Saturday, 7 September 2019

हप्तावसुली (आखुडबुद्धी बहुशिंगी)

स्थळ: नगरपालिकेची लायब्ररी. एक मिशाळ, ढेरीवाला माणूस येतो.
ग्रंथपाल: बोला, काय पाहिजे.
माणूस: चौकीतून आलोय मी.
ग्रंथपाल (आपल्या हुद्द्याला स्मरून): चौकीतून आलाय की तिर्रीतून हे कोण विचारलंय? काय पाहिजे ते सांगा.
माणूस: मी पोलीस चौकीतून आलोय. भांबुर्डे साह्यबानी पाठवलंय.
ग्रंथपाल: त्यांची मेंबरशिप आहे का इथं?
माणूस: नाही हो. मी हवालदार मानकामे.
ग्रंथपाल: बरं मग?
माणूस: मला भांबुर्डे साहेबांनी पाठवलंय.
ग्रंथपाल: बरं मग?
माणूस (कुजबुजत्या आवाजात): हप्त्यासाठी.
ग्रंथपाल: आं?
माणूस: आं काय? येवढं मोठं दुकान आहे तुमचं. रोज किमान दोन हजाराचा बिजनेस होत असणार...
ग्रंथपाल: ओ, वाचता येतं का?
माणूस: येत असतं तर मीच साहेब होऊन भांबुरड्याला धाडला नसता का तुमच्या दुकानात?
ग्रंथपाल: हे ग्रंथालय आहे. इथं आम्ही लोकांना वाचायला पुस्तकं देतो.
माणूस: आणि विकता काय?
ग्रंथपाल: काही नाही.
माणूस: ठीकाय. पाचशे रुपये कमी द्या. चला काढा हप्ता. नाहीतर...
ग्रंथपाल: नाहीतर काय?
माणूस: दुकानातला माल उचलून नेईन. सगळ्यात जास्त काय खपतं तुमच्याकडं?
ग्रंथपाल: बाबा कदम, स्नेहलता दसनुरकर, योगिनी जोगळेकर, वपु काळे…
माणूस: काळे नकोत, आपल्यात काळा रंग चालत नाय. पांढरे हायेत का?
ग्रंथपाल: हे कोण प्रकाशक आहेत?
माणूस: मला कसं माहीत? आता निमूटपणे हप्ता काढा नाहीतर तुमचा बिझनेस कायमचा बुडलाच समजा.
ग्रंथपाल: वेडेबिडे आहात का? मी नगरपालिकेच्या वाचनालयाचा ग्रंथपाल आहे. इथं आम्ही काहीही विकत नाही, समजलं?
माणूस: तुला असं नाय समजणार…
*****
स्थळ: पोलीस स्टेशन. इन्स्पेक्टर भांबुर्डे तीन दिवसांच्या सुट्टीवरून परत येतात.
भांबुर्डे: आं? मानकामे, आपल्या हद्दीत एकदमच गुन्ह्यात इतकी वाढ झाली? अरे, झोपा काढता की काम करता?
मानकामे: सायेब, आमचा तपास कसोशीनं चालू आहे.
भांबुर्डे: असे घडले तरी काय गुन्हे?
मानकामे: साहेब, गुन्ह्यांचं स्वरूप किरकोळ असलं तरी त्यामागच्या विघातक भावना पाहून आम्ही जनतेच्या कल्याणासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेची परीस्थिती राखण्याच्या दृष्टीने…
भांबुर्डे: पुरे. काय घडले गुन्हे?
मानकामे: साहेब, काल सकाळी मी चुकीच्या दिशेने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमास अटक केली.
भांबुर्डे: चुकीच्या दिशेने? हा काय गुन्हा आहे?
मानकामे: साहेब, चुकीच्या दिशेने रस्ता ओलांडून रहदारीस अडथळा निर्माण करून पर्यायाने कायदा आणि सुव्यवस्थेची…
भांबुर्डे: बस! आणखी काही?
मानकामे: संशयास्पद वस्तू बाळगणाऱ्या एका व्यक्तीस अटक केली.
भांबुर्डे: (संशयानं) काय होती ती वस्तू?
मानकामे: भाजीची पिशवी होती. पण एका माणसानं पाचसहा भाज्या सोबत बाळगणं संशयास्पदच आहे ना साहेब?
भांबुर्डे: अडीच वर्षांत नोंदवले नाहीत इतके गुन्हे तीन दिवसांत? बघू, हे काय लिहिलंय- धोकादायक शस्त्र बाळगण्याची शक्यता असणाऱ्या मनुष्यास अटक…
मानकामे: हो साहेब, तो मनुष्य खूपच धोकादायक दिसत होता. जाड चष्मा, अंगात खुनशी बुशशर्ट आणि हिंस्र पॅंट, पाशवी सॅंडल… 
भांबुर्डे: असो, हे काय- अवैधरित्या चष्मा बाळगणाऱ्या अज्ञात इसमास अटक.
मानकामे: होय साहेब, मीच पकडला त्याला. शिवाय, शिवाय चिथावणीखोर पुस्तकांचा प्रसार करून सरकारविरुद्ध उठाव करण्याच्या तयारीत होता तो.
भांबुर्डे: (वैतागून) मानकामे, अशानं आपली कोठडी भरून शेजारच्या बॅंकेच्या लॉकरमध्ये गुन्हेगारांना ठेवावं लागेल. किती जण आहेत सध्या?
मानकामे: सध्यातरी एकचजण आहे साहेब.
भांबुर्डे: बाकीचे कुठं गेले? पळाले की काय?
मानकामे: नाही साहेब, पळतोय कसा तो. पळाला तर पोलीस कोठडीतून पळाल्याच्या गुन्ह्याखाली पुन्हा अटक करेन त्याला. 
भांबुर्डे: भलताच सराईत गुन्हेगार आहे का?
मानकामे: तर हो साहेब, त्याच्यावर सव्वीस गुन्हे आहेत.
भांबुर्डे: (काहीतरी अंदाज आल्यानं) आणि हे सगळे गुन्हे आपल्याच स्टेशनला नोंदवले असतील ना? कोणाय हो हा?
मानकामे: आपल्या गल्लीतला लायब्ररीयन!
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a comment