गेल्या वर्षी ५१ तर यंदा १०१ गणेशमूर्ती. विशेष म्हणजे भोवतालची आरास करून मूर्ती दिल्या जातात. कमळातला गणपती, दगडुशेठ, पगडी गणेश अशी विविध रूपं मुलींच्या मदतीनं आकाराला आली आहेत.
'' पहिल्या वर्षी मुलींचा कल , मूर्ती तयार होण्यासाठी लागणारा वेळ, याचा विचार करत कामाला सुरुवात केली. '' विद्याताई सांगतात. ''दुसरीकडे कला शिक्षकांनीही पेणमध्ये जाऊन मूर्तीच्या तंत्राची माहिती घेतली. पहिल्या वर्षी माती भिजवणं, ती एकत्र करणं, साच्यामध्ये भरणं एवढंच काम मुलींनी केलं. काहींनी पुढील कामात थोडी फार मदत केली. दुसऱ्या वर्षी रंगकामापर्यंत मुलींनी प्रगती केली. यंदा तर मूर्तीचा शेला, चौरंग यासह मुकुट रंगवणं,ती सालंकृत करणं अशी विविध कामं मुलींनी केली. त्यासाठी मुलींनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे.''
कला शिक्षिका तारा पाटील, जयश्री कुशारे मूर्तीवर अंतिम हात फिरवतात. संस्थेच्या आवारात मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. एकाच वेळी मूर्ती विकली गेल्याचा आनंद मुलींच्या चेहऱ्यावर असतो तर दुसरीकडे आपण केलेली वस्तू आपल्या हातून जात असल्याची वेदनाही असते. मग तालवाद्यांच्या गजरात गणेशमूर्तींना निरोप दिला जातो.

- प्राची उन्मेष, नाशिक

No comments:

Post a Comment