Friday, 22 November 2019

पूरग्रस्तांना दुष्काळग्रस्तांचा हात

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातलं कडा. दुष्काळी भाग. यंदा ऑगस्ट उजाडला तरी पावसाची प्रतीक्षा कायमच. मात्र याच वेळी सांगली, कोल्हापूर , साताऱ्याच्या भागात पावसानं हाहाकार माजवलेला. तिथं तातडीनं मदत पोहोचवण्याची गरज होती. आपल्या अडचणी बाजूला ठेवून कडामधले नागरिकही पुढे सरसावले. 
ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी, डॉक्टर , शिक्षक एकत्र आले. गावात मदतफेरी काढायचं ठरलं. ४५ हजार रुपये जमले. त्यात व्यापारी सुमित भंडारी यांनी ११ हजार रुपयांची भर घातली. किशोर भंडारी यांनी मुलांसाठी नवे ड्रेस .तर राजुशेठ पोखरणा यांनी ५० ताटवाट्या , ग्लास दिले. डॉ प्रमोद जाधव आणि डॉ अनिल मुरडे यांनी दूध कॅन, घमेली. साईनाथ मेडिकल आणि पटवा मेडिकलकडून औषध. भगिनी निवेदिता कन्या विद्यालयाकडून ५,६०० रुपये.
जिल्ह्याच्या इतर भागातले नागरिक, संस्थाही सहभागी झाले. आष्टीच्या हंबर्डे महाविद्यालयानं ७५ हजार, नगरमधले हृदयरोगतज्ज्ञ डॉ संदीप गाडे यांनी १० हजार, डॉ युवराज तरटे, डॉ झिंजुरके आणि नगरचे मॅक्स केअर हॉस्पिटल यांच्याकडून रुग्णवाहिका, कुसलंब इथल्या युवकांकडून ६,४०० रुपयांहून अधिक किराणा माल.
मग १५ ऑगस्टला तरुणांनी महाराष्ट्र- कर्नाटक हद्दीवरची शिरढोण , कुरुंदवाड , हेरवाड ही गावं गाठली. सोबत तीन रुग्णवाहिका आणि जमलेलं इतर साहित्य. डॉ अनिल मुरडे आणि डॉ प्रमोद भळगट यांनी लोकांची आरोग्य तपासणी केली . नगरच्या मॅक्स केअर रुग्णालयाचे कर्मचारी रोहित पाटोळे , कृष्णा भांडकर , महेश मांडके , कार्तिक कचरे त्यांना मदत करत . तर अमोल गांधी आणि अमित पटवा औषधवाटप.
स्काऊट गाईडचे तालुका सचिव बा म पवार , संतोष दाणी , बाबासाहेब आंधळे यांनी परिसरात फिरून कुणाला काय मदत हवी याचं सर्वेक्षण केलं. हंबर्डे महाविद्यालयाचे प्रा ज्ञानेश्वर नवले , प्रा डॉ रवी सातभाई , प्रा डॉ बाबासाहेब मुटकुळे आणि पुष्कर पाषाण मग तयारी करत आणि पूरग्रस्तांना गरजेनुरूप साहित्य दिलं जाई. भगिनी निवेदिता कन्या विद्यालयाचे शिक्षक परमेश्वर देसाई यांनी पूरग्रस्त महिलासाठी सहावारी , नऊवारी अशा १०० नवीन साड्या आणल्या होत्या . याशिवाय काही धोतरजोड आणले होते . त्याचं वाटप झालं.
आष्टी , कडा इथं जमा झालेला निधी आणि साहित्य यात स्वतःचे योगदान देऊन ठरवून दिलेल्या गावातील प्रत्येक घरापर्यंत ही मदत पोहोचली . १७ ऑगस्टपर्यंत टीमनं या भागात काम केलं. स्थानिकांना त्यातून दिलासा मिळाला.
- राजेश राऊत, बीड 

No comments:

Post a Comment