Saturday 7 September 2019

विमानाचा शोध (आखुडबुद्धी बहुशिंगी)

एकोणीसशे पाच साली साली राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. त्यानंतर ठीक अकरा वर्षांनी म्हणजे १९१६ साली माझ्या चुलत आजोबांनी, म्हणजे व्यंकटराव ब्रह्मेंनी त्याहीपेक्षा महत्त्वाचा शोध लावला. हा होता न उडणाऱ्या विमानाचा शोध!
चौदा वर्षांच्या अखंड अपयशानं किंचितही नाऊमेद न होता चुलत आजोबांनी हवेपेक्षा हलक्या पण न उडणाऱ्या विमानाची निर्मिती केली. या विमानाचे नाव त्यांनी आपले पूर्वज सुंदरोजी ब्रह्मे यांच्यावरून ठेवले होते. हे विमान कोळशावर चालत नसे. ऑगस्ट महिन्यातल्या एका संध्याकाळी त्यांनी पुण्याच्या बंडगार्डन बंधाऱ्यावर न उडवून दाखवले. हे विमान तब्बल ऐंशी मीटर दूर उडालं नाही. दुर्दैवानं, नदीला आलेल्या अचानक पुरात ते विमान वाहून गेलं आणि मानवजातीचा एक अमूल्य ठेवा नष्ट झाला. त्यावेळी भारतावर ब्रिटिश अंमल असल्यानं या क्रांतीकारी शोधाचं म्हणावं तसं कौतुक झालं नाही. हेच जर त्यांनी इंग्लंडमध्ये केलं असतं तर कदाचित ते इतके प्रसिद्ध झाले असते की खुद्द इंग्लंडच्या राणीनं (ती जिवंत असती तर) त्यांच्यासारख्या मिश्या वाढवल्या असत्या. पारतंत्र्यात पिचलेल्या भारतीयांना त्यांची अजिबात कदर नव्हती. नाही म्हणायला पुण्याच्या गव्हर्नरनं दोन हत्यारबंद गुप्त पोलीस चुलत आजोबांच्या पाळतीवर ठेवले होते. कदाचित, चुलत आजोबा विमानाऐवजी ब्रिटिश सरकारला उडवतील अशी भीती त्यांना वाटली असावी.
लवकरच पहिलं महायुद्ध संपलं आणि पुढची वीसेक वर्षंतरी दुसरं महायुद्ध सुरू करायची कुणा राष्ट्राची इच्छा नव्हती. त्यामुळं या न उडणाऱ्या विमानांचा युद्धात उपयोग होण्याची सुतराम शक्यता नव्हती. अगदी शत्रूप्रदेशावर टेहळणी न करण्यासाठीही याचा उपयोग होत नव्हता. बाकी, शत्रूप्रदेशात बाँब न टाकणे, शत्रूच्या न उडणाऱ्या विमानांना न पाडणे, विमानातल्या मशीनगनने शत्रूसैनिकांना न मारणे वगैरे कामगिरी तर दूरचीच बात.
तरीही, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरून चुलत आजोबांनी आपल्या शोधाचा प्रसार जोरात चालू ठेवला. पॅरीसहून न्यूयॉर्कला विमानानं विनाथांबा जायचा प्रयत्न करणाऱ्या धाडसी लोकांसाठी जसं बक्षीस जाहीर झालं होतं, त्याच धर्तीवर आपल्या विमानानं तुळशीबाग ते वाघोली न जाऊ शकणाऱ्यांसाठी त्यांनी रोख एकवीस रूपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. तेव्हाच्या केसरीत ही बातमीही छापायला दिली होती. पण बळवंतराव नावाच्या तत्कालीन संपादकांनी "तुमचे डोके ठिकाणावर आहे का हो ब्रह्मे?" असा सवाल केल्यानं ती बातमी छापली गेली नाही. शेवटी पहिलं बक्षीस स्वतःलाच जाहीर करून त्यांनी ही दुर्गम स्पर्धा संपवली. विविध शहरांना जोडणारी हवाईवाहतूक सुरू होऊन त्यात हवाई सुंदऱ्या प्रवाशांना चहापाणी देऊन आदरातिथ्य करू लागल्या तसे कल्पक चुलत आजोबांनीही आपली ट्रान्स वेस्टर्न इंडीयन एअरलाईन्स सुरू केली. या कंपनीची विमाने कुठूनही कुठेच जात नसत. पण, प्रवाशांना प्रवासाच्या शीणाचा अनुभव व्हावा म्हणून चुलत आजोबांच्या प्रयोगशाळेतील लाकडी पाटावर पोटाला पट्टा बांधून (प्रवासी पळू नयेत म्हणून) बसवले जाई. हवाई सुंदरी म्हणून बालसुधारगृहात वॉर्डनच्या नोकरीचा अनुभव असलेल्या मालिनीबाई होत्या. त्या प्रवाशांची जमेल तितक्या प्रेमानं विचारपूस करून चहापाणी करत. प्रवासी अगदीच कळवळू लागला तर केलेला चहा त्याला प्यायला देत. सुमारे वीसेक चुकार प्रवाशांच्या अनुभवानंतर ही कंपनी बंद पडली.
तोपावेतो, दुसरं महायुद्ध सुरू झालं. न उडणाऱ्या विमानांपेक्षा उडणाऱ्या विमानांना जास्त महत्त्व येऊ लागलं. त्यातही काही जर्मन शास्त्रज्ञांनी जेट इंजिनवर काम सुरू केलं. भारतीय तंत्रज्ञान चोरून ते आपलंच आहे असं म्हणून खपवणाऱ्या पाश्चिमात्य देशांना चुलत आजोबांची महती यावेळी पटली. लुच्च्या ब्रिटिश सरकारनं चुलत आजोबांचे शोध चोरून त्याची माहिती हेरांकरवी जर्मन शास्त्रज्ञांना पुरवायला सुरुवात केली. लवकरच जर्मन शास्त्रज्ञ चुलत आजोबांच्या बुद्धिमत्तेच्या झळाळीनं दिपून जाऊन सैरभैर झाले आणि काहीच काम करेनासे झाले. नेमका याचा फायदा घेऊन दोस्त राष्ट्रांनी महायुद्ध जिंकलं. चुलत आजोबांच्या या असीम शौर्याचा गौरव म्हणून लंडनच्या बकिंमचंद्र पॅलेसमध्ये त्यांचा पुतळा उभा करायचा पार्लमेंटचा बेत होता. पण तो पुतळा पाहून जनमत सरकारविरुद्ध होईल असं म्हणत सहाव्या जॉर्ज राजानं विरोध केला.
या सततच्या यशाला कंटाळलेल्या चुलत आजोबांनी मग स्वतःपासून स्फूर्ती घेत न बुडणाऱ्या पाणबुडीचा शोध लावला.
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment